जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचा वाढला आलेख

अडीच महिन्यात १२ शेतकर्‍यांनी संपवले जीवन

0

नाशिक | दि. २२ प्रतिनिधी- जिल्ह्यात जानेवारी ते आजअखेर १२ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. २०१६ ते फेब्रुवारी २०१७ या १४ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ९५ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे. शेतकरी आत्महत्येप्रश्‍नी सरकारने जिल्हा प्रशासनाला उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र याबाबत जिल्हा प्रशासन फारसे गंभीर नसल्याचे दिसून येते. त्यामुळेच जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचा आलेख वाढत असल्याचे दिसून येते. मंगळवारी सिन्नर तालुक्यातील दोन शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे जिल्ह्यात आत्महत्यांचे सत्र सुरूच असल्याचे दिसून येते.

गेल्यावर्षी आवर्षणाच्या समस्येमुळे मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांनी कर्जबाजारी आणि नापिकीला कंटाळून आपले जीवन संपवले. राज्यभर शेतकरी आत्महत्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने शासनाने लागलीच शेतकर्‍यांचा समुपदेशनाचा पर्याय त्यावर शोधला. सर्वच जिल्हाधिकार्‍यांना त्याचे आदेशही दिले. पण नाशिक जिल्ह्यात जवळपास ९५ आत्महत्या झाल्या असतानाही अपेक्षेप्रमाणे समुपदेशनाचे उपक्रम राबवलेच गेले नाहीत.

केवळ अपर जिल्हाधिकारी मालेगाव यांच्या कार्यक्षेत्रातील देवळा, नांदगाव, चांदवड, मालेगाव, कळवण आणि बागलाण या सात तालुक्यांत आठ कार्यक्रम झाले. तर चार कार्यक्रम ग्रामीण भागात घेतले. त्यात महसूलसह इतर विभाग आणि बँकांचाही त्यांनी सहभाग करून घेतला होता. त्याव्यतिरिक्त संपूर्ण जिल्हास्तरावर एकही कार्यक्रम याबाबत झाला नाही. विशेष म्हणजे या शेतकर्‍यांना समुपदेशन करण्यासह त्यांना शासकीय योजनांची माहिती देत त्यांना या योजनांचा लाभही सहज मिळवून देण्याबाबत केवळ चर्चा झाली.

परंतु प्रत्यक्षात काहीच झाले नाही. त्यामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढतच आहेत. यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे कदाचित प्रशासनाने या विषयाकडे कानाडोळा केल्याची शक्यता आहे. परंतु २०१७ सालातील जानेवारी ३, फेब्रुवारी ५ आणि मार्च महिन्यात आजपर्यंत ४ अशा १२ शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. मंगळवारी सिन्नर तालुक्यातील सोनगिरी येथील शेतकरी भिका बोडके (४४) तर मौजे शिवडे येथील अरुण सोनकांबळे यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली.

तालुका    आत्महत्या
बागलाण    २
चांदवड      १
सिन्नर     २
कळवण     १
मालेगाव     २
नांदगाव      १
निफाड       १
येवला        २

LEAVE A REPLY

*