जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा

0
नाशिक | दि. ३० देशदूत चमू- गेल्या महिनाभर उन्हाच्या झळांनी पोळणार्‍या नाशिक जिल्ह्याच्या काही भागाला आज अवकाळी पाऊस आणि गारपिटीने तडाखा दिला. दुपारी एक-दीडच्या सुमारास मालेगाव, बागलाण, चांदवड, नांदगाव, निफाड, इगतपुरी तसेच सिन्नर तालुक्यांत वादळी वार्‍यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली.
काही भागात गारपीटही झाली. बेसावध असलेल्या शेतकर्‍यांची त्यामुळे चांगलीच धांदल उडाली. वादळी पाऊस व गारपिटीमुळे अनेक भागातील कांदा, गहू, डाळिंब, द्राक्ष आदी पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आधीपासूनच अडचणींनी हैराण झालेल्या शेतकर्‍यांना यामुळे पुन्हा आर्थिक झळ सोसावी लागण्याची शक्यता आहे. सुलतानी संकटाने हतबल झालेला शेतकरी आता अस्मानी संकटात सापडला आहे.
पुणे वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार शनिवारी सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर अवकाळीचा हा फेरा नाशिक जिल्ह्याकडे वळला आहे. संपूर्ण जिल्ह्यात पावसाळी वातावरण तयार झाले आहे. अवकाळीचा तडाखा बसलेल्या तालुक्यांखेरीज इतर काही भागात रिमझिम पाऊस झाला.

पावसामुळे नाशिक शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. रात्री उशिरापर्यत जिल्ह्यात पावसाळी वातावरण कायम होते. हवामान खात्याने आणखी दोन दिवस अवकाळी पावसांचा अंदाज वर्तवल्याने शेतकर्‍यांची काळजी वाढली आहे.
गेल्या आठवड्यात मराठवाडा ते लक्षद्वीपच्या दरम्यान निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्‌ट्यामुळे वातावरणात दमटपणा तयार होऊन उष्णतेत वाढ होण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला होता. त्यानुसार राज्याच्या बहुतांशी भागात कमाल तापमानात वाढ झाली आहे. या बदललेल्या वातावरणाचा परिणाम म्हणून ३० एप्रिल ते १ व २ मे दरम्यान दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली होती.
आज बागलाणसह देवळा, चांदवड तालुक्यांच्या काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. मुसळधार वादळी पावसाने देवळा परिसराला झोडपून काढले. नांदगाव तालुक्यात मनमाड, पानेवाडी, निफाड तालुक्यातील शिवडे, देवगांव, रानवड, कसबे सुकेणे, मौजे सुकेणे, चेहडी परिसरात जोरदार पाऊस झाला. चितेगावला गारा पडल्याने रस्ते पांढरे दिसत होते.

सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे व नायगाव परिसरालाही अवकाळी पावसाचा मार बसला. अनेक ठिकाणी झालेल्या गारपिटीने द्राक्षबांगांना मोठा फटका बसला. शेतात काढून साठवलेल्या उन्हाळ कांद्याचेही मोठे

नुकसान झाले. निफाड परिसरात द्राक्ष, कांद्यासोबत बेदाण्याचे नुकसान झाले. काही भागात गव्हासह इतर पिकांचे नुकसान झाले. नाशिक तालुक्यासह नाशिक शहरात वादळी वार्‍यासह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.

रस्त्यांवर गारांचा खच
नामपूर भागात वादळी पावसासोबत जोरदार गारपीट झाली. क्षणार्धात रस्त्यांवर गारांचा खच पडला होता. गारपिटीची सर्वाधिक झळ कांदा पिकाला बसली आहे. दुपारी कडक ऊन असल्याने पाऊस येईल असे कोणालाही वाटत नव्हते. दुपारी अचानक वातावरण बदलून आकाशात काळे ढग जमून दुपारी दोनच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरु झाला. मोसम खोर्‍यात सध्या कांदा काढणी जोरात सुरू आहे. अनेक ठिकाणी कांदा शेतातच भिजला.

देवळा तालुक्यात तीन जखमी
देवळा तालुक्यात आज दुपारी तीनच्या सुमारास आलेल्या अवकाळी पावसाने वीज आणि घर पडण्याच्या दोन घटनांत तीन जण जखमी झाले. झिरेपिंपळ येथे वीज पडून एकनाथ यशवंत सोनवणे (१७) हा युवक जखमी झाला. त्याच्या चार शेळ्या मृत्युमुखी पडल्या. कुणाल हिरामण आहेर (७) व प्रमिला हिरामण आहेर (३५) हे मायलेक घर पडून जखमी झाले. जखमींवर देवळ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कुणाल आहेरला अधिक उपचारांसाठी नाशिकला हलवण्यात आले आहे.

