जैव इंधनाची नवी दिशा

0
औद्योगिकीकरणाला मोठ्या प्रमाणावर चालना तसेच गाड्यांची वाढती संख्या यामुळे पेट्रोल-डिझेलचा वापर वाढत आहे. मात्र यातून हवेतील प्रदूषणात होणारी वाढ चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर जैव इंधनाचा वापर गरजेचा ठरत आहे. भारतात अलीकडेच राष्ट्रीय जैव इंधन धोरण लागू करण्यात आले. त्यापाठोपाठ जैव इंधनावरील विमानभरारीचा प्रयोग यशस्वी झाला. त्यानिमित्ताने जैव इंधनाचे महत्त्व लक्षात घेणे गरजेचे ठरणार आहे.

अलीकडच्या काळात वाहनांची प्रचंड संख्या, त्यात वरचेवर पडत असलेली भर आणि त्यातून प्रदूषणवाढीला लागणारा हातभार ही चिंतेची बाब ठरत आहे. प्रदूषण निर्माण करणार्‍या विविध घटकांत वाहनांपासून होणार्‍या प्रदूषणाचे प्रमाण लक्षात घेण्याजोगे आहे. याशिवाय वाहनांचा वापर वाढत आहे त्याप्रमाणात पेट्रोल-डिझेलची मागणीही वाढत आहे. मात्र ही गरज पूर्ण करण्याइतके तेलाचे उत्पादन आपल्या देशात होत नाही.

त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची आयात करावी लागते. त्यातच कच्च्या तेलाचे बदलत चाललेले अर्थकारण, या क्षेत्रातील काही देशांची मक्तेदारी, त्यातून होणारी अडवणूक यामुळे कच्च्या तेलाची आयात डोकेदुखी ठरत आहे. कच्च्या तेलाच्या मोठ्या प्रमाणावरील आयातीमुळे एकूण आयात खर्चात वाढ होऊन त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम होत आहे. देशांतर्गत पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे महागाईवाढीला चालना मिळत असून सामान्य जनता हैराण होत आहे. या सार्‍यात वाढत्या वाहन संख्येमुळे प्रदूषणात होणारी वाढ हा अलीकडच्या काळात कळीचा मुद्दा ठरत आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे, खासगी वाहन वापरावर मर्यादा आणणे असे उपाय सुचवले जात आहेत. मात्र ते कधी अंमलात येणार याचे समाधानकारक उत्तर मिळत नाही. मग वाढत्या प्रदूषणाला आळा कसा घालणार?

या पार्श्वभूमीवर जैव इंधनाचा पर्याय विचारात घेण्यासारखा आहे. यात भारताने नुकतीच महत्त्वाची कामगिरी पार पाडली. जैव इंधनावरील विमानभरारीचा प्रयोग देशात नुकताच यशस्वी झाला. आजवर जैव इंधनावर विमानभरारी ही केवळ बड्या देशांची मक्तेदारी मानली जात होती. ती मोडून काढण्यातही भारताला यश आले. डेहराडून-दिल्लीदरम्यानच्या या यशस्वी प्रयोगामुळे जैव इंधनाचा वापर करून विमान वाहतूक करणार्‍या अमेरिका, कॅनडा व ऑस्ट्रेलियासोबत आता भारतानेही स्थान मिळवले आहे. आताच्या विमान भरारीसाठी वापरलेल्या जैव इंधनाचे उत्पादन एरंडाच्या झाडापासून करण्यात आले. या जैव इंधनाची निर्मिती विज्ञान आणि उद्योग संशोधन परिषद (सीएसआरआय) तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम यांनी संयुक्तपणे केली.

जैव इंधनाची काही मुख्य वैशिष्ट्ये लक्षात घेण्यासारखी आहेत. त्यात उत्पादनावर होणारा कमी खर्च आणि या इंधनामुळे कार्बन उत्सर्जनाच्या प्रमाणात होणारी घट या बाबींचा समावेश होतो. कार्बन उत्सर्जनात घट झाल्याने प्रदूषण कमी करण्यास हातभार लागतो. तसेच या इंधनाचा उत्पादन खर्च कमी असल्याने कमी पैशात विमानसेवा उपलब्ध होते. प्रवासीसेवेचा दरही तुलनेने कमी राहतो. यावरून जैव इंधनाचे महत्त्व व त्याची गरज लक्षात येते. भारतात पंतप्रधानांच्या हस्ते ‘राष्ट्रीय जैव इंधन धोरण 2018’ लागू करण्यात आले आहे.

आपण गेली अनेक वर्षे इंधन म्हणून प्रामुख्याने जिवाष्म इंधनाचा वापर करतो. याला इंग्रजीत ‘फॉसिल फ्युएल’ म्हणतात. फार पूर्वी म्हणजे मानवाच्या उत्पत्तीच्या कोट्यवधी वर्षांंपूर्वी त्याला इंग्रजीत ‘कॉर्बोनी फेरस पिरीयड’ म्हणत. त्या काळात पृथ्वीतलावर असलेल्या वनस्पती व जंगले भूकंपामुळे पृथ्वीच्या पोटात गडप झाली. भूगर्भातील ज्वालारसामुळे त्यांचे ज्वलन झाले किंवा त्यांच्यावर अन्य प्रक्रिया झाल्या आणि त्यापासून दगडी कोळसा तयार झाला. त्याचवेळी त्यापासून जिवाष्म इंधन तयार झाले.

