Type to search

नंदुरबार

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी पदभार स्विकारला

Share

नंदुरबार । येथील जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार डॉ.राजेंद्र भारुड यांनी आज स्विकारला. सरदार सरोवर प्रकल्पाचे अप्पर जिल्हाधिकारी दत्तात्रय बोरुडे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी गार्‍हाणे निराकरण प्राधिकरणाचे अप्पर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार उपस्थित होते.

मुळचे साक्री तालुक्यातील सामोडे येथील असलेले डॉ.भारुड उपक्रमशील अधिकारी म्हणून परिचीत आहेत. त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे कामकाज पाहताना आपल्या अभिनव उपक्रमाद्वारे जिल्हा परिषदेचे नाव राष्ट्रीय पातळीवर नेले. त्यांचा तत्कालिन पेयजल व स्वच्छता मंत्री उमा भारती यांच्या हस्ते गौरव करण्यात आला होता. ग्रामीण भागातील घरकुले पुर्ण करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. 25 हजारावर घरकुले बांधून सोलापूर जिल्हा परिषदेला राज्यात अग्रस्थानी आणण्यात त्यांचे महत्वाचे योगदान आहे. ग्राम स्वच्छतेच्या क्षेत्रातही त्यांनी अभिनव उपक्रम राबविले. शोषखड्डे गिफ्ट गाव आणि गटारमुक्त गाव ही संकल्पना त्यांनी राबविली. 200 ग्रामपंचायती गटारमुक्त केल्याबद्दल त्यांना मद्रास आयआयटीमध्ये मार्गदर्शनासाठी आमंत्रित करण्यात आले होते.

नुकत्याच पार पडलेल्या आषाढी सोहळ्यात पंढरीच्या दारी स्वच्छतेची वारी या उपक्रमाद्वारे त्यांनी वारी मार्गावर स्वच्छता राहण्यासाठी प्रयत्न केले व वारकर्‍यांमध्ये जनजागृती केली. अभिलेख योग्य पद्धतीने वर्गीकरण व जतन करण्यासाठी त्यांना गौरविण्यात आले आहे.

धुळे जिल्ह्यातील असल्याने आपल्या भागातील युवकांना प्रेरित करण्यासाठी त्यांनी मार्गदर्शनपर विविध उपक्रम राबविले आहे. एक धडाडीचे, उपक्रमशील आणि कार्यकुशल अधिकारी म्हणून त्यांचा आपली प्रतिमा निर्माण केली आहे. विविध विभागांच्या अधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी भारुड यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. जिल्हाधिकारी डॉ. भारुड यांनी पदभार स्विकारल्यानंतर प्रशासकीय इमारतीमधील विविध कार्यालयांना भेटी देवून पाहणी केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!