जिल्हा परिषदेत सदस्यपतींची लुडबूड

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेत नव्याने सदस्य मंडळ अस्तित्वात आले आहे. यात निम्म्याहून अधिक महिला सदस्यांचा समावेश आहे. हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या महिला सदस्यांना जिल्हा परिषद प्रशासन, कामकाज, सर्वसाधारण सभा, विविध विभाग आणि त्यांच्या मार्फत होणार्‍या कामांची माहिती आहे. मात्र, उर्वरित महिला सदस्यांना प्रशासनाची माहिती नसल्याने त्यांच्या पतिराजांनी या महिला सदस्यांच्या कामकाजात हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली आहे. परिणामी प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

 
राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने साधारण दहा वर्षापूर्वी पंचायत राज व्यवस्थेत काम करणार्‍या महिला लोकप्रतिनिधीच्या कामात त्यांचे पतीराज अथवा नातेवाईकांचा हस्तक्षेप थांबवण्यासाठी शासन निर्णय काढलेला आहे. हा शासन निर्णय जिल्हा परिषदेत आणि पंचायत समिती पातळीवर पायदळी तुडवला जात असल्याचे समोर आले आहे. जिल्हा परिषदेत नव्याने सदस्य मंडळ अस्तित्वातआले असून आतापासून महिला सदस्यांच्या पतिराजाचा हस्तक्षेप होण्यास सुरूवात झाली आहे.
प्रशासनात महिला सदस्यांच्या पतिराजांचा हस्तक्षेप वाढल्याने अधिकारी वर्गाची डोकेदुखी वाढली आहे. हा प्रकार केवळ जिल्हा परिषदेच्या मुख्यालयापुरता मर्यादीत नसून पंचायत समिती पातळीवर हा प्रकार सुरू आहे. यामुळे दहा वर्षापूर्वी ग्रामविकास विभागाने काढेल्या महिला पतीराजा विरोधातील त्या शासन निर्णयावर कडक अंमलबजावणी होणे आवश्यक झाले आहे.
जिल्हा परिषदेत नव्याने निवडून आलेल्या महिला सदस्यांना मार्गदर्शन आवश्यक आहे. त्यांच्या नातेवाईकांनी अथवा पतीराजांनी या नवख्या महिला सदस्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. मात्र, त्यांच्या पदाचा आधार घेत थेट जिल्हा परिषदेच्या अथावा पंचायत समितीच्या कामकाजात हस्तक्षेप करणे, अधिकार्‍यांना कामे सुचवणे चुकीचे होणार आहे.

जिल्हा परिषदेच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याचा अधिकार सदस्य मंडळाला आहे. सदस्य मंडळ हे लोकनियुक्त प्रतिनिधी असतात. मात्र, त्यांच्या पतीराज अथवा नातेवाईकांनी जिल्हा परिषदेच्या कामकाजात हस्तक्षेप करणे चुकीचे आहे. प्रशासकीय प्रमुख म्हणून जिल्हा परिषदेच्या खाते प्रमुखांना सूचना देण्यात येतील.
रवींद्र बिनवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.

LEAVE A REPLY

*