Type to search

ब्लॉग

जागरुकतेचा परिचय

Share

उत्तर प्रदेशातील मिर्झापूरच्या एका गावातील शाळेत मुलांना मध्यान्ह भोजनात मीठ-भाकरी दिली जाते. त्या प्रकरणाला वाचा फोडून तेथील एका पत्रकाराने जागरूकतेचा परिचय दिला. मात्र या प्रकरणात त्यालाच ‘शिकार’ बनवले गेले आहे. ‘भ्रष्टाचारमुक्त भारत’ घडवण्याच्या वल्गनांचीच पोलखोल त्यामुळे होत आहे. दुसरी एखादी चूक त्या पत्रकाराने केली असल्यास त्याची जरूर चौकशी व्हावी, पण मध्यान्ह भोजनातील भ्रष्टाचाराच्या मुद्यात एनकेनप्रकारेण त्याला आरोपी करणे लज्जास्पद आहे.

घटना उत्तर प्रदेशातील मिर्झापूर नजीकच्या एका गावातील आहे. गावातील शाळेत मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत मुलांना दिल्या जाणार्‍या मीठ-भाकरीची चित्रफित या भागातील एका पत्रकाराने तयार केली व ती समाज माध्यमांवर प्रसारित केली. या चित्रफितीमुळे कोलाहल माजणार, यात शंका नव्हती. तसे झालेसुद्धा! अब्जावधी रुपयांची मध्यान्ह भोजन योजना मुलांचे आरोग्य आणि त्यांच्या शिक्षणासाठी राबवली जात आहे. नियमानुसार विद्यार्थ्यांना पौष्टिक भोजन दिले जाते, असा दावा सर्वच सरकारांकडून नेहमी केला जातो. या चित्रफितीमुळे त्यावर पहिल्यांदाच प्रश्‍नचिन्ह लागले असे नव्हे! तथापि समाज माध्यमांवर झळकलेले असे प्रकरण कदाचित पहिल्यांदाच चर्चेचा विषय बनला आहे. त्याचे कारण फक्त मध्यान्ह भोजनातील गंभीर उणीव नव्हे! भ्रष्टाचार उघडकीस आणणार्‍या संबंधित पत्रकारावर आयपीसीची अनेक कलमे लावून त्याला आरोपी करण्यात आले, हाही चर्चेचा विषय आहे. एका वृत्तपत्राच्या पत्रकाराने मुलांना मीठ-भाकरी खाऊ घातले जाण्याच्या घटनेची चित्रफित कशी तयार केली, हाही त्याचा गुन्हा आहे. त्याबद्दल प्रशासनाच्या बुद्धीची किव करावी तेवढी थोडीच! भ्रष्टाचाराचा एक चेहरा दाखवणार्‍या पत्रकाराला गुन्हेगार ठरवले जाते की नाही ते येता काळच सांगू शकेल. मात्र हे प्रकरण व्यवस्थेला भ्रष्टाचाराची वाळवी लागल्याचेच निदर्शक आहे.

सुदैवाने भारतीय लोकशाहीचा मुख्य प्रवाह असणार्‍या माध्यमांनी एका गावात रुजणार्‍या भ्रष्टाचाराच्या बातमीवर लक्ष केंद्रित केले, अन्यथा समाज आणि व्यवस्थेतील विसंगती चव्हाट्यावर आणणे आपले कर्तव्य आहे, असे वृत्तवाहिन्या मानत नसाव्यात. उत्तर प्रदेशातील चिमूटभर मीठाच्या घटनेने ‘नमक का दरोगा’ ही प्रेमचंद यांची प्रसिद्ध कथा आठवली. या कथेत प्रामाणिक पोलीस अधिकार्‍याचे चित्रिकरण आहे. वरकमाई हे वाहत्या झर्‍याचे पाणी का असेना, पण ते नाकारणारे लोकसुद्धा याच समाजात आहेत, असेही त्यात म्हटले आहे. कथेतील नायकांना प्रामाणिकपणाचे योग्य फळ मिळते, पण त्या पोलीस अधिकार्‍याने पंचवीस हजार रुपयांची लाच नाकारली हे जास्त महत्त्वपूर्ण आहे. आजही असे लोक समाजात आहेत, पण भ्रष्टाचाराचे भूत समाजाच्या डोक्यावर चढून बसले आहे, ही गंभीर बाब आहे. मंत्र्यांपासून संत्र्यांपर्यंत सारेच भ्रष्टाचाराची शिकार होत आहेत. मोठमोठ्या व्यक्तींवर भ्रष्टाचाराचा आरोप होणे ही सर्वसामान्य गोष्ट बनली आहे. भ्रष्टाचाराचे गुन्हेगार म्हणून घोषित होताना त्यांना आता आश्‍चर्य वाटत नाही. मुलांना मध्यान्ह भोजनात मीठ-भाकरी खाऊ घालून संबंधिताने किती पैसा कमावला असेल ठाऊक नाही, पण अशा तर्‍हेच्या भ्रष्टाचारात वरपासून खालपर्यंतच्या लोकांचा सहभाग आढळतो. रुग्णालयात रुग्णांसाठी असलेली औषधे गायब होतात. ऑक्सिजनच्या अभावाने बालके जीव गमावतात. निकृष्ट साहित्यातून तयार होणार्‍या रस्त्यांवर अपघात होणे या सर्वसामान्य गोष्टी बनल्या आहेत.

