जिल्हा परिषदेला निधी मिळवून देऊ : भुसे ; अध्यक्ष, उपाध्यक्षांनी स्विकारला पदभार

0

नाशिक : शिवसेना आणि काँगे्रसची महायुती झाल्याने जिल्हा परिषदेत शिवसेनेचा अध्यक्ष आणि काँगे्रसचा उपाध्यक्ष झाला आहे. दोन्ही पक्षांनी एकमेकांना साथ देत जिल्ह्याचा विकास साधणारी कामे समन्वयाने करावित. राजकारणापलीकडे ही दोन्ही पक्षांची सोबत असावी. कारण जि.प.ही शासकीय योजनांची तळागाळापर्यंत अंमलबजावणी करणारी यंत्रणा आहे. त्या दृष्टीने कामकाज व्हावे, मंत्री म्हणून आपणही शासनाकडून जिल्हा परिषदेला निधी मिळवून देऊ, असे प्रतिपादन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी केले.

जिल्हा परिषदेत नवनिर्वाचित अध्यक्षा शीतल सांगळे आणि उपाध्यक्षा नयना गावित यांनी आज पदभार घेतला. त्यावेळी आयोजित सत्कार समारंभात दादा भुसे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार राजाभाऊ वाजे, निर्मला गावित, शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुहास कांदे, भाऊलाल तांबडे, जिल्हा बँक अध्यक्ष नरेंद्र दराडे, माजी आमदार अनिल आहेर, रामदास चारोस्कर, राष्ट्रवादी काँगे्रसचे गटनेते उदय जाधव, सदस्य नितीन पवार, माजी उपाध्यक्ष संपतराव सकाळे, माजी महापौर यतीन वाघ, महानगर प्रमुख अजय बोरस्ते, काँगे्रस शहराध्यक्ष शरद आहेर, उदय सांगळे आदी मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्षा शीतल सांगळे यांनी तसेच उपाध्यक्ष नयना गावित यांनी त्यांच्या कक्षात सत्यनारायण पूजाविधी करून पदभार घेतला. अध्यक्षा सांगळे या राज्यमंत्री दादा भुसे, आ.वाजे यांच्या उपस्थितीत अध्यक्षांच्या खुर्चीवर विराजमान झाल्या. त्यानंतर जि.प.च्या रावसाहेब थोरात सभागृहात अध्यक्ष, उपाध्यक्षांचा सत्कार सोहळा झाला. त्यावेळी शिवसेना, काँगे्रस, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, नवनिर्वाचित सदस्य, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत चौधरी यांच्यासह खातेप्रमुख उपस्थित होते.

कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते शहीद जवानाच्या वारसदारांना अधिकारी आणि ग्रामसेवक संघटनेने केलेल्या आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. त्याचबरोबर जिल्हा परिषद डायरीचे प्रकाशन यावेळी मान्यवरांनी केले. कार्यक्रमात अध्यक्षा शीतल सांगळे यांनी मनोगत व्यक्त करताना प्रशासनाला पेपरलेस कामकाज आणि तत्पर नस्त्यांचा निपटारा करण्याचे निर्देश यावेळी दिले. तर उपाध्यक्षा नयना गावित यांनी यावेळी सर्वांचे आभार व्यक्त करताना म्हटले की, आपण महिला आणि युवतींचे सक्षमीकरण करण्यावर भर देणार आहोत.

आमदार राजाभाऊ वाजे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, सिन्नरला पहिल्यांदाच जि.प.अध्यक्ष पद मिळालेले आहे. अध्यक्षा शीतल सांगळे या संपूर्ण जिल्ह्याचा विकास करताना जि.प.मध्ये सुशासन आणि विकास यांची गुढी उभारतील. तर आमदार निर्मला गावित यांनी जि.प.मधील महायुतीचा उल्लेख राज्यात चर्चेत असल्याचे मनोगतात सांगितले. त्यांनी म्हटले की, शिवसेना आणि काँगे्रसच्या माध्यमातून जिल्ह्यात चांगले विकासकामे होतील. समस्या मार्गी लागतील.

गुढीपाडव्याच्या निमित्ताने येथे शिवसेना आणि काँगे्रसच्या दिलजमाईची गुढी उभारली. गटनेते धनराज महाले यांनी प्रास्ताविक केले. तर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत चौधरी यांनी आभार मानले. यावेळी जिल्ह्यातून शिवसेना, काँगे्रसचे पदाधिकारी, नवनिर्वाचित सदस्य यांच्यासह खातेप्रमुख अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*