जिल्हाध्यक्षपदाच्या चर्चेत सुजीत झावरे

0

पक्षीय पातळीवर ना हाल…ना चाल,
नेते वर्धापनदिनाच्या नियोजनात व्यस्त

 

अहमदनगर (प्रतिनिधी)- दोन दिवसांपासून नगर शहर आणि पारनेर तालुक्याच्या सोशल मीडियामध्ये राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी सुजित झावरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब असल्याची पोस्ट फिरत आहे. प्रत्यक्षात पक्षीय पातळीवर माहिती घेतली असता जिल्हाध्यक्ष बदलाबाबत कोणतीच हाल अथवा चाल सुरू नसल्याचे समोर आले आहे. मात्र, निमित्त काही असो जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर नगर-पारनेरच्या राजकीय पटलावरून गायब झालेले माजी जिल्हा परिषद सदस्य सुजित झावरे पुन्हा चर्चेंत आले आहेत.

 

एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणार्‍या नगर जिल्ह्यात आजही ग्रामीण भागात काँग्रेसच्या बरोबरीने ताकद आणि कार्यकर्त्यांचे जाळे आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीतील सर्व कार्यकर्त्यांना सर्वांना सोबत घेऊन चालणारा अशा व्यक्तीकडे जिल्हाध्यक्षपद द्यावे अशी चर्चा असताना पक्षाकडून ही जबाबदारी माजी आ. चंद्रशेखर घुले यांना देण्यात आली. घुले यांच्या जिल्हाध्यक्षपदाच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद निवडणुका झाल्या. नेवाशात गडाखांचे बंड झाले नसते तर आज जिल्हा परिषदेत काँग्रेस एवढे सदस्य राष्ट्रवादीचे निवडून आले असते.

 
जिल्हा परिषद निवडणुका झाल्यानंतर घुले यांच्या पत्नी राजश्रीताई घुले यांना झेडपीत उपाध्यक्षपदाची संधी मिळाली. शिक्षण आणि आरोग्य खात्यांचा विस्तार असणार्‍या विभागाचे नेतृत्व घुले करत आहेत. असे असताना जिल्हाध्यक्षपदाची धुरा चंद्रशेखर घुले यांच्या खांद्यावर आहे. सध्या घुले पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कामात व्यस्त असताना जिल्हाध्यक्षपदावर झावरे यांच्या नावावर पक्षश्रेष्ठीकडून शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सोशल मीडियावर पसवरण्यात येत आहे.

 
याबाबत घुले आणि झावरे यांच्याशी संपर्क केला असता अशी कोणतीच चर्चा अथवा प्रस्ताव प्रदेश पातळीवर नसल्याचे दोघांनी सांगितले.

 

मात्र, सोशल मिडियावर ही चर्चा कोण पसवरतो याबाबत विचारणा केली असता कानावर हात ठेवले. दरम्यान निमित्त काही असो जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर नगर-पारनेरच्या राजकीय पटलावरून गायब झालेले माजी जिल्हा परिषद सदस्य सुजित झावरे पुन्हा चर्चेंत आले आहेत. नेते पदाधिकारी पक्षाच्या वर्धापनाच्या तयारीत व्यस्त आहेत.

 

जिल्हाध्यक्षपदाबाबत आपल्याला काही माहिती नाही. पक्षश्रेष्ठी अथवा प्रदेशपातळीवरून याबाबत विचारणा झालेली नाही. मात्र, पक्षाने दिलेली जबाबदारी योग्य पध्दतीने पार पाडू.
सुजीत झावरे, माजी जिल्हा परिषद सदस्य.

 
राष्ट्रवादीत सध्यातरी जिल्हाध्यक्ष बदलासंदर्भात कोणतीच चर्चा नाही. पक्षाचा वर्धापन दिन, शेतकर्‍यांचे आंदोलन याची दिशा ठरवण्यात श्रेष्ठी व्यस्त आहेत. चंद्रशेखर घुले, जिल्हाध्यक्ष.

LEAVE A REPLY

*