जि.प. अध्यक्ष पदासाठी ‘धक्कातंत्र’?

0

नाशिक | दि. १० प्रतिनिधी
जिल्हा परिषदेत शक्य असेल तर शिवसेनेने भाजपला मदत करावी असा ‘मातोश्री’वरून आदेश आल्याने सेनेच्या पदाधिकार्‍यांना काय तो ‘राजकीय’ संकेत मिळाला आहे. त्यामुळे आज सेनेच्या शिलेदारांनी आणि भाजपच्या पदाधिकार्‍यांनी एकमेकांना चर्चेत गुंतवून ठेवले. मात्र जि.प. अध्यक्ष पदासाठी ‘सुप्त’ आस लावून बसलेल्या सेनेतील ‘मुत्सद्दींनी’ कॉंगे्रस, माकप, अपक्ष आणि राष्ट्रवादीशीही ‘संधान’ ठेवल्याने अध्यक्ष निवडीत ‘धक्कातंत्र’ रणनीतीची नेपथ्य रचना केली जात आहे.

मुंबई आणि राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांतील महापौर निवड, अधिवेशनदरम्यान घडणार्‍या घटनांचे प्रतिबिंब शिवसेना-भाजपच्या राजकीय वर्तनावर दररोज उमटत असून त्याचा परिणाम जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीवर नाशिकमध्येही होत आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपचे एकमेकांविषयी असलेले राजकीय संबंधही दररोज नवे वळण घेत आहे.

याचा लाभ उठवण्यासाठी आणि जिल्हा परिषदेच्या सत्तेत शिरकाव करण्यासाठी तयारीत असलेल्या कॉंगे्रस, राष्ट्रवादी, माकप आणि अपक्षांना आयतीच संधी चालून येत आहे. ही संधी त्यांना मिळू नये म्हणून एका बाजूला शिवसेना आणि भाजप एकमेकांच्या दाढ्या कुरवळत आहेत, तर दुसरीकडे त्या पक्षांच्या राजकीय हालचालींवर अंकुश ठेवण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करीत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेची अध्यक्ष निवड तयारी वेग धरत आहे.

शिवसेनेचे पदाधिकारी वरून आलेल्या आदेशाचे संकेत लक्षात घेऊन अध्यक्ष निवडणूक तयारीला जुंपले आहेत. मात्र पंचायत समिती सभापतींची निवड येत्या १४ तारखेला असल्याने त्या तयारीत सेनेसह भाजप, कॉंगे्रस, राष्ट्रवादी आणि माकपही गुंतलेले आहेत. जि.प. अध्यक्ष निवड त्यानंतरअसल्याने, या निवडणूकीला वेळ आहे. त्यावर बोलू सवडीने , असे म्हणत सर्व पक्षाचे पदाधिकारी एकमेकांना जिल्हा परिषदेत भेटल्यानंतर एकमेकांचे धोरण गुपीत ठेवण्यावर भर देतात. मात्र, पक्षीयस्तरावर हालचाली गतीमान असल्याने कोणीचे काय चालले आहे. त्यांच्यामध्ये लपून राहिलेले नाही.

ग्रामीण आणि शहरातील राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सत्तेच्या चाव्या शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, कॉंगे्रस आणि इतर पक्षांना महत्वपुर्ण वाटत आहे. ग्रामीण भागात कॉंगे्रस आणि राष्ट्रवादीचा जनाधाराचा उतरता आलेख असल्याने या दोन्ही पक्षाने जिल्हा परिषदेतील त्रिशंकु अवस्था सत्ता स्थापना किंवा सत्तेत सहभागाची संधी म्हणून पाहिली आहे. त्यामुळे एकाबाजुला शिवसेना-भाजपच्या सत्ता स्थापना तयारी तर दुसरीकडे राष्ट्रवादी, कॉंगेस आणि माकपच्या सत्तेसाठी हालचाली जि.प.मध्ये चर्चेचा विषय आहे.

मतलबी धोरणे
जिल्हा परिषद ही शासन आणि जनतेतील दूवा असल्याने येथील सत्ता ही जनसंपर्काची नाळ असते. निवडणूकीत जरी जनाधार मिळाला नसेल तरी, जनतेशी संबंध ठेवण्याचे माध्यम जि.प.च आहे, त्यामूळे सत्तेतील चंचुप्रवेश करण्यासाठी कॉंगे्रस पक्ष सेनेशी सलगी करून आहे. तर भाजपला वाढलेल्या जागांमध्ये आगामी काळात अजून भर घालायची असल्याने सत्तेची आस असून, सध्या शिवसेनेची मदत जि.प.मध्ये करणे भाजपला दूरगामी वाटत आहे. तर सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी पक्षाला सुमारे १८ सदस्यांच्या आधारे सत्तेला पुन्हा अलिंगण घालावसे वाटत आहे. या विचारातून जिल्हा परिषदेची त्रिशंकु अवस्था सत्तेच्या मार्गाकडे सरकत असल्याने ऐनवेळी धक्का देण्याची रणनिती आश्‍चर्यकारक ठरेल, अशी शक्यता आहे.

LEAVE A REPLY

*