जिल्हाधिकार्‍यांकडून सर्वोच्च न्यायालयाचे नियम धाब्यावर

पाचशे मीटरच्या आत बिअर शॉपीला परवानगी; स्थानिकांनी दर्शवला विरोध

0
नाशिक । दोन दिवसांपूर्वी तिडके कॉलनीतील रहिवाशांनी बंद पाडलेले वाईन शॉप राष्ट्रीय महामार्गावर पाचशे मीटरच्या आत सुरू करण्यासाठी खुद्द जिल्हाधिकार्‍यांनीच परवानगी दिल्याने या निर्णयाचा स्थानिक रहिवाशांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. याविरोधात आज येथील नागरिकांनी आंदोलन करत वाईनच्या बाटल्या उतरवण्यास विरोध दर्शवत तिडके कॉलनीतील आंदोलनाची पुनरावृत्ती केली. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात आता रहिवाशांनी विभागीय आयुक्तांकडे धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे पेठरोड परिसरातील तरुण सुखवाणी यांचे बंद झालेले हिरा वाईन्स हे शॉप नवीन तिडके कॉलनीतील लंबोदर अ‍ॅव्हेन्यू या इमातीत भाडेतत्त्वावर घेतलेल्या एका गाळ्यामध्ये सुरू करण्यात येणार होते. मात्र परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी वाईन शॉप सुरू करण्यास विरोध केला.

यावेळी संतप्त महिलांनी दुकान मालकाने ट्रकमध्ये आणलेल्या वाईनचे बॉक्स थेट रस्त्यावर टाकून देत तीव्र आंदोलन छेडले. सुमारे दहा तास चाललेल्या आंदोनामुळे अखेर दुकानदाराला नमते घ्यावे लागले. मात्र या वाईन शॉपला वारंवार विरोध दर्शवूनही जिल्हाधिकार्‍यांकडून दखल घेतली जात नसल्याने अखेर नागरिकांनी विभागीय आयुक्तांकडे धाव घेत हा सारा प्रकार त्यांच्या कानी टाकला.

या वादावर तात्पुरता पडदा पडला असतानाच आज पुन्हा या वाईन शॉप मालकाने पूर्वीच्या ठिकाणी म्हणजे पेठरोडवरील मोती सुपर मार्केटमधील गाळ्यात दुपारच्या सुमारास मद्याचा ट्रक उतरवला. सदरचा मार्ग हा राष्ट्रीय महामार्ग आहे. तसेच हे वाईन शॉप पाचशे मीटरच्या आत येते. यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे सर्रास उल्लंघन होते. मात्र असे असतानाही येथे वाईनचे बॉक्स उतरवले जात असल्याचे पाहून स्थानिक रहिवाशांनी सदर वाईन शॉप मालकाला वाईनचे बॉक्स उतरवण्यास विरोध दर्शवला.

मात्र जिल्हाधिकार्‍यांच्याच परवानगीने सदरचे शॉप सुरू करण्यात येत असल्याचा खुलासा संबंधिताने केल्याने नागरिक चांगलेच संतापले. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी तिडके कॉलनीत झालेल्या आंदोलनाची पुनरावृत्ती येथे पुन्हा घडली. नागरिकांनी वाईनचे बॉक्स रस्त्यावर आणून ठेवत दुकान सुरू करण्यास विरोध दर्शवला. यावेळी नागरिकांनी तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेत सदरचे वाईन शॉप स्थलांतराचा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्याकडे केली. हे शॉप बंद न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी स्थानिक रहिवासी किरण भालेकर, राजेंद्र वैश्य, बाबूभाई पटेल, राहील शेख, राजन गुप्ता, धर्मेंद्र गुप्ता, प्रतिभा भालेकर, अलका पटेल, विलास पटेल, आर.सी.पटेल आदींसह महिला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

*