जूनपासून बायोमेट्रीक पध्दतीने धान्य पुरवठा

0

जिल्हा पुरवठा विभागाची माहिती

 

अहमदनगर (प्रतिनिधी) – जून महिन्यापासून जिल्ह्यातील रेशन दुकानांमध्ये बायोमेट्रिक पद्धतीद्वारे धान्याचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी संदीप निचित यांनी दिली. आधार कार्डशी संलग्न असलेल्या पीओएस (पॉस) मशीनचे वाटप सर्व दुकानदारांना करण्यात येणार आहे.

 
शहरातील 91 दुकानांमध्ये बायोमेट्रिक प्रणाली राबविताना सर्व लाभार्थ्यांचे बोटांचे ठसे घेण्यात आले. आता मात्र राज्य सरकारकडून येत असलेल्या नवीन प्रणालीला आधार जोडलेले असणार आहे. त्यामुळे कोणाचेही बोटांचे ठसे घेण्याची गरज राहणार नाही. देशभरात सध्या डिजिटल इंडियाचे वारे वाहत आहे.

 

प्रत्येक गोष्ट ऑनलाईन होत असताना रेशन दुकान त्यात मागे कसे राहील? त्यामुळे रेशन दुकानांमध्ये बायोमेट्रिक पद्धत राबविण्यावर शासनाचा जोर आहे. परंतु याच बायोमेट्रिक प्रणालीचा प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणारा प्रयोग नगर जिल्ह्यात मात्र यशस्वी झाला नाही. आता शासनाकडून नवीन प्रणाली राज्यभर राबविण्याचे नियोजन आहे.

 

 जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यातील समता बचत गटाच्या धान्य दुकानात तसेच नाटेगाव येथील एका धान्य दुकानात प्रायोगिक तत्वावर बायोमेट्रिक प्रणाली राबविण्यात येत आहे. या दोन्ही दुकानांतील सर्व कार्डधारकांची 100 टक्के आधारनोंदणी झालेली आहे. नाटेगावच्या धान्य दुकानात 84 कार्डधारक आहेत. तर समता बचत गटाच्या धान्य दुकानात 100 कार्डधारक आहेत. या दोन्ही दुकानांत पीओएस मशीन बसविण्यात आले असून, धान्य वाटप सुरू आहे. धान्य वाटप करताना आधार लिंकिंग केलेली आहे.

LEAVE A REPLY

*