आज चिमूटभर मीठ भलेही ‘चिमूटभर कुंकवा’सारखा वाक्प्रचार वाटत असेल, पण चिमूटभर मीठ मानवी भावनांना आव्हान देत आहे. ही वस्तुस्थिती नाकारता येईल का? मिर्झापूरच्या त्या शाळेतील मुलांच्या ताटात पडलेले चिमूटभर मीठ संपूर्ण समाजाच्या भावना आणि मानसिकतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करीत आहे. मूठभर मीठ उचलून राष्ट्रपिता महात्मा गांधींनी इंग्रज साम्राज्याला आव्हान दिले होते. ज्यांच्या साम्राज्याचा सूर्य कधी मावळला नव्हता, त्या शक्तीला त्यांनी पराभूत केले होते. आज तेच मीठ आव्हान बनून आपल्यासमोर उभे ठाकले आहे. भारतीय समाजात काही लाज शिल्लक आहे का? असे ते विचारत आहे.

मीठ-भाकरी प्रकरणाला वाचा फोडून एका  पत्रकाराने जागरूकतेचा परिचय दिला. मात्र आता त्या पत्रकारालाच या प्रकरणात ‘शिकार’ बनवले जात आहे. ‘भ्रष्टाचारमुक्त भारत’ घडवण्याच्या वल्गनांची पोलखोल यामुळे होत आहे. त्या पत्रकाराने दुसरी एखादी चूक केली असेल तर त्याची जरूर चौकशी व्हावी, पण मध्यान्ह भोजनातील भ्रष्टाचाराच्या मुद्यात एनकेनप्रकारेण संबंधित पत्रकाराला आरोपी करणे लज्जास्पद आहे. प्रेमचंद यांच्या कथेतसुद्धा पैसा आणि तथाकथित प्रतिष्ठेच्या बळावर गुन्हेगार सन्मानाने आरोपमुक्त झाला होता. मध्यान्ह भोजन योजनेत अफरातफर करणारे सर्व लोक आपला प्रभाव आणि बळाच्या जोरावर वाचण्याचा प्रयत्न करीत आहेत असे वाटते. असा प्रत्येक प्रयत्न उधळून लावला तरच भ्रष्टाचारविरोधी लढाई सार्थकी ठरू शकेल.

प्रश्‍न फक्त एखाद्या शाळेत चालणार्‍या घोटाळ्याचा नव्हे तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात फैलावणार्‍या आणि रुजणार्‍या भ्रष्टाचारावर अंकुश लावण्याचासुद्धा आहे. समाज आणि शासन यंत्रणा स्वत:ला उजळ दाखवण्याचा शक्य तेवढा प्रयत्न करतात. प्रत्येक गुन्हेगार सर्व शक्ती पणाला लावून स्वत:ला निर्दोष दाखवू पाहतो. त्यात कोणतीही ताकद नेहमीच विजयी ठरते, हेही खरे! या शक्तीपुढे सामान्य माणसे नेहमीच असहाय्य दिसतात. निदान उरले-सुरले तरी हातातून हिरावले जाऊ नये, असे त्यांना वाटते.

फरीददास यांच्या दोन ओळी आठवतात. ‘साई मेरा डाढडा, नित रूखी रोटी दे| डरदयां लूण न मंगिये, मतां रुक्खी वी खस ले॥ बालपणी मी या ओळी ऐकल्या आहेत. आनंदाची गरज आणि महती सांगण्यासाठी या ओळी ऐकवल्या गेल्या होत्या. मात्र आज ती परिभाषा बदलायला हवी. पैसा आणि मनगटशाहीच्या रुपात, बाहुबलीच्या रुपातील आव्हान आजही समाजासमोर उभे आहे. त्यापुढे सामान्य माणूस असहाय्य ठरत आहे. धाडस जागवून ही स्थिती बदलण्याची आवश्यकता आहे. भितीपोटी मीठ न मागण्याची विवशता दूर करावीच लागेल.

प्रश्‍न न्याय मागण्याचा आहे तसेच न्यायाच्या बाजूने उभे राहण्याचासुद्धा आहे. लोकशाहीत नागरिकांना ही जबाबदारी पार पाडावी लागेल आणि नागरिकांच्या अधिकारांचे रक्षण करण्याची अपेक्षा शासकांकडून करावी लागेल.

शाळेतील मुलांच्या ताटातील चिमूटभर मीठ भ्रष्टाचार उघड करीत आहे. सोबतच समाजात नागरी अधिकारांबद्दल जागरूकतेची गरजही अधोरेखित करीत आहे. मिर्झापूरच्या पत्रकाराने याच जागरूकतेचा परिचय दिला आहे. आवश्यकता त्याच्या जागरूकतेला नमस्कार करण्याची आणि त्याला पाठबळ देण्याची आहे.

विश्‍वनाथ सचदेव

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि प्रसिद्ध विचारवंत आहेत.)

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!