जळगाव शहर हगणदारीमुक्तचा दावा फोल – तपासणी समिती सदस्यांची नाराजी

0

जळगाव |  प्रतिनिधी :  शहर हगणदारीमुक्त झाल्याचा दावा मनपा प्रशासनाने करुन तपासणी करण्यासाठी समिती पाठवावी, असा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार समितीच्या सदस्यांनी शहातील काही भागामध्ये पाहणी केली. दरम्यान, हगणदारीमुक्तीसाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगून शहरातील अस्वच्छतेबाबत समितीच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.
शहर हगणदारीमुक्त करण्यासाठी दि.३१ मार्च २०१७ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

त्याअनुषंगाने शहरात सर्वेक्षण करुन ५८ ठिकाण हगणदारीमुक्त करण्याबाबत उपाययोजना केली. त्यानंतर दि.१४ रोजी मनपा प्रशासनाने शहर हगणदारीमुक्त झाल्याचा दावा करुन तपासणीसाठी समिती पाठवावी, असा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार शासनाने तपासणीसाठी समिती गठीत केली. समितीतील सदस्य नवीमुंबई मनपाचे अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण, उल्हासनगर मनपाचे उपायुक्त जमिल लेंगरेकर व जळगावातील ज्येष्ठ पत्रकार अनिल पाटील यांनी सकाळी ६.३० वाजेपासून पाहणी केली.

उघड्यावर शौचास बसणार्‍या एकाला ५०० रुपये दंड
समितीतील सदस्यांनी डी-मार्ट समोरील जागेची पाहणी केली. त्यानंतर पथक इच्छादेवी चौकात पोहचले. दरम्यान याठिकाणी उघड्यावर शौचास बसणार्‍या एकाला ५०० रुपये दंड करण्यात आले. समतानगरात लाईटची सुविधा नसल्याने सार्वजनिक शौचालयाच्या बाहेरच शौचास बसत असल्याचे समिती सदस्यांच्या निदर्शनास आले.

मनपा शाळांमधील
स्वच्छतागृहांची दुरावस्था
मनपा शाळा क्र.१० व चौबे शाळेची समितीने पाहणी केली. चौबे शाळेत अस्वच्छता दिसून आली. तसेच स्वच्छतागृहांची देखील दुरावस्था झाल्यामुळे मनपा शिक्षणमंडळ प्रशासन अधिकारी वसंत महाजन यांच्या कार्यक्षमेतवर समितीने नाराजी व्यक्त केली.

जळकीमील परिसराबाबत समाधान
शाहूनगरजवळील जळकीमील परिसरात समितीतील सदस्यांनी पाहणी केली. याठिकाणी हगणदारीमुक्तीसाठी प्रयत्न केली जात असल्याने सदस्यांनी समाधान व्यक्त केले.

दोन दिवस पाहणी
संपूर्ण शहरात स्वच्छतेबाबत दोन दिवस पाहणी करण्यात येणार आहे. पाहणीचा अहवाल शासनाकडे देण्यात येणार असल्याचे समितीतील सदस्यांनी सांगितले.

‘पे ऍण्ड युज’ला नकार
मेहरुण परिसरात समितीने शौचालयाची पाहणी केली. याठिकाणी ‘पे ऍण्ड युज’ तत्वावर सुविधा आहे. परंतु स्थानिक नगरसेवक पैसे देवू नका असे, सांगत असल्याचे नागरिकांनी समितीला सांगितले.

LEAVE A REPLY

*