जहागिरदार, केळकर, बेदरकरांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा ठराव

सावानात एकूण 17 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप

0

नाशिक : सार्वजनिक वाचनालय नाशिक या संस्थेतील पदच्युत करण्यात आलेले कार्याध्यक्षा विनया केळकर, कार्यवाह मिलींद जहागीरदार, अर्थसचिव स्वानंद बेदरकर हे आर्थिक नुकसानिस व संस्थेच्या फसवणुकीस जबाबदार आहेत त्यामुळे त्यांचे आजीव व प्राथमिक सभासदत्व कायमस्वरूपी रदद करण्याबरोबरच संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचाही ठराव रविवारच्या विशेष सभेत सर्वानुमते मंजुर करण्यात आला.

सावानाच्या बांधकामात 17 लाख रूपयांचा गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर मागील सभेत विनया केळकर, मिलींद जहागीरदार, स्वानंद बेदरकर यांना पदच्युत करण्यात आले होते. रविवारच्या विशेष सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखविण्यात आले. यावेळी गव्हर्मेंट अ‍ॅप्रुव्हड व्हॅल्युअर आर्किटेक्ट यांनी पहाणी केल्यानंतर आक्षेप नोंदविल्याचे सादरीकरण करण्यात आले.

यात फर्निचर, बांधकाम, फेब्रीकेशन या सर्वच कामात चोरडीया यांनी आक्षेप नोंदवले असल्याचे अ‍ॅड श्रीधर व्यवहारे यांनी सांगीतले. सादरीकरणात फॅब्रीकेशन कामातील तफावत 4 लाख 81 हजार 968 अधिक कर, तसेच रंगकाम मंजुरीपोटी दिलेली जादा रक्कम 4 लाख 14 हजार, 854 तर सुतारकामाच्या प्लायमध्ये 50 टक्के खर्चाची तफावत 6 लाख 8 हजार 330 रूपये असा एकूण 17 लाख 05 हजार 152 रूपयांचा संशयास्पद खर्च दाखविण्यात आला. सर्वच नोंदी या सादरीकरणातून सदस्यांना दाखविण्यात आल्या.

सुरवतीला अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबाद कर यांनी सांगितले की सावानात झालेल्या गैरकारभाराचा संपूर्ण अहवाल सदस्यांसमोर मांडून पारदर्शक कारभार करणार असल्याचे सांगितले. मुक्तदार विभागाच्या झालेल्या कामातील गैरप्रकारप्रकरणी केळकर, बेदरकर , जहागीरदार यांना वारंवार नोटीसा दिल्या आहेत. 6 लाख रूपयांची मागणी त्यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबत 29 जानेवारीच्या मिटींगनंतर एक पत्र तसेच 23 फेब्रुवारीला एक पत्र पाठविण्यात आले आहे. परंतु त्यांच्याकडून पत्रास उत्तर नसल्याचे त्यांनी सांगितले.

सावानाचे सदस्य असलेले ज्येष्ठ अभियंता एन.एम आव्हाड यांनी आपले मनोगत मांडतांना एकूण सर्वच कारभारावर ताशेरे ओढले. जर हे काम आपल्या कंपनीला दिले असते तर ते सहकार्य म्हणून विनामोबदला केले असते. बांधकाम क्षेत्रात 51 वर्षापासून काम करत असून या क्षेत्रातील आम्ही जहागिरदार असल्याचे त्यांनी सांगितले. सावाना ही एक पवित्र संस्था असून यात झालेला सगळा व्यवहार हा निर्णय घेवून डिझाईन करप्शन पध्दतीने झाल्याचे त्यांनी सांगितले. चोरडीया यांनी केलेले काम कौतुकास्पद असून यात अजून काही त्रुटी असतील त्या शोधाव्या लागतील असे त्यांनी सांगितले. भ्रष्टाचार करणारया प्रवृत्ती ठेचल्या गेल्या पाहिजेत असेही ते म्हणाले.

सदस्य श्रीकांत बेणी यांनी अ‍ॅड तळेकर हे वाचनालायाचे सदस्य असून त्यांनी सावानाविरोधात वकीलपत्र घेत भ्रष्टाचारयांची बाजू मांडण्याचे काम केल्याने त्यांचेही सदस्यत्व रदद करावे अशी सूचना केली. त्यांनी संस्थाविरोधात वकीलपत्र घेवून नैतिकता शिल्लक नसल्याचे सिध्द केले आहे. त्यांनी सदस्यांचा, अध्यक्षांचा अवमान केला आहे. जे सदस्य अडचणीचे ठरत होते त्यांच्यावर जहागिरदार यांनी आरोप करत त्यांचे सदस्यत्व रदद करण्याचा सपाटा लावला होता. परंतु या भ्रष्टाचाराचे पुढे काय, सभासदांनी एकत्र येत यावर विचार करावा असे त्यांनी सांगितले. पुस्तकासाठी असलेली संगणक व्यवस्थाही बंद पाडत त्याबाबतही चौकशी होण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

जहागिरदार यांनी गौरवाडकर, अ‍ॅड तळेकर यांना सोबत घेत सस्थाविरोधी काम केले शिवाय अध्यक्षांवरही दबाव आणल्याचे त्यांनी सांगितले. सदस्य हसंराज वडघुले यांनी भ्रष्टाचार करणारयांना संस्थेपासून कायम दूर ठेवण्याची सूचना केली. 175 वर्षात इतके घाणेरडे जातीयवादी राजकारण जहागिरदार यांनी केल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी स्वर्गीय माजी मुख्यमंत्री वसंतराव चव्हाण यांच्या कोनशिलेचा दाखला दिला. त्यांची कोनशीला कोपरयात बसवत वेगळे राजकारण केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी ठराव मांडले या सर्वच ठरावांना संस्थेच्या सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली. सदस्य मुकुंद बेणी यांनी गैरप्रकार करणारयांवर फौजदारी कार्यवाही करण्याचा फलक दाखविला.

LEAVE A REPLY

*