जळगाव जिल्हा परिषदेवर भाजपाचेच वर्चस्व : अध्यक्षपदी उज्ज्वला पाटील तर उपाध्यक्षपदी नंदकुमार महाजन

0
राष्ट्रवादी अध्यक्षपदाच्या उमेदवार १० मतांनी पराभूत; राष्ट्रवादीचे तीन सदस्य गैरहजर
जळगाव | प्रतिनिधी :   जिल्हा परिषदेवर भाजपाने निर्विवाद वर्चस्व मिळविले असून अध्यक्षपदाच्या निवडीत भाजपाच्याअध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या उमेदवाराला ३७ तर राष्ट्रवादी शिवसेनेच्या उमेदवाराला २७ मते मिळाली.
त्यामुळे अध्यक्षपदी कासोदा-आडगाव गटातून निवडून आलेल्या उज्ज्वल पाटील यांची तर उपाध्यक्षपदी निंभोरा-तांदलवाडी गटातून निवडून आलेले नंदकुमार महाजन यांची निवड झाली आहे.
जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेपासून भाजपाला दुर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी व  शिवसेनेने एकत्रित येवून अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा उमेदवार दिला होता. जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहु महाराज सभागृहात निवड प्रकिया पार पडली. सकाळी सुरवातीला ११ ते १ या वेळेत अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी  उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
सकाळी ११.०५ मिनिटांनी शिवसेनेचे गटनेते रावसाहेब पाटील यांनी अर्ज नेले होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे गटनेते शशिकांत पाटील यांनी तर शेवटी भाजपाकडून उज्ज्वला पाटील व नंदू महाजन यांनी अर्ज नेले. त्यानंतर राष्ट्रवादीतर्फे अध्यक्षपदासाठी जयश्री अनिल पाटील यांनी शिवसेनेकडून उपाध्यक्षपदासाठी गोपाल चौधरी यांनी अर्ज दाखल केले तर भाजपाकडून अध्यक्षपदासाठी उज्ज्वला मच्छिंद्र पाटील तर उपाध्यक्षपदासाठी नंदकुमार महाजन यांनी अर्ज दाखल केल्याने अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी भाजप विरुध्द राष्ट्रवादी शिवसेना अशी लढत निर्माण झाली होती.
या लढतीत भाजपच्या अध्यक्षपदाचे उमदेवार उज्ज्वला पाटील व उपाध्यक्षपदाचे उमेदवार नंदकुमार महाजन यांना ३७ तर राष्ट्रवादीचे अध्यक्षपदाचे उमेदवार जयश्री पाटील व शिवसेनेचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार गोपाल चौधरी यांना २७ मते मिळाली.
राष्ट्रवादीचे तीन सदस्य गैरहजर
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीच्या सभेला राष्ट्रवादीचे असोदा -ममुराबाद गटातून निवडून आलेल्या पल्लवी जितेंद्र पाटील, विवरे-वाघोदा गटातून निवडून आलेले आत्माराम सुपडू कोळी तर दहिवद-पातोंडा गटातून निवडून आलेल्या मिना पाटील सभागृहात अनुपस्थित राहील्याने सभागृहाचे संख्याबळ ६४ झाले होते.
त्यामुळे भाजपाला सत्ता स्थापनेसाठी केवळ ३३ जागा आवश्यक होत्या. दरम्यान भाजपाचे ३३ सदस्य निवडून आले होते. त्यातच कॉंग्रेसच्या चारही सदस्यांनी भाजपाच्या उमदेवाराला मतदान केल्याने भाजपाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी झाले.
कॉंग्रेसच्या चारही सदस्याचे भाजपाला मतदान
भाजपाचे ३३ सदस्य निवडून आले होते. सत्ता स्थापनेसाठी भाजपाला केवळ एका सदस्यांची गरज होती. सुरवातीपासून कॉंग्रेसचे आर.जी पाटील भाजपाच्या संपर्कात होते. दरम्यान आज झालेल्या निवडीत कॉंग्रेसच्या चारही सदस्यांनी भाजपाला मतदान केल्याने भाजपा अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या उमेदवाराला ३७ मते मिळाली.

LEAVE A REPLY

*