जिल्हा बँकेतील नोटा बदलीप्रकरणाच्या चौकशीसाठी जि.प.चे दोन अधिकारी सीबीआयच्या ताब्यात

0

जळगाव |  प्रतिनिधी :  केंद्र शासनाच्या नोटबंदीच्या निर्णयानंतर नोटा बदलण्यासाठी अनेकाकडून नोटा बदलण्याची धावपळ सुरु होती. या काळात नोटा बदली केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेतील दोन अधिकार्‍यांना सीबीआयने चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याचे समजते.

नोट बदली प्रकरणात सीबीआयच्या पथकाकडून जिल्हा बँकेत कार्यकारी संचालकांची चौकशी करण्यात आली होती. तसेच या प्रकरणात जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालकांसह चोपडा येथील शाखेचे व्यवस्थापक व रोखपाल यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. जिल्हा बँक प्रकरणाचे धागेदोरे जिल्हा परिषदेपर्यंत पोहचले आहे.

दरम्यान आज जिल्हा परिषदेत सीबीआयच्या पथकाकडून दोन अधिकार्‍यांची चौकशी झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. या चौकशीत जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी तथा ग.स सोसायटीचे माजी अध्यक्ष सुनिल सुर्यंवशी व बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता नंदू पवार या दोघांचा समावेश असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. तसेच याच बांधकाम विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक भुषण तायडे यांना देखील चौकशीसाठी बोलविण्यात आले असल्याचेही माहिती समोर आली आहे.

सकाळपासून सीबीआयचे चार अधिकारी बीएसएनएलच्या एक्सेंज गेस्टहाऊस मध्ये थांबून होते. त्यानंतर दुपारी १२.४० वाजेच्या सुमारास जिल्हा परिषदेत सीबीआयच्या पथकाने येवून सुनिल सुर्यवंशी व नंदू पवार यांची सुमारे दिड तास कसून चौकशी करून त्यांना पुढील चौकशीसाठी सोबत घेवून गेल्याची माहिती समोर आली आहे.

दोन्ही अधिकारी नॉटरिचेबल

या चौकशीसंदर्भांत माहिती घेण्यासाठी सुनिल सुर्यवंशी व नंदू पवार यांच्याशी संपर्क साधला दोन्ही अधिकारी नॉटरिचेबल होते. दरम्यान दुपारी २.३० वाजेपासून दोन्ही अधिकारी त्यांच्या आस्थापनाठिकाणीही हजर नव्हते.

LEAVE A REPLY

*