जवान आत्महत्येप्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे हाती

0

नाशिक | दि. ४ प्रतिनिधी- देवळाली कॅम्प येथील स्कूल ऑफ अर्टीलरीतील लष्करी जवानाच्या आत्महत्येप्रकरणी काही महत्वपूर्ण धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. पुढील ४८ तासांत या प्रकरणाची उकल होण्याची शक्यता पोलीस प्रशासनाने व्यक्त केली आहे.

डी. एस रॉय मॅथ्यू (वय ३५) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. लष्कराशी संबंधित असलेले हे प्रकरण देशभर गाजत आहे. ठोस पुरावे हाती असल्याशिवाय या विषयावर तूर्तास अधिक बोलण्यास अधिकार्‍यांनी असमर्थता दर्शवली आहे.

मॅथ्यूच्या आत्महत्येमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. तो रॉकेट बॅटरी, बॅचलर बॅरेक येथे राहत होता. डिमोलेशन क्वार्टरमध्ये त्याने चार ते पाच दिवसांपूर्वी गळफास लावून घेतल्याचे शुक्रवारी पोलीस तपासात स्पष्ट झाले.

आत्महत्येच्या काही दिवसांपूर्वी मॅथ्यूचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. त्यात त्याने वरिष्ठांकडून मिळणारी वागणूक व छळाबाबत भाष्य केले होते. हा व्हिडीओ देशभरात चर्चेचा विषय ठरला होता. त्यामुळे मॅथ्यू कारवाईच्या दडपणाखाली होता.

कोर्टमार्शलसारखी कारवाई होण्याची त्यास भीती होती. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. त्याच्या मृतदेहाजवळ १ मोबाईल व मल्याळी भाषेतील सुसाईड नोट पोलिसांना मिळाली आहे. मोबाईलमधील डाट्याचा तपास तज्ञांकरवी करण्यात येत आहे. यामधून अधिक मोठा पुरावा समोर येण्याची शक्यता आहे.

पुढील दोन दिवसांत या प्रकरणातील काही महत्वाच्या गोष्टी हाती लागून घटनेची उकल होण्याची शक्यता पोलिस उपायुक्त डॉ. श्रीकांत धिवरे यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

*