बागलाणला जोरदार पाऊस
बागलाण परिसरातील नामपूर, द्याने येथे जोरदार पावसासोबत गारपीट झाली. अंबासन, मटाणे, उतरणे, बिजोरसे, वनोली, मिरगाव, खामलोण, फोफीर, बोराणे, काकडगाव, आनंदपूर, देवपूर, आखातवाडे, तताणी, तळवाडे दामिर, टेंभे आदी गावांत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. कोरबेल गावात २ शेळ्यांचा मृत्यू झाला. बिजोरसे येथे घरांचे पत्रे उडाल्याची माहिती बागलाणचे प्रांत प्रवीण महाजन, तहसीलदार सुनील सौदाणे यांनी दिली.

घोटीत पिकांचे नुकसान
इगतपुरी तालुक्यातील घोटी परिसरात कवडदरा, साकूर, पिंपळगाव डुकरा, घाडगा, शेणित,भरवीर खुर्द, साकूर फाटा परिसरात गारांसह अवकाळी पाऊस झाला. गारपीट व पावसामुळे पिकांंचे नुकसान होण्याच्या भीतीने शेतकरी वर्गात नाऊमेद झाला आहे. कवडदर्‍यातील भाजी बाजाराची दुर्दशा झाली. मुंबई-शिर्डी मार्गावर पाणीच पाणी झाल्याने व पावसाचा जोर असल्याने दुचाकीस्वारांनी उपाहारगृहांचा आसरा घेतला.

नांदगावला विजांचा कडकडाट
तालुक्यातील बोलठाण, जातेगाव परिसरात वादळी पावसाने सुमारे अर्धा तास जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने जनजीवन काहिसे विस्कळीत झाले असले तरी उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना सुखद गारव्याने दिलासा मिळाला आहे. तालुक्यात इतर भागात सोसायट्याचा वारा, विजांचा कडकडाट व ढगाळ वातावरण दिसून आले. रविवारी मनमाडचा आठवडे बाजार होता. सोसाट्याच्या वार्‍याने विक्रेत्यांचे तंबू उडाले. विक्रीसाठी भाजीपाला घेऊन आलेल्या शेतकर्‍यांच्या मालाचेही नुकसान झाले.

चांदवडला तुरळक हजेरी
तालुक्यात आज सकाळपासून ढगाळ हवामान असल्याने मोठा पाऊस येईल, असे वाटत असताना पावसाने चांदवडमध्ये दुपारी तुरळक हजेरी लावली. तालुक्यातील धोडंबे, कानमंडाळे परिसरात जोरदार पाऊस झाला. इतरत्र वादळी वारा आणि ढगाळ वातावरण कायम राहिले. अवकाळी पावसाने धास्तावलेला शेतकरी नुकत्याच काढलेल्या उन्हाळ कांद्याची सुरक्षित साठवण करताना शेतकरी दिसून आला.

बाजारकरूंची धांदल
चांदवड व नांदगाव तालुक्यांच्या तुलनेत देवळ्यात जोरदार पाऊस झाला. देवळा येथे आज आठवडे बाजार होता. पावसामुळे शेतमाल विक्रेत्यांसह बाजारकरूंची चांगलीच तारंबळ उडाली. विक्रीला आणलेल्या शेतमालाचे मोठे नुकसान झाले. भऊर परिसरात बारिक गारपिटीसह पाऊस झाला. त्यामुळे कांदा, डाळिंब, द्राक्ष आदी पिकाचे नुकसान झाले. भऊर येथे जोरदार वार्‍यामुळे ताडपत्र्या उडाल्या. आंब्यांच्या झाडांची फळझड झाली.

सिन्नरला जोरदार वादळ
सिन्नरच्या पूर्व भागात सायंकाळी ४ नंतर वादळी पावसाने हजेरी लावली. खोपडी, देवपूर, वावी, शहा,डुबेर आदी भागांत वादळी वार्‍यासह पावसाच्या सरी कोसळल्या. विजांचा कडकडाटही सुरू होता. अचानक आलेल्या पावसाने शेतात उघड्यावर पडलेला शेतमाल झाकताना शेतकर्‍यांची धावपळ झाली. नांदूरशिंगोटे येथे ३० मिनिटे जोरदार गारपीट झाली. देवपूर येथे गारांच्या मार्‍याने कांद्याचे मोठे नुकसान झाले.

LEAVE A REPLY

*