जि.प सभापतीपदासाठी जोरदार रस्सीखेच : उद्या होणार निवड; वरिष्ठाकंडे इच्छुकांकडून मोर्चेबांधणी

0

जळगाव |  प्रतिनिधी :  जिल्हा परिषदेच्या शिक्षण, आरोग्य, समाजकल्याण, महिला बालकल्याण,कृषी, बांधकाम सभापती पदासाठी उद्या दि.१ रोजी छत्रपती शाहु महाराज सभागृहात निवड होणार आहे. यासाठी इच्छुक सदस्यांकडून वरिष्ठांकडे मोर्चेबांधणी सुरु असल्याने चांगलीच रस्सीखेच निर्माण झाली आहे.

जिल्हा परिषदेच्या चार सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला असून उद्या दि.१ रोजी दुपारी ३ वाजता होणार्‍या विशेष सभेत सभापतींची निवड होणार आहे. भाजपाच्या सर्वाधिक ३३ जागा निवडून आल्या असून कॉंगे्रसच्या चारही सदस्यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीवेळी भाजपाला खुला पाठींबा दिला होता.

त्यामुळे आता सभापती निवडीवेळी कॉंग्रेसला एक सभापती पद दिले जाईल अशी चर्चा आहे. दरम्यान सभापती निवडीत रावेर लोकसभा मतदारसंघाला अधिक प्राधान्या दिले जाण्याची शक्यता आहे.
यांची वर्णी लागण्याची चर्चा

अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीवेळी ज्या सदस्यांना संधी मिळाली नाही, त्या सदस्यांची सभापतीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान सभापती पदासाठी साकळी-दहिगाव गटातून निवडून आलेले रविंद्र सूर्यभान पाटील, कानळदा-भोकर गटातून निवडून आलेले प्रभाकर सोनवणे, नशिराबाद-भादली गटातून निवडून आलेले लालचंद पाटील तसेच साळवा गटातून निवडून आलेल्या माधुरी चंद्रशेखर अत्तरदे यांच्या नावाची चर्चा आहे त्यामुळे जोरदार रस्सीखेच सुरु आहे.

अशी असेल निवड प्रकिया

जि.पच्या महिला बालकल्याण, समाजकल्याण, शिक्षण व आरोग्य,कृषी बांधकाम सभापती निवडीसाठी विशेष सभा उद्या दि.१ रोजी होणार असून सकाळी ११ ते १ पर्यंत नामनिर्देशन अर्ज भरले जाणार आहे. त्यानंतर दुपारी ३ वाजता विशेष बैठकीला सुरवात होवून सभापतीपदाची निवड होणार आहे.

स्थायी, जलव्यवस्थापन, पशुसंवर्धन, कृषी समितीची १ रोजी बैठक

नियमानुसार दरमहिन्याला विषय समित्यांची बैठक घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार स्थायी, जलव्यवस्थापन, पशुसंवर्धन,कृषी समितीची दि.१ रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे.

कॉंग्रेसला सभापतीपद मिळण्याची शक्यता

जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेपासून कॉंग्रेसचे आर.जी पाटील भाजपाच्या संपर्कात होते. कॉंग्रेसने अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीवेळी भाजपाला खुला पाठींबा दिल्याने एक सभापतीपद कॉंग्रेसला दिले जाण्याची शक्यता आहे. तर माजीमंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी एका कार्यक्रमात कॉंग्रेसला सभापती पद दिले जाईल असे सांगितले होते. त्यामुळे कॉंग्रेसला सभापतीपद मिळण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

*