जळगाव एमआयडीसीसाठी स्वतंत्र कार्यालयाचा उद्योग मित्र च्या सभेत ठराव

0

जळगाव | प्रतिनिधी :  औद्योगिक वसाहतीतील विविध समस्या व प्रश्‍न सोडविण्यासाठी स्वतंत्र कार्यालय करण्याचा ठराव आज झालेल्या उद्योग मित्र च्या सभेत करण्यात आला.

तब्बल सव्वा वर्षानंतर आज जिल्हा उद्योगमित्रची सभा जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

बैठकीला जिंदाचे अध्यक्ष रजनीकांत कोठारी, सचिव सचिन चोरडीया, विनोद बियाणी, राजू महाजन, बबलू भोळे, संजय तापडीया, अंजनी मुंदडा, सुनील महाजन यांच्यासह महावितरण, पाटबंधारे, भुसावळ रेल्वे प्रशासन व भुसावळ नगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

आज झालेल्या सभेत रेल्वेकडून तापीमध्ये दुषीत पाणी सोडले जात असल्यामुळे औद्योगिक वसाहतीसह परिसरांना दुषीत पाणीपुरवठा होत आहे. यासंदर्भात तोडगा काढून १५ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले असल्याची माहिती विनोद बियाणी यांनी दै.‘देशदूत’शी बोलतांना दिली.

तसेच जळगाव औद्योगिक वसाहतीत ६ हजार ५०० युनीट असतांनाही याठिकाणच्या प्राथमिक गरजांसदर्भात धुळे येथील विभागीय कार्यालयाशी वारंवार संपर्क साधावा लागतो. त्यामुळे या ठिकाणच्या समस्यांवर येथे तोडगा निघावा म्हणून जळगावसाठी स्वतंत्र एमआयडीसी कार्यालय करण्याबाबतचा ठराव आजच्या बैठकीत पारित करण्यात आला.

महामार्गाच्या कामामुळे पाईपलाईन स्थलांतरीत केली जाणार आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतीतीला १ एप्रिलपासून वाघूर धरणातून पाणीपुरवठा करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत रस्ते, वीज यासंदर्भातही चर्चा झाल्याची माहिती विनोद बियाणी यांनी दिली.

LEAVE A REPLY

*