जिल्ह्यात पावणेदोन लाख शेतकरी कर्जदार

0

कर्जाची रक्कम 730 कोटी, जिल्हा बँकेकडून राज्य बँकेकडे माहिती सादर

अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्य सरकारने राज्य सहकारी बँकेमार्फत एक लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी कर्ज असणार्‍या शेतकर्‍यांची माहिती मागविली होती. त्यानुसार गेल्या 15 दिवसांत जिल्हा बँकेने जिल्ह्यातील एक लाख रुपये कर्ज असणार्‍या शेतकर्‍यांची माहिती संकलित केली आहे. यात एक लाख 71 हजार 300 शेतकर्‍यांकडे एक लाख अथवा त्यापेक्षा कमी कर्ज असल्याची माहिती जिल्हा सहकारी बँकेने राज्य सहकारी बँकेला पाठविली आहे. या सर्व कर्जाची एकूण रक्कम 730 रकोटी रुपये इतकी आहे.
उत्तर प्रदेशात भाजप सरकारने अल्पभूधारक शेतकर्‍यांचे कर्ज माफ केल्यानंतर राज्यात भाजपविरोधी सर्वच पक्षांनी शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसंदर्भात रान उठविले आहे. विधानसभा, विधान परिषद ते संघर्ष यात्रा काढून विरोधकांनी भाजप सरकारला कर्जमाफीसाठी वेठीस धरले. जिल्ह्यापासून मंत्रालयापर्यंत कर्जमाफीसाठी आंदोलन झाल्याने भाजप सरकारने एक लाख रुपयांच्या आत कर्ज असणार्‍या शेतकर्‍यांची माहिती मागविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सरकारकडून राज्य सहकारी बँकेला निर्देंश देण्यात आले. राज्य बँकेनेही जिल्हा बँकांना पत्र पाठवून एक लाख रुपयांपर्यंत कर्ज असणार्‍या थकबाकीदार शेतकर्‍यांची आकडेवारी आणि कर्जाची आकडेवारी मागविली आहे.
गेल्या महिन्यात जिल्हा बँकेने ही आकडेवारी गाव पातळीवर असणार्‍या सोसायट्यांकडून मागविली आहे. यात 31 मार्च 2017 अखेरपर्यंत एक लाख रुपयांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकर्‍यांचा आकडा एक लाख 71 हजार 300 इतका आहे. तर थकीत कर्जाचा आकडा 730 कोटी रुपये आहे.
नुकत्याच झालेल्या 1 मे च्या ग्रामसभेत जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायतींमध्ये संपूर्ण कर्जमाफीचा ठराव मांडण्यात आला आहे. अद्याप मात्र, राज्य सरकारकडून कसलीही घोषणा झालेली नाही. याउलट शेतमालाचे अधिक उत्पादन वाढविण्यासाठी उपाययोजना करणार असल्याची घोषणा सरकारने केली. कर्जमाफीची मागणी अद्याप मात्र कमी झालेली दिसून येत नाही. किमान उत्तरप्रदेशच्या धर्तीवर शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळेल अशी आशा शेतकरी लावून बसलेले आहेत.

 

वसुलीला ब्रेक
तीन वर्षांत दुष्काळ परिस्थिती असतानाही कर्ज वसुलीस वेग होता. याउलट यंदा मोठ्या प्रमाणात उत्पादन असताना कर्जवसुली नगण्य आहे. कर्जमाफीच्या चर्चेमुळे यंदा कर्ज वसुली रोडावली आहे. 31 मार्च अखेरपर्यंत 11 टक्के असणारी वसुली केवळ बँकेने शेतकर्‍यांना केलेल्या आवाहनामुळे 33 टक्क्यांपर्यंत पोहोचली. दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने एक लाख रुपयांपर्यंत केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेमुळे पुन्हा वसुलीस ब्रेक मिळाला आहे.

 अकोले – 17 हजार 256 (88 कोटी), जामखेड – सात हजार 560 (37 कोटी), कर्जत – आठ हजार 603 (39 कोटी), कोपरगाव – पाच हजार 280 (20 कोटी), नगर – 18 हजार 510 (89 कोटी), नेवासा – 12 हजार 688 (59 कोटी), पारनेर – 21 हजार 946 (79 कोटी), पाथर्डी – 10 हजार 859 (39 कोटी), राहाता – नऊ हजार 992 (41 कोटी), राहुरी – 11 हजार 873 (49 कोटी), संगमनेर – 15 हजार 194 (63 कोटी), शेवगाव – 14 हजार 129 (60 कोटी), श्रीगोंदा – 10 हजार 632 (37 कोटी), श्रीरामपूर सात हजार 487 (28 कोटी). अशी एकूण एक लाख 71 हजार 300 शेतकरी सभासद आहेत. 

LEAVE A REPLY

*