जिल्ह्यात वादळी दणका, पारनेरात वीजबळी

0

अनेक ठिकाणी घरांची पत्रे उडाली, झाडे उन्मळून पडली, वीज पुरवठा खंडित

अहमदनगर – नगर जिल्ह्याच्या विविध भागात वादळी पावसाने जोरदार दणका दिला. पारनेर तालुक्यात कर्जुले हर्या येथील 23 वर्षीय तरूण गोकुळ सुरेश वाघ याच्या अंगावर वीज कोसळल्याने मृत्यू झाला. तर ढोकीत आठ मेंढराचा वीज पडून मृत्यू झाला. श्रीरामपूर व पुणतांब्यात वीज पडून दोन गायी गतप्राण झाल्या. तसेच पुणतांबा, नगर तालुका, शेवगाव, राहाता तालुक्यातील बाभळेश्‍वर येथे अनेक घरांचे पत्रे उडाले तर अनेक झाडं उन्मळून पडली.

 

क्रिकेट खेळत असताना अंगावर वीज कोसळली कर्जुले हर्यातील तरूणाचा करूण अंत, दोघे बचावले

 

पारनेर (प्रतिनिधी)- तालुक्यात गुरूवारी दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान झालेल्या वादळी पावसाने कर्जुले हर्या येथील 23 वर्षीय तरूण गोकुळ सुरेश वाघ याचा टाकळी ढोकेश्वर येथील नवोदय विद्यालयाच्या क्रिडांगणावर क्रिकेट खेळताना अंगावर वीज पडल्याने जागीच मृत्यू झाला. तर ढवळपुरी येथील अन्सार यासिम पटेल (वय-27) व राजाराम जानकू डावखर (वय-45 राहणार – बेल्हा ता-जुन्नर) हे दोघे जखमी झाले असून या वीजधक्क्यातून बालबांल बचावले.

 
या जखमींवर टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.तर मयत गोकुळ सुरेश वाघ याच्या मृतदेहाची टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रूग्णालयात उत्तरीय तपासणी आणण्यात आले होते.
या घटनेची माहिती कळताच पारनेरच्या तहसिलदार भारती सागरे व सपोनि.संजय मातोंडकर, पो.कॉ.आंबा ढोले, संजय पवार यांनी टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रूग्णालयात भेट देत जखमींची विचारपूस केली.

 
टाकळी ढोकेश्वर येथील युवकांनी गेल्या दोन ते दिवसांपासून नवोदय विद्यालयाच्या क्रिडांगणावर क्रिकेट स्पर्धाचे आयोजन केले असून गुरूवारी दुपारी 3 वाजणेच्या सुमारास क्रिकेटचा सामना सुरू होता.

 
त्याचवेळी सुसाट वार्‍यासह पावसाला सुरूवात झाली. फिल्डींग करत असताना गोकुळ सुरेश वाघ याच्या अंगावर अंगावर वीज पडल्याने तो जागीच मृत्यू पावला. याच ठिकाणी काही अंतरावर असणारे अन्सार यासिम पटेल याला पण धक्का बसल्याने तोही खाली कोसळला होता परंतु लगेच उठला.

 
तसेच या सामन्या दरम्यान पंच म्हणून काम करणारे राजाराम जानकु डावखर यांनाही धक्का बसला असून ते किरकोळ जखमी झाले आहेत.

 

पुणतांब्यात शाळेचे पत्रे उडाले, वीजही कोसळली 

 

पुणतांबा (वार्ताहर)- परिसरात काल सायकांळी 5 वाजेनंतर वादळी वार्‍यासह वीजेच्या कडाक्याने वातावरण एकदम बदलले. वार्‍याबरोबरच पावसाने हजेरी लावली वार्‍यामूळे येथील जिल्हा परिषद शाळेचे पत्रे वाकले व पडवीचे नुकसान झाले.

 
दरम्यान, पुणतांबा रोडवरील गुलाब इनामदार याच्या शेतातील जांबळाच्या ाडावर वीज कोसळली. त्यामुळे झाडाला बांधण्यात आलेल्या गायीचा मृत्यू झाला.