आपण वापरत असलेला गॅस तसेच पेट्रोल-डिझेल हे सर्व जिवाष्म इंधनातच येतात. अशा तर्‍हेने पूर्वीच्या काळी वनस्पती, जंगलांनी साठवून ठेवलेल्या ऊर्जेचाच वापर आज आपण करीत आहोत. जिवाष्म इंधनाचे हे नैसर्गिक साठे, विशेषत: पेट्रोल-डिझेलचे साठे पृथ्वीतलावर काही ठराविक देशांतच उपलब्ध आहेत. त्यामुळे त्या साठ्यांचा मालकी हक्क मर्यादित स्वरुपात त्या देशांकडे आहे. यातलेही काही देश दहशतवाद्यांच्या अधिपत्याखाली आहेत. त्यात इराकसारख्या देशांचा समावेश होतो. त्यामुळे तेथे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली किंवा कोणत्याही प्रकारची आणीबाणीची स्थिती निर्माण झाल्यास जगाला परिणाम भोगावे लागतात. कारण जिवाष्म इंधनाची मक्तेदारी ठराविक देशांकडेच आहे. दुसरीकडे जागतिक अर्थशास्त्र आणि जागतिक आर्थिक परिस्थिती आज तरी जिवाष्म इंधनावर अवलंबून आहे. अलीकडील काळात इंधनाची गरज वाढत आहे. वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. औद्योगिकीकरण वेगाने वाढत आहे. या दोन्हींसाठी जिवाष्म इंधनाची गरज आहे. त्यामुळे या इंधनाची मागणी दरवर्षी वाढत आहे.

असे असले तरी जिवाष्म इंधनाच्या उपलब्धतेला काही मर्यादा आहेत. कारण या इंधनाचे साठे झपाट्याने कमी होत आहेत. एक दिवस पृथ्वीतलावरील हे सर्व जिवाष्म इंधनाचे साठे संपणार आहेत. याची जाणीव व गांभीर्य सर्व देशांना आहे. त्यादृष्टीने गेल्या अनेक वर्षांपासून जगभरच जिवाष्म इंधनाला पर्याय शोधले जात आहेत. त्यात काही पर्याय पुढे आले आहेत. त्यामध्ये पहिला पर्याय विद्युत ऊर्जेचा आहे. ही वीज प्रामुख्याने दोन मार्गाने तयार केली जाते. त्यातील एक म्हणजे हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्प, म्हणजेच पाण्यापासून वीजनिर्मिती! परंतु पाणीसाठा अशाश्वत आहे. शिवाय या प्रकारच्या वीजनिर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागते. ते पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतेच असे नाही. त्यामुळे या प्रकारच्या ऊर्जानिर्मितीला मर्यादा आहेत. त्यानंतरचा दुसरा पर्याय आहे अणुऊर्जा प्रकल्पातून वीजनिर्मिती करणे. यासाठी मोठ्या प्रमाणावर दगडी कोळसा वापरला जातो. हा दगडी कोळसाही जिवाष्म स्वरुपात आहे. त्यामुळे याच्या उपलब्धतेलाही मर्यादा आहेत. त्याचे नैसर्गिक साठे संपुष्टात येणार आहेत.

अणुऊर्जा प्रकल्पात ऊर्जा उत्पन्न करताना दगडी कोळशाचे ज्वलन करतात. त्यातून मोठ्या प्रमाणात हवेचे प्रदूषण होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे चंद्रपूर! अणुऊर्जा प्रकल्पामुळे हे शहर हवेच्या प्रदूषणाबाबत देशात सर्वात वरच्या स्थानावर आहे. यानंतरचा पर्याय म्हणजे पवनऊर्जा आणि सौरऊर्जा! हे दोन्ही पर्याय सर्वात चांगले प्रदूषणविरहित आहेत; पण ते उभे करण्यासाठी पायाभूत खर्च मोठा असतो. शिवाय या पर्यायांना नैसर्गिक मर्यादा आहेत. उदाहरण द्यायचे तर वार्‍याचे प्रमाण कमी असेल तर पवनऊर्जा निर्मितीला मर्यादा येतात. त्यानंतरचा पर्याय म्हणजे जैव इंधन. या इंधनातही अनेक प्रकार आहेत. यात कचर्‍यापासून आणि शेणापासून गॅसची, विजेची निर्मिती करता येते. परंतु याच्या उपलब्धतेलाही मर्यादा आहेत. जैव इंधन हे मुख्यत्वे जैविक घटकांपासून तयार केले जाते. त्यामुळे हा पर्याय सर्वात महत्त्वाचा आणि उपयुक्त वाटू लागला आहे. यामुळेच जागतिक पातळीवर याबाबत चर्चा आणि प्रयत्न सुरू झाले आहेत. आपल्या देशातही गेल्या काही वर्षांपासून हे प्रयत्न सुरू आहेत.

