जिल्हा बँकेकडून जि.प.चे 17 कोटी परस्पर खर्च ; जि.प. खाते बंद करून ठेवी काढून घेण्याच्या तयारीत

0

नाशिक : स्वच्छ भारत अभियानातंर्गत घरोघरी शौचालय बांधण्यासाठी आणि गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी शासनाने जिल्हा परिषदेच्या ग्रामीण स्वच्छता पाणीपुरवठा विभागाला दिलेले 17 कोटी रुपये जिल्हा मध्यवर्ती बँकेने परस्पर खर्च केले. त्यामुळे जि.प.प्रशासनला जिल्हा बँकेच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची तयारीही केली होती.

केंद्र सरकार आणि राज्य शासन यांची स्वच्छ भारत मिशन ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेतंर्गत जिल्ह्यात घरोघरी सुमारे एक लाख शौचालये बांधून ग्राम हागणदारीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सीईओपासून ते जिल्हाधिकार्‍यांपर्यंत मार्च अखेर जीवाचे रान केले आहे. लक्ष्य पूर्ण झाल्याने जिल्हा परिषदेच्या ग्राम स्वच्छता आणि पाणीपुरवठा विभागाला सुमारे 17 कोटी रुपये आजच कोषागारातून वर्ग करण्यात आले होते. हे पैसे जि.प.चे खाते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत असल्याने तेथे जमा झाले होते.

मात्र जिल्हा बँकेने आपल्या खातेदारांना जमा झालेल्या धनादेशापोटी ही रकम परस्पर वाटून टाकली. ज्यावेळी जि.प.च्या स्वच्छता विभागाचे अधिकारी ही रक्कम जिल्हा बँकेतून स्टेट बँकेत वर्ग करण्याच्या प्रक्रियेसाठी जिल्हा बँकेत गेले तेव्हा त्यांना लक्षात आले की, जि.प.च्या खात्यावर जिल्हा बँकेत पैसेच नाही. जिल्हा बँक प्रशासनाकडे याची चौकशी जेव्हा अधिकार्‍यांनी केली तेव्हा त्यांना सांगण्यात आले की, रकम आमच्याकडून खर्च झाली आहे.

आमच्या खातेदारांचे धनादेश आलेले असल्याने बँकेत जमा झालेल्या रकमेचे वितरण त्यांना करण्यात आले. जि.प.च्या अधिकार्‍यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांच्या लक्षात ही बाब आणून दिली. त्यामुळे ही बाब गंभीर असल्याचे सांगत जि.प.प्रशासनाने जिल्हाधिकार्‍यांच्या लक्षात हे आणून दिले

त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी जिल्हा बँकेच्या अधिकार्‍यांना धारेवर धरत पैसे कसे काय खर्च केले, याचा खुलासा मागितला होता. त्याचबरोबर जिल्हा बँकेच्या अधिकार्‍यांना सायंकाळपर्यंत जिल्हा बँकेत ठिय्या मांडून पैसे जि.प.च्या खात्यावर वर्ग करून घेण्याचे सूचित केले होते. पैसे जर बँकेकडून आज मिळाले नाहीतर जिल्हा बँक व्यवस्थापनावर पोलीस केस दाखल करण्याची तयारीही जिल्हा परिषद प्रशासनाने केली होती.

जिल्हा बँक नियमावली डावलत असून त्यामुळे आर्थिक व्यवहारांचे कामकाज चुकीच्या पद्धतीने करीत असल्याचा ठपका ठेवत जिल्हा परिषदेने तेथे असलेल्या ठेवी आणि खाते बंद करण्याचा विचार आज झालेल्या प्रकारामुळे बोलून दाखवला. दरम्यान जिल्हा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक यशवंत शिरसाठ यांनी सायंकाळी माहिती देताना म्हटले की, जि.प.चे पैसे खर्च झाले होते. मात्र सायंकाळी पुन्हा आरटीजीएस करून जिल्हा परिषदेच्या खात्यावर खर्च झालेले पैसे वर्ग केल्याचा दावा केला.

LEAVE A REPLY

*