 
जळगाव पुणतांबा शिव रस्यावर निलगिरीचे झाड पडले तर गावात रयत हायस्कूलकडे जाणार्‍या रस्त्यावर तसेच अचानक चौक परिसर वाकडी रोड भागात अनेक झाडे पडली ज्या शेतक यांनी कांदा चाळीत भरून ठेवला होता त्या चाळी झाकण्यासाठी लावलेले बारदाने फ्लास्टिक कागद उडाल्यामुळे कांदा चाळीचे नुकसान झाले वादळी वार्‍यामुळे पुणतांबा येथे स्टेशन रोडवर शिवाजी चौकात धरणे आंदोलनासाठी टाकलेला मंडप जमीनदोस्त होऊन त्याचे नुकसान झाले पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे.

 
येथील सेवाभावी असलेल्या आशा केंद्रातही अनेक झाडे उन्मळून पडळी त्यामूळे इमारतीच्या पत्र्यांचे नुकसान झाले तरी झाडाच्या फांद्या पडून काही गाडयांचे नुकसान झाले सोन्याबापू धनवटे यांच्या घराचेही मुकसान झाले वादळी वा र्‍यामुळे काही टपर्‍या रस्ट यावर आल्या त्यांचेही नुकसान झाले

 

नगर तालुक्यात दाणादाण

 

अहमदनगर (प्रतिनिधी) – गुरुवारी दुपारी वादळाने नगर तालुक्यातील सारोळा कासार, बांबुर्डीबेंद या गावातील घरांचे तर, अरणगांवच्या सहकारी सोसायटीचे पत्रे उडाले आहे. निंबळक, हिंगणगाव, खडकी खंडाळा या गावासह तालुक्यातील इतर गावात वादळी वार्‍यासह पाऊसाने हजेरी लावली आहे.

 

नगर-दौंड रस्त्यावर झाड पडल्याने अर्धा-एक तास वाहतूक खोळबंली.दरम्यान जि.प. सदस्य संदेश कार्ले यांनी घटनास्थळी जेसीबी पाचारण करुन रस्ता वाहतूकीसाठी मोकळा करुन दिला.तर, अरणगावातील नदीच्या पुलावर मोठे झाड पडले. सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेऊन पूल मोकळा केला. नगर शहरातही वादळाने अनेकांची दाणादण उडविली.

 

बाभळेश्‍वर, अस्तगावात दाणादाण, प्रचंड नुकसान

400 घरांची पत्रे उडाली, राहात्यात बाजारकरूंचे हाल, पंचनामे आज करणार

 

राहाता (वार्ताहर)- राहाता परिसराह तालुक्यात गुरूवारी वादळी पावसाने थैमान घातले. तालुक्यातील पुणतांबा, अस्तगाव, बाभळेश्‍वर येथे वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला. चोळकेवाडी येथे गारा पडल्या तर पुणतांबा येथे अंगावर वीज पडून गाय ठार झाली. अनेक घरांचे पत्रे उडाले तर मोठ मोठी वृक्ष उन्मळून पडले. बाभळेश्‍वर परिसरात सर्वाधिक नुकसान झाले.

 

झाडे पडून अनेक वाहने झाडांखाली दाबली गेली आहेत. विजेचे पोल कोसळून अनेक ठिकाणी तारा जमिनीवर पडल्या आहेत. तालुक्यात एकूण 400 घरांची पत्रे उडाली तर आठ ते दहा जनावरे दगावल्याचे तहसिलदार माणिकराव आहेर यांनी सांगितले.यात बाभळेश्‍वर येथे सर्वाधिक नुकसान असल्याचे त्यांनी सांगितले. या नुकसानीचे पंचनामे आज शुक्रवारी करणार आसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 
वादळाने सर्वत्र धुळीचे लोट त्याचबरोबर मोठमोठी झाडे जमीनदोस्त होताना दिसत होती. शेतातील कांद्या वरील कागदे उडून गेल्याने कांदाही भिजला काही घरांची तर शेडची पत्रे उडाली. सर्वाधिक नुकसान आंब्याच्या झाडांचे झाले.

