जीएसटीचा सं‘भ्रम’

0

इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, सिमेंट, स्टील विक्री
मंदावली काय महाग.. काय स्वस्त संदिग्धता?

ज्ञानेश दुधाडे @ अहमदनगर

वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) दराबाबत आवश्यक ती माहिती, स्पष्टीकरण मिळत नसल्याने अहमदनगरचे व्यापारी आणि ग्राहक संभ्रमावस्थेत आहेत. बाजारपेठेमध्ये सध्या थांबा आणि पहाची स्थिती दिसत असल्याने इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीत मोठी घट झाली आहे. सिमेंट आणि स्टीलची बाजारपेठ मंदावल्याचे चित्र आहे. केंद्राच्या वतीने उद्योगावरील कराची टक्केवारी 3 जूनला जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर बाजारपेठेच्या स्थितीचा अंदाज येणार आहे.

जीएसटी अंतर्गत कर आकारणीचे दर जाहीर झाल्यानंतर नगरच्या बाजारपेठेतील सद्य:स्थितीचा आढावा घेतला असता ही माहिती पुढे आली. कच्चा माल, वाहतूक आदींच्या दरात वाढ झाल्याने सिमेंट उत्पादक कंपन्यांनी दोन महिन्यांपूर्वी एका गोणीमागे दरात 40 ते 50 रुपयांची वाढ केली होती. त्यामुळे सिमेंटच्या एका गोणीचा दर 340 ते 360 रुपयांवर पोहोचला होता. यात उत्पादन शुल्क आणि व्हॅट मिळून एकत्रितपणे 26 टक्के कर एका गोणीवर आकारण्यात येत होता. सरकारने जीएसटीचे धोरण जाहीर केल्यानंतर सिमेंट कंपन्यानी दर कमी केल्याने 15 दिवसांपासून सिमेंटचे दर 290 ते 330 प्रती गोणी आहेत.
केंद्राच्यावतीने उद्योगावरील कराची टक्केवारी 3 जूनला जाहीर करण्यात येणार आहे. सध्या असलेल्या करापेक्षा जीएसटीच्या कराची कमी असल्याने सिमेंटचे दर 50 रुपये गोणीने कमी होण्याची शक्यता सिमेंट विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, त्यावर आता अधिक स्पष्ट भाष्य करणे चुकीचे ठरले, असे मतही यावेळी नोंदवले. जीएसटीबाबत अधिक स्पष्टपणे अंदाज नसल्याने उन्हाळा, पाणी टंचाई असल्याने बांधकामे रखडली आहे. यामुळे सिमेंट आणि स्टीलची मागणी काही प्रमाणात घटल्याचे यावेळी विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. स्टीलचे दर 36 ते 38 रुपये किलोवर स्थिर आहेत.
जीएसटी कर आकारणीचे धोरण स्पष्ट झालेली नसल्याचा सर्वात मोठा फटका इलेक्ट्रॉनिक्स वस्तूच्या विक्रीला बसला आहे. डिसेंबर महिन्यांत ज्या प्रमाणे ग्राहक घाबरला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 डिसेंबरला काय बोलाणार? कशाचे दर वाढणार, कशाचे दर कमी होणार याचा अंदाज नसल्याने इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी थांबली होती. सध्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूच्या बाजारपेठत तशीच अवस्था निर्माण झाली आहे. ग्राहक सध्या वेट अ‍ॅण्ड वॉचच्या भूमिकेत आहेत. यामुळे एलईडी, एलसीडी टी. व्ही., फ्रीज, वॉशिंग मशीन आदी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूची विक्री मोठ्या प्रमाणात घटली आहे.
सिमेंट, स्टील, सोने चांदी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, सोने चांदीचे दागिणे यातील कोणत्या वस्तूवर, उत्पादनावर किती जीएसटी कर आकारणी होणार हे स्पष्ट समजत नसल्याचे व्यापारी, व्यावसायिक यांच्या सोबत ग्राहक संभ्रमावस्थेत असल्याचे बाजारपेठेत दिसत आहे.

सोने-चांदी दराबाबत संदिग्धता
जीएसटी करप्रणालीचा सोने-चांदी उद्योगावरील परिणामाबाबत संदिग्धता आहे. सध्या सोने चांदी खरेदी-विक्रीवर 1.2 टक्का व्हॅट लागू आहे. मात्र, जीएसटी प्रणालीत करांची सुरुवातच पाच टक्क्यांपासून आहे. त्यामुळे सरकारने सोने-चांदी व्यवसायावरील कराची टक्केवारी निश्चित केलेली नाही. सोने-चांदी खरेदी विक्रीत जुने सोने देऊन नवीन खरेदी करण्याची पद्धत आहे. त्यावर टॅक्स लागणार का? अलंकारांची घडणावळ, मजुरी यावरही टॅक्स लागणार का? याबाबत स्पष्ट माहिती सुवर्ण व्यावसायिकांना नाही.

खते, किटकनाशकांवर सरकारकडून जीसएसटी लागणार आहे. यामुळे खते आणि किटकनाशांच्या किंमती वाढणार आहे. मात्र, खते आणि किटकनाशके हे शेतकर्‍यांशी संलग्न विषय असल्याने सरकार यावर किती जीएसटी आकारणी होईल, हा खरा प्रश्‍न आहे. यामुळे खते, किटकनाशक विक्रेत्यांमध्ये संभ्रम आहे.
-अजय मुथा, किटकनाश विक्रेते

जीएसटीच्या दर घोषणेनंतर टी.व्ही., फ्रीज, वॉशिंग मशीन, अशा विविध इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीबाबत ग्राहक हे वेट अ‍ॅण्ड वॉचच्या भूमिकेत आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या मार्केटमध्ये सध्या कमालीची मंदी आहे. ग्राहक अजून काही काळ वाटप पाहून सरकारची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर खरेदी करतील, असा अंदाज आहे.
– सागर कराचीवाला, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व्यावसायिक

सरकारने सिमेंटवर 28 टक्केऐवजी 18 टक्के जीएसटी कर लागू करावा. तरच त्याचा फायदा सर्वसामान्यांना होणार आहे. सोने, दारू, सिगारेट या चैनीच्या वस्तूवर सरकारने 28 टक्के कर आकारावा. सिंमेट ही प्रत्येकांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा विषय असल्याने सरकारने याकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे.
– सत्कार राजकुमार ओस्तवाल, उद्योजक वांबोरी.

LEAVE A REPLY

*