जि.प.अध्यक्षपदावरुन जोरदार राजकीय खलबते

0

जळगाव | प्रतिनिधी : जिल्हा परीषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज दिवसभर भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जोरदार राजकीय खलबते झाली. दरम्यान भाजपाला सत्तेपासुन रोखण्यासाठी शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत जाण्याची तयारी केली आहे. तर शिवसेनेला दुर ठेवत सत्तास्थापनेसाठी भाजपानेही रणनिती आखली आहे.

जिल्हा परीषद अध्यक्ष पदासाठी दि. २१ रोजी निवड प्रक्रिया होणार आहे. जिल्हा परीषदेत भाजपाचे ३३, राष्ट्रवादीचे १६, शिवसेनेचे १४ तर कॉंग्रेसचे ४ असे पक्षीय बलाबल आहे. बहुमतासाठी ३४ हा मॅजिक फिगर आहे. तो गाठण्यासाठी भाजपाला एका सदस्याची गरज आहे.

सद्यस्थितीला कॉंग्रेसच्या अरूणा रामदास पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे दोन सदस्य भाजपाच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर शिवसेनेनेही भाजपाला रोखण्यासाठी राष्ट्रवादीच्या गळ्यात गळा घालण्याची तयारी केली आहे.

अध्यक्षपदावरून प्रथमच पेच

जिल्हा परीषदेची निवडणुक स्वबळावर लढविल्यानंतर सत्तास्थापनेसाठी भाजपा आणि शिवसेनेची युती नेहमीच झाल्याचे चित्र राहीले आहे. यावेळेला मात्र भाजपाचे सदस्य अधिक असल्याने शिवसेनेच्या मदतीशिवाय सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न केले जात आहे.

तर भाजपाला रोखण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादीशी तह करण्याची तयारी केली आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून प्रथमच एवढा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे उद्याच्या निवडणुकीत आणखी कोणत्या खेळी खेळल्या जातात याकडे लक्ष लागुन आहे.

रात्री उशिरापर्यंत बैठका

अध्यक्षपदाच्या निवडीसाठी राजकीय पक्षांच्या रात्री उशीरापर्यंत नेत्यांच्या फार्महाऊस, हॉटेल्सवर बैठका सुरु होत्या. रात्री उशीरापर्यंत राजकीय नेत्यांमध्ये चर्चा सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आ.खडसेंचा मात्र मूड वेगळाच

जिल्ह्यात शिवसेनेला नमवत भाजपा वाढविण्याचे श्रेय माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांनाच जाते. अगदी विधानसभा निवडणुकीतही युती तोडण्याची जबाबदारी खडसेंवर सोपविण्यात आली होती. तसेच नुकतेच काही दिवसांपुर्वी आ.खडसे आणि ना.गुलाबराव पाटील यांच्यात जिल्हा बँकेच्या विषयावरून चांगलेच घमासान झाले होते.

त्यामुळे कुठल्याही परिस्थीतीत जिल्हा परीषदेत सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला सोबत घेण्याच्या मूडमध्ये आ.खडसे नसल्याचे दिसुन येत आहे. शिवसेनेऐवजी कॉंग्रेसच्या सदस्यांना सोबत घेऊन सत्तास्थापनेसाठी आ.खडसेंनी रणनिती आखली आहे.

महाजनांकडून शिवसेनेसाठी आग्रह

राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन आणि शिवसेनेचे मंत्री ना. गुलाबराव पाटील यांची दोस्ती जगजाहीर आहे. या दोस्तीखातीर आणि ना. गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रताप पाटील यांना पद देण्याच्या उद्देशाने ना. महाजन हे शिवसेनेशी हातमिळवणी करण्यासाठी आग्रही असल्याचे सुत्रांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*