उदाहरण घ्यायचे तर मोगली एरंड, ज्याला इंग्रजीत जट्रोफा क्युरकस म्हणतात, यापासून जैव इंधननिर्मिती करता येते. दुसरी वनस्पती म्हणजे उंडी. ती कोकणात आढळते. याला इंग्रजीत कॅलोफायलम इनोफायलम म्हणतात. विशेष म्हणजे या वनस्पतींच्या बियांच्या तेलापासून बायोडिझेलची निर्मिती केली जात होती, आजही करतात. याबाबत आजवर बरेच प्रयत्न करण्यात आले. अनेक कृषी विद्यापीठांमध्ये याबद्दल संशोधन झाले, परंतु या प्रयत्नांना व्यावहारिकदृष्ट्या म्हणावे तसे यश मिळाले नाही. बायोडिझेल अर्थात जैव इंधन म्हणून पर्याय समोर येतो तो इथेनॉलचा. इथेनॉलचा डिझेल आणि पेट्रोलमध्ये मिसळून वापर हा आज उत्तम पर्याय म्हणून समोर आला आहे. यामुळे इंधनांची, वाहनांची आणि यंत्रांची कार्यक्षमता वाढते, असे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर या इंधनाच्या वापराने प्रदूषणाचे प्रमाण कमी होते, हेही सिद्ध झाले आहे. फक्त पेट्रोल वापरल्यावर होणारे प्रदूषण आणि इथेनॉल मिसळून वापरल्यानंतरचे प्रदूषण याची तुलना केली तर दुसर्‍या प्रकारात तुलनेने प्रदूषण कमी होत असल्याने आता हाच पर्याय सर्वत्र मान्य होत आहे.

इथेनॉल शेतमालापासून तयार होते. भारतासारख्या कृषिप्रधान देशात शेती हा प्रमुख व्यवसाय राहिला आहे. त्यामुळे आपल्याला इथेनॉलनिर्मितीच्या दृष्टीने शेतमालासाठी दुसर्‍या देशावर अवलंबून राहण्याची फारशी गरज नाही. मुख्यत्वे इथेनॉल हे पेट्रोल अथवा डिझेलमध्ये मिसळून वपरल्यामुळे भारताची कच्च्या तेलाची आयात कमी होईल. पर्यायाने परकीय चलनात बचत होईल. देशाची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होईल. मुख्यत्वे इथेनॉलच्या वापराने हवेचे प्रदूषण तुलनेने कमी होईल. साधारणपणे उसापासून इथेनॉल तयार करतात. हे पूर्वी उसाची मळी, मोलॅसिस, काकवी यापासून तयार केले जायचे.

परंतु आता अनेक राज्यात इथेनॉल प्रकल्प सुरू झाले आहेत. पेट्रोलमध्ये 5 टक्के मिसळून त्याचा वापरही सुरू झाला आहे. तरीसुद्धा आपल्या देशात प्रत्यक्षात पेट्रोल आणि डिझेलमध्ये 2 ते 2.2 दशांश टक्के एवढ्याच प्रमाणात इथेनॉल वापरले जाते. अशा परिस्थितीत केंद्र शासनाकडून इथेनॉल वापराला प्रोत्साहन दिले जात आहे. आता तर विमानातही याचा वापर सुरू झाला आहे. आपल्याकडे उसाची मळी, उसाचा रस आणि साखरेपासून इथेनॉलची निमिर्र्ती करतात. देशात काही ठिकाणी मक्यापासून, ज्वारीपासून, गव्हापासून आणि सडलेल्या धान्यापासूनसुद्धा इथेनॉलची निर्मिती करतात. हिमालयाच्या पायथ्याशी, विशेषत: ईशान्य भारतात अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मीर आणि आसाम या आठ राज्यांमधील काही भाग दलदलीचा आहे. तिथे मोठ्या प्रमाणात बांबूचे उत्पन्न मिळते.

या सर्व राज्यांमध्ये बांबूचे गाळप करून इथेनॉल तयार करण्याचा 200 दशलक्ष डॉलर्सचा प्रकल्प आसाममध्ये नुकताच सुरू करण्यात आला आहे. दरवर्षी या प्रकल्पातून 60 दशलक्ष लिटर इथेनॉलची निर्मिती होणार आहे. जैव इंधनाच्या वाढत्या वापरामुळे 2022 पर्यंत भारताची कच्च्या तेलाची आयात 10 टक्क्यांनी कमी होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे परकीय चलनात बचत होऊन देशाची आर्थिक स्थिती चांगली होईल, असा आशावाद पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे. यामुळे सर्वत्र याच्या वापरावर भर दिला जात आहे. किंबहुना, जैव इंधनाचा वापर ही आता काळाची गरज बनली आहे.
– मधुकर बाचूळकर

LEAVE A REPLY

*