जिल्हा बँकेला नाबार्डची क्लिनचिट : आ. पिचड

0

जिल्हा बँकेच्या सर्व शाखांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे : गायकर

अकोले (प्रतिनिधी) – नोटाबंदीच्या काळात जिल्हा सहकारी बँकेत 168 कोटी रुपयांची रक्कम जमा झाली.त्याची संशयास्पद नोंद करून राज्य व केंद्र सरकारने त्याची चौकशी म्हणून नाबार्डची नियुक्ती केली. त्यांनी केलेल्या चौकशीत जिल्हा बँकेला क्लिन चिट चा सिग्नल मिळाला आहे. मात्र सरकार त्याची दखल घ्यायला तयार नाही, अशी खंत युवा आमदार वैभव पिचड यांनी काल व्यक्त केली. तर जिल्हा सहकारी बँक जिल्ह्यातील सर्व 288 शाखांमध्ये सीसीटीव्ही कमेरे बसविणार आहे, अशी घोषणा काल बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांनी केली.
अकोले येथे जिल्हा सहकारी बँकेच्या आवारात पहिल्या एटीएमचे उदघाटन आ. वैभव पिचड यांच्या हस्ते झाले.त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आ.पिचड बोलत होते.तर कार्यक्रमाच्या अधक्षस्थानी सीताराम गायकर होते. व्यासपीठावर बँकेचे सरव्यवस्थापक रावसाहेब वर्पे, मीनानाथ पांडे, प्रकाश मालुंजकर, गुलाब शेवाळे, सुरेश गडाख, रवींद्र चोथवे, संदीप शेटे, सचिन शेटे, विक्रम नवले, अशोक देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
आ. पिचड म्हणाले, राज्य व केंद्र सरकार राष्ट्रीयीकृत बँकेला एक न्याय देते. तर सहकारी बँकेला दुसरा न्याय देते. नोटाबंदीच्या काळात जमा झालेल्या 500 व 1000 रुपयांच्या नोटा जिल्हा बँकेत जमा झाल्या. त्यापोटी 168 कोटी रुपये बँकेत जमा झाले. मात्र त्या बदली सरकार काहीच पावले उचलत नाही. उलट त्याची चौकशी करण्यासाठी नाबार्डची नियुक्ती केली गेली. आता त्यांचा अहवाल निल आला आहे. त्याचा निर्णय सरकारने घेतला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
गायकर म्हणाले, जिल्ह्यातील सर्व 288 शाखेत सेसीटीव्ही कमेरे बसविले जाणार आहेत. त्यापैकी काही ठिकाणी ते बसविले गेले आहेत. प्रायोगिक तत्वावर तालुक्यात 5 एटीएम बसविले जाणार आहेत. तर सेवा सोसायटीमध्ये 600 मायक्रो एटीएम बसविले जाणार आहेत. यामुळे सेवा सोसायट्या थेट जिल्हा बँकेशी जोडल्या जातील.

बँक कर्मचार्‍यांच्या वेतनात वाढ, कारखान्यांना कर्ज वाटप, जिल्हा बँक कोअर बँक करणे या व अन्य गोष्टींचा उल्लेख करून असे काम राज्यातील सातारा, पुणे व नगर जिल्ह्यात चालू आहे.असे त्यांनी निदर्शानास आणून दिले. मीनानाथ पांडे, अशोक देशमुख यांची यावेळी भाषणे झाली. प्रास्ताविक बँकेचे सरव्यवस्थापक रावसाहेब वर्पे यांनी केले. आभार सुभाष घुले यांनी मानले.

LEAVE A REPLY

*