जि.प.मध्ये युतीसाठी सेनेशी जवळीक? ; भाजपच्या कोअर कमिटी बैठकीनंतर हालचाल

0

नाशिक : जिल्हा परिषदेत शक्य त्या ठिकाणी शिवसेनेला सत्ता स्थापन्यासाठी भाजपने युती करावी, असा निर्णय मुंबईत भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत झाल्याने नाशिकमध्ये भाजपने जि.प.मध्ये शिवसेनेशी जवळीक साधण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.

शिवसेनेने जिल्हा परिषदेत 25 सदस्य आणि एक अपक्ष यांच्यासह संख्याबळ 26 गाठलेले आहे. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी या पक्षाला अजून 11 मदतगारांची जोड हवी आहे. भाजपचे 15 सदस्य, राष्ट्रवादीचे 18 सदस्य, काँगे्रसचे 8 आणि माकप आणि अपक्ष मिळून 6 सदस्य आहेत. 73 सदस्य संख्येच्या सर्वसाधारण सभागृहात शिवसेनेला सुमारे 37 सदस्यांच्या बळावर अध्यक्षपदावर स्वार व्हायचे आहे. त्यामुळे शिवसेनेने मुंबईत महापौर होण्याअगोदर सुरुवातीला राष्ट्रवादीला सोबत घेण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. त्यानंतर काँगे्रसने स्वतःहून शिवसेनेला मदत करण्याचे संकेत दिलेले होते. तर माकप आणि अपक्षांची मोट बांधून देण्यासाठीही काँगे्रसने पुढाकार घेण्याचे संकेत दिले होते.

मात्र, निवडणुकीत युतीदरम्यान तणाव निर्माण झालेला होता. भाजप आणि शिवसेनेने एकमेकांवर चिखलफेक करून स्वतंत्रपणे निवडणूक लढवलेली असल्याने तो दुरावा निकालानंतरही कायम होता. भाजपने 15 सदस्यांच्या मदतीने जिल्हा परिषदेत सत्ता नव्हे तर थेट जि.प.अध्यक्षच आपल्या पक्षाचा बनविण्याचा घाट घातला होता. त्यासाठी राष्ट्रवादी आणि काँगे्रसलाही साकडे घालण्याचा प्रयत्न भाजपच्या आमदारांनी करून पाहिला होता.

अर्थात ही तडजोड मुंबईत शिवसेनेच्या महापौर बनविण्याच्या प्रक्रियेत भाजपची भूमिका काय असणार आहे, याचे गौडबंगाल नाशिकमधील पाधिकार्‍यांना माहित नसल्याने त्यांनी , या हालचाली केल्याचे म्हटले जाते. शिवसेनेने मदत मागितली नसताना मुख्यमंत्र्यांनी थेट शिवसेनेला मदत करण्याची घोषणा मुंबईत केल्यानंतर नाशिकमध्येही त्यानंतर शिवसेना आणि भाजप गोटात प्रतिबिंब उमटले होते.

शिवसेनेने तरीही भाजप वगळून कोणाचीही मदत घेत जिल्हा परिषदेत आपलाच अध्यक्ष बसवण्याचा ताठरबाणा दर्शवला होता. त्यासाठी संपर्कप्रमुख अजय चौधरी यांनी पक्षाच्या पदाधिकार्‍यांनाही पक्षप्रमुखांचा आदेश येईपर्यंत वाट पाहण्याचे सूचित केले होते. त्यामुळे भाजपच्या पदाधिकार्‍यांना बुचकळ्यात पडल्यासारखे झालेले होते. काही झाले तरी जिल्हा परिषदेत शिवसेनेबरोबर सत्तेत राहण्याचे धोरण स्वीकारत भाजपने निवडणुकीत झाले-गेले विसरून एकत्र येण्याचे संकेत दाखवले आहेत. मात्र, त्याला अजून मृतस्वरुप येताना दिसत नाही. पण, शिवसेनेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न प्रकर्षाने केला जात असल्याचे या निमित्ताने भाजपच्या गोटातून खासगीत बोलले जात आहे.

जिल्हा परिषदेतील सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षानेही आपल्या 18सदस्यांच्या जोरांवर आणि निवडणुकीत बंडखोरी करून निवडून आलेल्या अपक्षांच्या जीवावर जि.प.मध्ये पुन्हा काँगे्रसला आघाडीचा डोळा मारत सत्तेची आस माकप आणि अपक्षांच्या मदतीने लावून धरली आहे. मात्र काँगे्रस पक्षाने गेल्या अध्यक्षपद निवडणुकीत राष्ट्रवादीने जी गद्दारी केली होती. त्याचा डूख मनात धरलेला आहे. एकवेळ शिवसेनेला मदत करू पण, राष्ट्रवादीला नाही, अशी भूमिका काँगे्रसने घेतलेली असल्याने राष्ट्रवादीची सत्ता भूक त्यामुळे आपोआपच जिरली आहे. तर काँगे्रसने सत्तेत येणार्‍या पक्षाला मदतीची गळ घालत त्या बदल्यात विषय समित्यासारख्या पदांवर डोळा ठेवला असल्याचे बोलले जाते. तीच गत माकप या पक्षाचीही आहे.

ग्रामीण भागात काही केले तरी काँगे्रस, राष्ट्रवादी या पक्षांना टिकून राहण्यासाठी आणि संघटन कायम ठेवण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमधील सत्ता कायम उपयोगाची वाटत असते. त्यामुळे जिल्हा परिषदेतील सत्ता ही दोन्ही पक्षाची गरज आहे. त्यासाठी त्यांनी जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेत राजकीय हालचालीची गती कायम राखली आहे.

LEAVE A REPLY

*