जिल्ह्यात 115 कोटींची तूर खरेदी

0

नाफेडचे 9 ठिकाणी केंद्र; शेतकरी-अधिकारी वादात व्यापार्‍यांचा फायदा

 

अहमदनगर (प्रतिनिधी) – केंद्र सरकारच्या आदेशानुसार नाफेडने जिल्ह्यात 22 एप्रिलपर्यंत 19 हजार 270 शेतकर्‍यांकडून 2 लाख 21 हजार क्विंटल तुरीची खरेदी केली होती. त्यानंतरही नगरसह राज्यात मोठ्या प्रमाणात तूर शिल्लक असल्याने 22 तारखेनंतर राज्य सरकारने तूर खरेदी केली आहे. यात जिल्ह्यातील 395 शेतकर्‍यांकडून 7 हजार 712 क्विंटल तूर खरेदी केली असून त्याचे मुल्य 3 कोटी 395 लाख रुपये आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 19 हजार 615 शेतकर्‍यांकडून 115 कोटी रुपयांची तूर खरेदी करण्यात आल्याची माहिती जिल्हा मार्केटींग फेडरेशनकडून देण्यात आली.
तुरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्याने शेतकर्‍यांच्या तुरीला योग्य हमी भाव मिळावा, व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांची पिळवणूक होऊ नये, यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने शेतकर्‍यांची तूर हमी भावात खरेदी करण्याचा निर्णय घेतला. यासाठी जिल्ह्यात मार्केटींग फेडरेशन आणि नाफेडने 9 ठिकाणी तूर खरेदी केंद्र सुरू केले. मात्र, या केंद्रात तुरीची विक्री करताना शेतकर्‍यांना मोठ्या त्रासाला समोरे जावे लागले. अनेक ठिकाणी बारदाणा संपल्याने शेतकर्‍यांना तूर खरेदी केंद्रावर मुक्काम ठोकावा लागला. अनेक ठिकाणी तूर खरेदी केंद्रातील अधिकारी आणि शेतकरी यांच्यात संषर्घ झाला. या वादात काही व्यापार्‍यांनी आपले उखळ पांढरे करून घेतले आहेत.
जिल्ह्यात नाफेडकडून नगर, जामखेड, पारनेर, मिरजगाव (कर्जत), शेवगाव, पाथर्डी, नेवासा, श्रीरामपूर आणि वांबोरी (ता. राहुरी) या ठिकाणी तूर खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली. याठिकाणी नाफेडने 111 कोटी 61 लाख रुपयांची 2 लाख 21 हजार क्विंटल तूर खरेदी केली आहे. 19 हजार 270 शेतकर्‍यांना त्याचा फायदा झाला. त्यानंतर सरकारने 22 तारखेपासून तूर खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र, शेतकर्‍यांकडे मोठ्या प्रमाणात तूर शिल्लक असल्याचे सरकारच्या निदर्शनास असल्यानंतर राज्य सरकारने शेतकर्‍यांची हमीभावाने तूर खरेदी करण्याचा निर्णय घेतला.
यात जिल्हा मार्केटींग फेडरेशनने 395 शेतकर्‍यांकडून 7 हजार 712 क्विंटल तूर खरेदी केली आहे. या तूरीची किंमत 3 कोटी 98 लाख रुपये एवढी असल्याचे जिल्हा मार्केटींग फेडरेशनच्यावतीने सांगण्यात आले.

 

 केंद्र सरकारने 31 मे पर्यंत तूर खरेदीस मुदत वाढ दिलेली आहे. येत्या दोन दिवसांत जिल्ह्यात महसूल, कृषी, सहकारी खात्याने 25 हजार 477 क्विंटल तूरीची नोंदणी केली आहे. शेतकर्‍यांचा सात बारा आणि आधार कार्डच्या आधारे ही नोंदणी करण्यात आलेली आहे. नोंदणी झालेल्या तूरीची दोन दिवसांत खरेदी पूर्ण होणार आहे. त्यानंतर पुन्हा तूरीची खरेदी करण्यात येणार नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 

 नाफेड आणि जिल्हा मार्केटींग फेडरेशन यांच्याकडून खरेदी करण्यात आलेली तूर सध्या जिल्ह्यातील वखार महामंडळाच्या गोडावून मध्ये ठेवण्यात आलेली आहे. यासह पुणे येथील भोसरीलाही सरकारने खरेदी केलेली तूर साठवण्यात आलेली आहे. आणखी काही प्रमाणात तुरीची खरेदी होणार असून ही तूर कोठे साठवावी? असा प्रश्‍न नाफेड आणि जिल्हा मार्केटींग फेडरेशनच्या अधिकार्‍यांसमोर आहे.

LEAVE A REPLY

*