जळगाव पाटबंधारेच्या तीन अभियंत्यांची वाहने जप्त – वसुलीसाठी तहसिलदारांची कारवाई

0

जळगाव  |  प्रतिनिधी :  गौण खनिजाची रॉयल्टी थकविल्याप्रकरणी तापी व गिरणा पाटबंधारेच्या तीन कार्यकारी अभियंत्यांची वाहने आज जप्त करण्यात आली. दरम्यान महापालिकेकडेही थकबाकी असुन मनपा आयुक्तांचे वाहन जप्तीची कारवाई केली जाणार आहे.

तापी पाटबंधारे महामंडळाकडे गौण खनिजाच्या रॉयल्टीपोटी ३ कोटी २५ लाख रूपयांची थकबाकी होती. ही थकबाकी भरण्यासंदर्भात तहसिलदारांनी नोटीसही दिली होती. मात्र नोटीसीकडे दुर्लक्ष केल्याने आज तहसिलदार अमोल निकम यांच्यासह पथकाने तीन कार्यकारी अभियंत्यांची वाहने जप्तची कारवाई केली.

यात तापी खोरेचे कार्यकारी अभियंता यांची बोलेरो (क्र. एम.एच. १९ बीजे ७६७०), मध्य प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांची ऍम्बेसेडर (क्र. एम.एच. १९ बीजे ७१८७), गिरणा पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता यांचे  (एम.एच. १९ जी ९९४९) वाहन जप्त करण्यात आले.

या वाहनांचे मुल्यांकन करून त्यांचा लवकरच लिलाव केला जाणार आहे. कारवाईच्या पथकात निवासी नायब तहसिलदार डी.एस.भालेराव, महसुल नायब तहसिलदार सातपुते, मंडळ अधिकारी मिलींद बुवा आणि तलाठी सहभागी होते.

महापालिकेवरही कारवाई होणार

महापालिकेकडे व्यापारी संकुलांच्या बिनशेती साराची ५ कोटी ८५ लाख रूपयांची रक्कम थकित आहे. ही रक्कम भरण्यासाठी मनपाला नमुना १ ची नोटीस देण्यात आली होती. या नोटीसीची मुदत संपुनही महापालिकेने भरणा केलेला नाही. त्यामुळे मनपा आयुक्तांसह अधिकार्‍यांची वाहने जप्त केली जाणार आहे.

महसुल वसुलीसाठी शासकीय कार्यालयांना नोटीस देण्यात आल्या आहेत. जी कार्यालये भरणा करणार नाहीत त्यांच्यावर जप्तीची कारवाई केलीच जाईल.
– अमोल निकम , तहसिलदार, जळगाव

LEAVE A REPLY

*