जलाभिषेकात बाप्पा विराजमान

0

सावेडी, भिंगार, केडगाव, नागापुरात मिरवणुकीने श्रींची स्थापना

अहमदनगर (प्रतिनिधी) – ‘गणपती बाप्पा मोरया’ चा जयघोष, ढोल-ताशांचा दणदणाट, फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करत वाजत गाजत बाप्पाचे घरोघरी आणि मंडळांच्या मंडपात शुक्रवारी आगमन झाले. गुरूवारी सायंकाळपासूनच बाप्पाच्या आगमनाने नगर शहर आणि सावेडी, भिंगार, केडगाव, नागापूर उपनगरातील रस्ते फुलून गेले होते. भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम दिसून येत होता. लहान-थोरांनी जल्लोष आणि भक्तिमय वातावरणातच बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना केली.

पुजा, सजावटीचे साहित्य खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी उसळली होती. बाप्पाच्या आगमनासाठी नगरमधील मंडळांची आठ दिवसापासूनच जय्यत तयारी सुरू होती. आजच्या दिवसाची वाट पाहणार्‍या सर्वच गणेश भक्तांनी अगदी पारंपारिक वेषात बाप्पाचे भक्तिभावाने आगमन केले. चितळे रस्ता, गांधी मैदान, प्रोफेसर कॉलनी चौक, पाईपलाईन रस्ता, बोल्हेगाव फाट्यावरील नागापूर रस्त्याकडेला तसेच भिंगार, केडगावात गणेश मूर्ती व पुजा साहित्य तसेच सजावटीचे दुकाने थाटली असल्याने रस्ते गर्दीने फुलले होते. काही काळ तेथे वाहतूक कोंडी झाली. गणेश मंडळांनी सनई-चौघडे, ढोल-ताशांच्या निनादात मिरवणुका काढून वाजत-गाजत बाप्पाचे आगमन केले. कुटुंबकबिल्यासह घरगुती गणपतींची घरात प्रतिष्ठापना करण्यात आली.

गणपतीच्या आरती, स्त्रोत आणि मंत्रपठन असे मंगलदायक वातावरण प्रत्येक घरात पाहण्यास मिळाले.गणेश आगमनामुळे बच्चे कंपनींच्या चेहर्‍यावरील आनंद गगनात मावेनासा झाला होता. अनेकांना तर बाप्पासोबत सेल्फी काढण्याचा मोहही आवरता आला नाही. काहींची तर बाप्पांची पहिली छबी आपल्या कॅमेर्‍यात टिपण्यासाठी धडपड सुरू होती. बाप्पासोबत काढलेले फोटो सोशल मीडियावर टाकण्यासाठीही त्यांची धडपड सुरू होती. व्हॉटस्अपच्या अनेक ग्रुपवर बाप्पासोबतची सेल्फी व्हायरल झाल्या होत्या.

आरस उभारणी सुरू
पंधरा दिवसांपूर्वी सार्वजनिक गणेश मंडळांनी मंडप उभारणी सुरू करत ते पूर्ण केले आहेत. नगरसेवक किशोर डागवाले यांच्या वरदविनायक मंडळाची आरस उभारणीही सुरू झाली आहे. मंडपाच्या परवानगीसाठी महापालिकेत मंडळांच्या प्रतिनिधींनी गर्दी केली होती. 102 मंडळांनी गुरूवारपर्यंत महापालिकेची परवानगी घेतली होती. शुक्रवारी प्रतिष्ठापनेची लगबग संपल्यानंतर मंडळ परवानगीसाठी येतील. दीडशे मंडळ परवानगी घेतील असा अंदाज महापालिका प्रशासनाने वर्तविला आहे.

रंगीबेरंगी रस्तेरंगीबेरंगी रस्ते- शहरातील रस्त्याच्या दुतर्फा सार्वजनिक गणेश मंडळांनी मनमोहक रंगीबेरंगी कमानी उभारल्या आहेत. बहुरंगी पताका, रेशमी, मुलायम कलाकुसरीच्या कापडाने कमानी सजवल्यामुळे शहरातील रस्ते रंगीबेरंगी असल्याचे दिसून आले.

LEAVE A REPLY

*