 

झाडाखाली कैर्‍यांचा सडा पडला संपूर्ण झाडांची आंबे या वादाळाच्या तडाख्यात जमिनीवर आली. राहात्याच्या आठवडे बाजारात तर या वादळी वार्‍याने दाणादाण उडली. ग्राहकांचे हाल झाले तर व्यापार्‍यांचे मोठे नुकसान झाले पाच वाजताच व्यापार्‍यांनी घरचा रस्ता धरला विजेचे पोल पडल्याने चार वाजेपासून संपूर्ण तालुक्यातील विज पुरवठा खंडीत झाला आहे. एकरूखे येथील शंकर कार्ले यांच्या घराचे पत्रे उडाले. तर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली.

 

घरांचे छत उडाले, महिला जखमी

 

अस्तगाव (वार्ताहर)- अस्तगाव परिसरात वादळी पावसाने राहात्या घरांचे छत उडाले, छताच्या वरील वरवंडी पडून एक महिला जखमी झाली. अनेक ठिकाणी झाडे, तसेच काही ठिकाणी फांद्या निखळून पडल्या. आंब्याच्या झाडांच्या कैर्‍यांचा टपारा झाला. डाळींबाचे नुकसान झाले. दीड तासांच्या पावसाने अनेक ठिकाणी पाणी साचले होते. तर अस्तगाव- पिंप्रीनिर्मळ रस्त्यावरुन पाणी वाहत होते.

 
सायंकाळी साडेचार च्या दरम्यान वादळ सुरु झाले. काही वेळेतच पावसाने हजेरी लावली. वादळाने उग्र रुप धारण केल्याने त्याचा मोठा फटका परिसराला बसला. विशेष करुन चोळकेवाडी परिसरात मारुती तुकाराम चोळके या शेतकर्‍याच्या घरावरील पत्र्याचे छत पत्त्या सारखे उडून गेले.

 

त्यातच पत्र्याच्या छतावर असलेल्या वरवंडी खाली पडल्याने घरात असलेल्या त्यांच्या सुन कुसूम बाळासाहेब चोळके यांच्या गुडघ्याच्या खाली फॅक्चर झाले. त्यांना श्रीरामपूर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या घराचे पत्रे उडाल्याने घरातील 15 पोती धान्य भिजले.

 

तसेच इतर सर्वच संसारोपयोगी वस्तुंचे नुकसान झाले. चोळकेवाडी येथीलच शिवराम रंगनाथ जेजुरकर यांचेही घराच्या दोन खोल्यांचे पत्रे उडाले. त्यांच्या घरातील संसारोपयोगी वस्तु, तसेच सहा पोती धान्यही भिजले. या दोन्ही शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. गावातील सुदाम ठाकरे यांचे चाळीसवाडी भागातील घराचे छत उडाले.

 

त्यांचाही संसारोपयागी वस्तुंचे नुकसान झाले.रांजणगाव रस्त्यावरील भागवत तबाजी सापते यांचे राहाते घराचे छप्पर उडाले. त्यांच्याही संसारोपयोगी वस्तुंचे नुकसान झाले. 10 पोते धान्य भिजले. .

 
या वादळी पावसाने डाळींब बागांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक बागांमध्ये झाडे जमिनदोस्त झाली आहेत. अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य सुनिल चोळके व विजय अंभोरे यांनी दिली. तर चोळकेवाडी भागात काही ठिकाणी हरबर्‍याच्या आकाराच्या गाराही पडल्या.

 

वादळाने विजेचे खांब कलले आहेत. तर काही ठिकाणी विजेच्या तारा खांबावरुन निखळून पडल्या आहेत. त्यामुळे अस्तगाव, चोळकेवाडी परिसरातील विज पुरवठा खंडीत झाला आहे. मोरवाडी फाटा येथील खैरकर यांच्या बंगल्यावर मेन लाईनच्या तारा निखळून पडल्या आहेत. आंब्याच्या झाडांवरील कैर्‍यांचा टपारा झाला आहे. अशी माहिती नारायण गणपत चोळके यांनी दिली.

