जागतिक वनदिन विशेष : नाशिक वनक्षेत्रात बिबटयांच्या संख्येत वाढ

अपघातात मृत्यूचे प्रमाण जास्त, तरीही जन्मदर वाढताच

0

नाशिक (प्रवीण खरे) : एकूणच विविध अपघातात बिबटे मृत्यूमुखी पडत असतांना, वाढत्या जन्मदरामुळे त्यांची संख्या वाढत असल्याची दिलासादायक माहिती वनविभागाकडून देण्यात आली. नाशिक वनक्षेत्रात 80 हून जास्त तर नगर जिल्हयात 100 च्या आसपास बिबटे असल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली.

सर्वात महत्वाची बाब म्हणजे जंगलक्षेत्र कमी झाल्याने बिबटयांनी आपल्या निवासाची जागा बदलली आहे. उसाच्या क्षेत्रात बिबटयांचा निवास दिवसेंदिवस वाढत आहे. 2012 च्या सर्व्हेक्षणानुसार नाशिक जिल्हयातील पाचही उपविभागात 66 बिबटे तर नगर जिल्हयात 80 बिबटे असल्याची नोंद करण्यात आली होती.

परंतु त्यानंतर कोणत्याही प्रकारची नोंद करण्यात आलेली नाही. तरीही बिबटयांचा जननदर, त्याचे बछडे वाचण्याचे प्रमाण पाहता त्यांची संख्या मागील पाच वर्षात निश्चीत वाढली आहे. जंगल क्षेत्र कमी होत असल्याने बिबटयांनी आपला मुक्काम उस लागवड असलेल्या क्षेत्रात वाढवला आहे. त्यानुसार नाशिक जिल्हयातील निफाड तालुक्यात नदीकिनारी, सिन्नर आदी भागात तर त्रयंबकेश्वरला तुरळक भागात बिबटयांची संख्या वाढत आहे.

याशिवाय नगर जिल्हयात संगमनेर, राहूरी, कोपरगाव क्षेत्रात बिबटयांची संख्या वाढत आहे. दरम्यान वनविभागाच्या कारवाईत काही लहान बछडयांना वाचविण्यात यश आले त्या बछडयांना जुन्नर जवळील माणिकडोह निवारा केंद्रात पाठविण्यात आले आहे. नागरी वस्तीत बिबटया शिरल्यानंतर त्याला सुरक्षित वाचविण्यातही वनविभागाला यश आलेले आहे. लोखंडी पिंजरयात पकडून त्याला सुरक्षीत ठिकाणी सोडणे, शिवाय विहीरीत पडल्यानंतर शिडीव्दारे व अन्य उपाययोजनांव्दारेही बिबटयाला वाचविण्यात आल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान विविध प्रकारच्या अपघातात मृत्यूमुखी पडणारया बिबटयांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. त्यात नाशिक आणि नगर जिल्हयात मिळून एका वर्षात 32 बिबटे मृत्यूमुखी पडले आहेत. नागरी वस्तीत बिबटे शिरल्यानंतर त्यांना सुरक्षितपणे वाचविण्यासाठी वनविभागाकडून उपाययोजना करण्यात येत असून त्यासाठी ट्रॅग्युलायझेशन गनसह अन्य सुविधाही वनविभागाकडे उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY

*