जिल्हावासियांना भागवावी लागणार 40 टक्क्यांवर तहान

पाच महिन्यात 53 टक्के पाणी वापर; मागणी वाढू लागली; शेतीसाठी आवर्तनाची मागणी

0

नाशिक । दि. 13 प्रतिनिधी – जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये सरासरी 40 टक्के उपयुक्त पाणी असल्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांची पाण्याची चिंता तूर्तास तरी मिटली आहे. नाशिककरांना पाणीपुरवठा होत असलेल्या गंगापूर धरण समूहात यंदा 40 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

मागील वर्षी गंगापूर धरण समूहात 28 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता. विशेष म्हणजे ऑक्टोबरअखेर धरणात 93 टक्के साठा शिल्लक होता. मात्र पाच महिन्यात सुमारे 53 टक्के पाण्याचा विनियोग करण्यात आला. धरणातील उपयुक्त पाणीसाठा विचारात घेता आता उपलब्ध 40 टक्के साठ्यावरच नाशिककरांना तहान भागवावी लागणार आहे.

पालखेड धरण समूहात यंदा 17 टक्के पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी 7 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. गिरणा खोर्‍यात एकूण 74 टक्के पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी केवळ 46 टक्केच पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे गेल्यावर्षी दुष्काळाच्या झळा सोसणार्‍या नाशिक जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यात पाण्याचा सुकाळ राहणार असल्याची चिन्हे आहेत.

मात्र असे असले तरी हेच चित्र पुढील काळात कायम राहील याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही. मागील वर्षी जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडल्यामुळे जिल्ह्यासह शहरवासीयांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. गंंगापूर धरणातून जायकवाडीला पाणी सोडावे लागल्याने टंचाईत अधिकच भर पडली.

यंदा समाधानकारक पाऊस पडल्यामुळे धरणे, बंधारे तुडूंब भरून वाहत होती. तर जलयुक्तच्या कामांमुळे पाण्याचे स्त्रोत वाढल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. परिणामी जिल्ह्यातील धरणांमध्ये अद्यापही मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे मागील वर्षाच्या तुलनेत सध्या धरणात उपलब्ध असलेला पाणीसाठा दुप्पट आहे.

त्यामुळे निदान पुढील चार महिने तरी नागरिकांना पाण्याची कोणतीही चिंता करण्याची गरज नाही. सध्या जिल्ह्यात तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. गेल्यावर्षी याच काळात सुमारे 300 टँकरद्वारे ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करण्यात येत होता.

गेल्यावर्षी धरणातील सर्व पाणी पिण्यासाठीच आरक्षित करण्यात आले असल्याने शेतीला पाणी मिळू शकले नाही. यंदा शेतकर्‍यांकडून सिंचनासाठी पाण्याचे आवर्तन देण्याची मागणी होऊ लागली आहे.

LEAVE A REPLY

*