जि.प.शाळा डिजिटालाझेशनला 26 जानेवारीची ‘डेडलाईन’; ग्रामविकास राज्यमंत्री भुसेंचे निर्देश

0
नाशिक । जिल्हा परिषदेच्या प्राथमिक, माध्यमिक शाळा या गरीब, वंचित घटकांच्या शिक्षणांचा मुख्य आधार आहे. जि.प.च्या शाळा अद्यावत आणि दर्जेदार आहेत, ही ओळख निर्माण करण्यासाठी जि.प.प्रशासनाने लोकसहभागी, सीएसआर आणि शासकीय निधीतून जि.प.शाळांचे डिजिटालायझेशन करावे. येत्या 26 जानेवारीपर्यंत जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा डिजिटल उपक्रमात आल्या पाहिजेत, असे निर्देश ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला दिले.

जि.प.मुख्यालयात आज ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी जिल्हा परिषदेचे शिक्षण, आरोग्य, कृषी, ग्रामपंचायत, महिला व बाल कल्याण, समाज कल्याण, बांधकाम, ल.पा. ग्रामीण पाणी पुरवठा, स्वच्छ भारत अभियान, घरकुल आदी विभागांचा आढावा घेतला.

यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, उपाध्यक्षा नयना गावित, आमदार राजाभाऊ वाजे, नरहरी झिरवाळ, योगेश घोलप, बांधकाम समिती सभापती मनिषा पवार, समाज कल्याण समिती सभापती सुनिता चारोस्कर, शिक्षण समिती सभापती यतीन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना, अतिरिक्त सीईओ अनिल लांडगे, अप्पर आयुक्त सुखदेव बनकर यांच्यासह जि.प.चे सर्व उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकार, विस्तार अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ.सुशील वाकचौरे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांचा सत्कार भुसे यांच्या हस्ते करण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकलेलेच आज सर्वच क्षेत्रात चमकदार कामगिरी करीत आहे. प्राथमिक शाळा ग्रामीण भागातील गरीब, वंचित घटकांना शिक्षण घेण्यास एकमेव आधार आहेत. त्यामूळे या शाळांचे रुपडेही आधुनिक झाले पाहिजे. खासगी शैक्षणिक संस्थांच्या तुलनेत जिल्हा परिषदेच्या सव्वा तीन हजार शाळा मागे पडता कामा नये, या शाळांचे ढत बदलण्यात यावेत.

रंगरंगोटी करून सुशोभीकरण करण्यात यावे, परिसराला संरक्षक कुंपण घालण्यात यावे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची कास धरता यावी म्हणून प्रत्येक शाळेत ई-लर्निंग संच उपलब्ध करून शाळा डिजिटल केली गेली पाहिजे. येत्या 26 जानेवारीला जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा या अत्याधुनिक झाल्या पाहिजे. त्यासाठी लागणारा निधी डिपीडीसी, जिल्हा परिषद सेस, लोकसहभाग, सीएसआर मधून उपलब्ध करून घ्यावा, असे निर्देश दादा भुसे यांनी यावेळी सीईओ मिना यांना दिले.

भुसे यांनी यावेळी घरकुल योजना असलेल्या रमाई आवास, राजीव गांधी निवारा, इंदिरा आवास, प्रधानमंत्री आवास, शबरी आवास योजनांचा आढावा जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासनाकडून घेतला. यात कमी लाभार्थी, शिल्लक कामे, नवीन घरे आणि अपूर्ण घरांची माहिती घेऊन भुसे यांनी प्रशासनाला जी घरे जागेच्या अभावी रखडलेली आहे. त्या जागेची माहिती शासनाला कळवण्याचे सांगितले.
जिल्ह्यात जीवन ज्योतीसाठी प्रयत्न
गरीब कुटुंबांना आर्थिकदृष्टया सक्षम करणारी जीवनज्योती योजनेत मालेगाव तालुका सहभागी करून, ही योजना येथे किती लागू होते, याचा प्रयोगकरून पाहिलेला आहे. आता या योजनेसाठी आपण नाशिक जिल्हा समाविष्ठ व्हावा, असे प्रयत्न शासनाकडे करीत असल्याचे भुसे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

स्वच्छ भारत महत्वाकांक्षी : जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियान अंतर्गत घरोघरी शौचालय, ही पंतप्रधानांची महत्वाकांक्षी योजना आहे, त्यामूळे जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या डेडलाइन प्रमाणे गावो-गावी शौचालय बांधून त्याचा उपयोग करण्यास नागरिकांना प्रवृत्तकरण्याचे भुसे यांनी आढावा बैठकीत ग्राम स्वच्छता विभागाला सांगितले.

शाळा,अंगणवाड्या जागेचा प्रश्न : जिल्हा परिषदेला ग्रामीण भागात अंगणवाड्या, शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र बांधण्यास जागा मिळत नसल्याची तक्रार ग्रामपंचायत, बांधकाम आणि शिक्षण विभागाने भुसे यांच्याकडे मांडली. यावेळी ग्रामपंचायत विभागाने शासनाकडे असे प्रस्ताव पाठवावे, असे निर्देश सीईओंना भुसे यांनी दिले.

बाल कुपोषणावर चिंता : महिला व बाल कल्याण विभागाचा निधी खर्च का झाला नाही, असा प्रश्न करून भुसे यांनी या विभागाचे अधिकारी मुंडे यांच्यांकडे तीव्र कुपोषणाचे बालके जिल्ह्यात अधिक कसे, याची माहिती घेतली. शासनाने निधी खर्चाला मंजूरी दिली नसल्याने कुपोषण निवारण्याचे उपक्रम राबवता आले नाही, असे यावेळी सांगण्यात आले. समाज कल्याण विभागाच्या विविध योजना राबवण्यात आलेल्या नसल्याने, या विभागाच्या प्रश्नाना तात्काळ मार्गी लावा, असे यावेळी भुसे यांनी सांगितले.

बैठकीत प्रत्येक खातेप्रमुखांनी आपल्या खात्याचा आढावा सादर करताना सादरीकरण केले. यावेळी उपस्थित गटनेत्यांनी खातेप्रमुखांच्या कामकाजातील उणीवा, तसेच निधीचा अभाव याचा पाढा ग्रामविकास राज्यमंत्र्यांसमोर मांडला. त्यामूळे शासनाकडे निधी मागणी, नाविण्यपूर्ण योजनेत समावेश करण्याची सूचना करण्यात येईल, असे भुसे यांनी यावेळी आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

*