जामनेरला कपाशीसाठी १० कोटींचे अनुदान; पण… लाभासाठी अनेक जाचक अटी

0

अभय लोढा |वाकोद, ता.जामनेर :  मागील वर्षीच्या खरीप हंगामात कपाशी पिकाच्या झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून आता शासनाकडून १० कोटींचे अनुदान जामनेर तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी तहसील कार्यालयाला प्राप्त झाले आहे़
एकतर उशीरा मिळालेल्या तोकड्या मदतीसाठी शेतकर्‍यांना अनेक अडचणींवर मात करीत हे अनुदान मिळवावे लागणार असल्याचे स्थिती आहे़ यासाठी विविधकागदपत्रांसह अनेक जाचक अटी ठेवण्यात आलेल्या आहेत़ त्यामुळे कमीत कमी शेतकर्‍यांपर्यंत हा लाभ, पोहचेल अशी व्यवस्था सरकारने या नियमांमधून केलेली आहे़

images

गेल्या वर्षी पावसाच्या लहरी पणामुळे अनेक भागात दुष्काळी परिस्थीती निर्माण झाली होती़ ही बाब लक्षात घेवून शासनाने मागील वर्षी जामनेर तालुक्यात मका, कपाशी या पिकांसाठी नुकसान भरपाई म्हणून अनुदान जाहीर केले होते़. यापैकी मक्याच्या पीकासाठी सुमारे २१ कोटी रूपयाचे अनुदान लाभार्थी शेतकर्‍यांना वाटप केले होते़

शासनाकडून जरी हे अनुदान वेळेवर प्राप्त झाले होते, तरी जिल्हा बँकेच्या काही अडचणींमुळे हे अनुदान शेतकर्‍यांना वाटप करण्यात खुपच विलंब लागला होता़ या हंगामातील उर्वरीत कपाशी पिकाचे अनुदान गेल्या काही दिवसांपूर्वीच जामनेर तहसील कार्यालयाला प्राप्त झाले आहे़ यात सुमारे १० कोटी १८ लाख रुपये रक्कम हंगाम २०१५ मधील दुष्काळी कपाशी पिकासाठी अर्थसहाय्य म्हणून अनुदान मिळाले आहे़

हे अनुदान वाटप करण्यासाठी तालुक्यातील तलाठी वर्गाकडून अनुदान लाभार्थ्याच्या याद्या बनाविण्याचे काम सुरु आहे़ त्यामुळे येत्या काही दिवसातच तालुक्यातील सर्व लाभार्थी शेतकर्‍यांना अनुदान वाटप करण्यात येईल, अशी माहीती जामनेर तहसील कार्यालयाकडून मिळाली आहे़

अनेक ठिकाणी याद्या मध्ये घोळ

वाकोद व परिसरातील गावांसह तालुक्यातील अनेक गावांत शासनाकडून मिळणार्‍या विविध अनुदानासाठी पात्र लाभार्थ्याच्या याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत़ मात्र या याद्यांमध्ये प्रचंड घोळ असून बर्‍याच शेतकर्‍यांचे बँक खाते क्रमांक व नाव चुकलेले आहे़ तसेच अनेक शेतकर्‍यांचे तर नावच याद्यामध्ये नाहीत, तर काहींची नावे पुन्हा आलेली असतात़ अनेक शेतकर्‍यांचा पीक पेरा ७/१२ उतार्‍यावर चुकलेला आहे़

अशा अनेक त्रुट्या असल्याने शेतकर्‍यांना हे अनुदान मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागते़ तसेच वेळोवेळी पाठपुरावा करण्यात बराच वेळ यात जात असल्याने अनेक शेतकरी हैराण होवून शेवटी अनुदानापासून वंचित राहिल्याचीही अनेक उदाहरणे आहेत़ त्यामुळे महसूल विभागाकडून तयारी होणारी यादी काळजीपूर्वक तयार करण्यात यावी, असे आवाहन शेतकर्‍यांमधून करण्यात येत आहे़

अनुदान वाटपात अनेक जाचक अटी

ज्या लाभार्थी शेतकर्‍यांना मका पीकाच्या अनुदानाचा लाभ मिळाला आहे़ त्या शेतकर्‍यांना आता कपाशी पीकासाठी आलेले अनुदान मिळणार नाही़ अनुदान वाटप करतांना ७/१२ वरील पिक नोंदणीचा आधार घेण्यात येईल, त्यावर कपाशी पिकांच्या लागवडीची नोंद असल्यावरच अनुदान देण्यात येईल़

तसेच ज्या शेतकर्‍यांचे २ हेक्टरपर्यंत क्षेत्र असेल (अल्पभूधारक) त्यानांच अनुदानाचा लाभ घेता येणार आहे़ मयत लाभार्थ्यांना अनुदान घेण्यासाठी वारस पत्र बनविने बंधनकारक आहे़ ज्या शेतकर्‍यांनी पिक विमा योजने अंतर्गत पिक विमा घेतलेला आहे अशा शेतकर्‍यांना मंडळनिहाय जाहीर करण्यात आलेल्या पिक विमा योजने अंतर्गत देय रक्कमेच्या ५० टक्के रक्कम पिक विमा योजनेत सहभागी नसलेल्या शेतकर्‍यांना मदत म्हणून देण्यात येणार आहे़

तसेच या अनुदानाची अचूक यादी त्या-त्या अधिकाजयांनी गावोगावी चावडी वाचन करावे किंवा ग्रा.पं. च्या फलकावर लावावी, असे बंधनकारक करण्यात आलेले आहे़

शासनाची ‘चित भी मेरी आणि पट भी मेरी’

शेतकर्‍यांच्या मालाला हमी भाव नसल्यामुळे आपण, या नाही तर त्या पिकात तरू अशी अपेक्षा असल्याने दोन एकर क्षेत्र असलेला शेतकरीही दोन पिकांची लागवड करतो़ मात्र शासनाने या अनुदानासाठी मका पिकाचे अनुदान घेतलेल्या शेतकर्‍याना आता कपाशी पिकासाठीचे अनुदान घेता येणार नाही, असा नियम ठरविल्याने अनेक शेतकर्‍यांना या अनुदानाला मुकावे लागणार आहे़

शेतीमालाला हमी द्यायचा नाही, आणि आर्थिक मदतीच्या वेळी असे, जाचक नियम तयार करायचे अशी ‘चित भी मेरी आणि पट भी मेरी’ ची शासनाची भुमिका आहे़ यामुळे शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत आहे़

मागील वर्षाच्या दुष्काळी कपाशी व सोयाबीन अनुदानाची १० कोटी च्या जवळपास रक्कम जामनेर तहसीलला प्राप्त झालेली असून लवकरात लवकर अचूक याद्या संबंधीत तलाठ्यांकडून बनाविण्याचे काम सुरु आहे़ त्वरीत हे अनुदान लाभार्थी शेतकर्‍याच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार असल्याची माहीती नायब तहसिलदार परमेश्वर कासुळे यांनी दिली.

LEAVE A REPLY

*