 

अनेक ठिकाणी डाळींबाचे झाडे वाकली आहेत. काढणीला आलेले डाळींब झाडावरुन जमिनीवर पाण्यात पडली आहेत. भानुदास गवांदे यांचे कांदे भिजले. ज्ञानेश्‍वर चोळके यांच्या पाऊण एकर आंब्याच्या बागेचे प्रचंड नुकसान झाले. त्यांच्या घराजवळील आंब्यांचे नुकसान झाले. दरम्यान, काही ठिकाणी गटारींवर अतिक्रमण झाल्याने पाणी रस्त्यावरून वाहत होते.

 

डीपी कोसळल्याने राहाता, शिर्डी, श्रीरामपूर अंधारात

बाभळेश्‍वर (वार्ताहर)- दुपारी 3.30 वाजता अचानक मेघ गर्जनासह आलेल्या वादळी पावसाने शेतकर्‍यांसह सामान्य जनतेची तारांबळ उडाली. शेतकर्‍यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात कांदा पडून होता. या पावसामुळे बर्‍याच प्रमाणात कांदा भिजला. वादळी पावसामुळे चाळीमधीलही कांदा भिजला. दरम्यान मोठी डीपी आणि अनेक विजेचे खांब कोसळल्याने शिर्डी, राहाता आणि श्रीरामपूर तालुका अंधारात होता.

 
महावितरणचे अधिकारी व कर्मचारी रात्री उशीरापर्यंत वीज सुरू करण्यासाठी कार्यरत होते. श्रीरामपूरातील काही भागात उशीरा वीज सुरू करण्यात त्यांना यश आले.

 
शेतकर्‍यांची कांदा झाकण्यासाठी धावपळ झाली. वारा हा मोठ्या प्रमाणात वादळी असल्यामुळे रस्त्यावरील वाहन चालविताना चालकांना अडचण येत होती. रस्त्यावरील उभ्या असलेल्या दुचाकी वार्‍यामुळे खाली पडल्या. त्यामुळे वाहन धारकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले. महावितरणाच्या लाईनवर मोठ्या प्रमाणात झाले पडली.

 

विजेचे पोल पडले. सर्वत्र झाडे उखडून पडली. जिल्हा परिषद शाळेमधील बरीच झाडे पडली. शाळा बंद असल्यामुळे मोठी हानी टळली. बर्‍याच ठिकाणी झाडे पडल्यामुळे महावितरणाची लाईट बंद होती. रस्त्यावर पडलेली तसेच लाईनवर पडलेली झाडे हटविण्याचे काम सुरु होते.

 

 

बाभळेश्‍वर अतिक्रमण हटविल्यामुळे तात्पुरते सुरु केलेल्या व्यावसायिकांची चांगलीच तारांबळ उडाली. प्रवरा डेअरी मिल्क बार जवळील झाड पडून त्याखाली दुचाकी दाबली गेली. असे अचानक झालेल्या पावसामुळे नुकसान झाले.

 

शेवगावातही  तडाखा

 

शेवगाव ( तालुका प्रतिनिधी ) – तालुक्यातील जायकवाडी जलाशयाच्या किनारपट्टीच्या भागातील खुंटेफळ, ताजनापुर, बोडखे, दहिफळ परिसरात आज सायंकाळी मान्सुनपूर्व पावसाने जोराच्या वार्‍यासहीत काही काळ पावसाने सलामी दिली. वार्‍याच्या वेगामुळे काही झाडे रस्त्यावर आडवी झाली. शेतकर्‍यांची पळापळ झाली. तर शेवगाव शहर व परिसरातही रात्री 7.30 वाजता वार्‍यासाहित पाऊस सुरु झाला.

 
शेतातील पालेवर्गीय भाज्या, आंबा, चिकु, डाळिंब तसेच टरबुज व खरबुज वाड्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले. शेतात काढुन ठेवलेला कांदा झाकुन तसेच कांदा चाळी झाकुन ठेवण्यासाठी शेतकर्‍यांची धांदल उडाली. चारावर्गीय मका, कडवळ वार्‍यामुळे शेतात आडवी झाली.

 

वार्‍यामुळे काही भागात वीज पुरवठा खंडीत झाला होता. शेवगाव शहर, अमरापूर, फलकेवाडी, भगुर व परिसरात वारा व वीजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला. पाऊस सुरु होताच शेवगाव मधील वीजपुरवठ खंडीत झाला.

LEAVE A REPLY

*