जळगावातून लवकरच विमान ‘उडान’चे संकेत

0

जळगाव |  प्रतिनिधी : सर्वसामान्यांना विमानप्रवास करता यावा यासाठी केंद्राने ‘आम आदमी भरे उडान’ ही योजना सुरु केली. या योजन जळगाव विमानतळाचा समावेश करण्याबाबत उडान समितीच्या पथकाने विमानतळावरुन स्थानिक उड्डाणांची सुविधा सुरु करण्यासंदर्भात आवश्यक त्या पूर्ततांची तपासणी केली. समितीच्या अहवालानंतरच विमानतळावरुन वाहतुक सुरु करण्यात येणार असल्याचे संकेत समितीतील सह महाव्यवस्थापक आर.पी.हजारे यांनी दिले.

airplane-308556_640

जळगाव विमानतळावर आलेल्या समितीत महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे सह महाव्यवस्थापक आर.पी. हजारे, नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाचे एम.टी.बोकाडे, मुंबई येथील भारतीय हवामान विभागाचे सुनिल कांबळे, तेलबिया संशोधन केंद्र येथील हवामान तज्ज्ञ एच. एस. महाजन, उपविभागीय अधिकारी जलज शर्मा, जळगाव मनपाचे अभियंता डी. आर. थोरात, प्रकाश पाटील, पोलीस उपअधिक्षक (गृह)  एम. बी. पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे, एम.आय.डी.सी.पो.स्टे.चे पोनि. सुनिल कुराडे, नायब तहसिलदार डी.जी.भालेराव, जळगाव विमानतळावरील अधिकारी प्रकाश चंद्र, शहाबुद्दीन मुलतानी, घनश्याम सिंग, योगेश शेंडे, बसवंत राव आदी उपस्थित होते.

समितीने जळगाव विमानतळ येथील सर्व पायाभुत सुविधांची पाहणी केली. विमानतळावर प्रवासी वाहतुक सुरु करण्यासाठी आवश्यक आगमन व प्रस्थानाच्या वेळी लागणारी सुरक्षा व्यवस्था व मुलभूत सुविधांची उपलब्धता याबाबींसंदर्भात माहिती घेतली. यावेळी समितीतील सदस्य श्री.हजारे यांनी सांगितले की, सामान्य माणसालाही विमानप्रवास शक्य व्हावा यासाठी केंद्रशासन देशांतर्गत विमान वाहतुकीला चालना देत आहे.

यासाठी ‘आम आदमी भरे उडान’  सह योजना करण्यात आली आहे.  त्यासाठी विमानतळावरुन होणार्‍या प्रवासी वाहतुकींबाबत देशभरातील ४०० हून अधिक विमानतळे या उडान अभियानाअंतर्गत समाविष्ट करण्यात आली आहेत.  या अभियानात दरवर्षी १०० विमानतळे समाविष्ट केली जात आहेत. ज्या विमानतळांवर पायाभुत सुविधांची उपलब्धता आहे. जेथे आणखी थोड्याफार सुविधा पुरवून प्रवासी वाहतुक सुरु होऊ शकते अशा विमानतळांचा यात समावेश आहे.

त्यात महाराष्ट्रातील जळगाव, अमरावती, शिर्डी, कोल्हापूर, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी,  लातूर, नाशिक या शहरांतील विमानतळांचा समावेश आहे, असे श्री. हजारे यांनी सांगितले. या पाहणी समितीचा अहवाल स्थानिय संपर्क अभियान समिती नवी दिल्ली येथे पाठविण्यात येईल.

तेथे विमानसेवा देणार्‍या संस्थांपुढे या अहवालाचे सादरीकरण करुन नंतर त्यांच्या आवश्यकतेनुसार सुविधांची उभारणी करण्याबाबत उपाययोजना सुचविण्यात येतील, असे समितीतर्फे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

*