जलव्यवस्थापन ही काळाची गरज – जिल्हाधिकारी ; जलजागृती सप्ताहाचा समारोप; पथनाट्यातून दिला पाणी बचतीचा संदेश

0

नाशिक : येत्या काळात पाणीटंचाईचे संकट टाळण्यासाठी जलसाक्षरता आणि जलव्यवस्थापनावर भर देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले. कालिदास कलामंदिर येथे जलजागृती सप्ताह समारोप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी मुख्य अभियंता सुभाष वाघमारे, अधीक्षक अभियंता राजेश मोरे, निवृत्त जलसंपदा सचिव पी. आर. भामरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी के.टी.जगताप, महापालिकेचे शहर अभियंता यु.बी.पवार आदी उपस्थित होते.

राधाकृष्णन बी. म्हणाले, वाढत्या लोकसंख्येला पुरेसे पाणी पुरवण्यासाठी पाण्याचा पुनर्वापर करण्याची गरज आहे. पावसाळ्यातील पाणी अधिकाधिक प्रमाणात अडवणे आणि जिरवणे यासाठी काम करताना जलपुनर्भरण मोहीम हाती घेण्याचीदेखील गरज आहे.

पाण्याचे साठे वाढवण्यासाठी जलयुक्त शिवारच्या माध्यमातून नदी, नाले आणि धरणातून गाळ काढण्याचे तसेच पाणी अडवण्याचे उपक्रम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आले आहेत. त्यासाठी विविध घटकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग मिळाला आहे.

जलजागृती सप्ताहानिमित्त ‘सांडपाण्याचा पुनर्वापर’ ही संकल्पना जनमानसात बिंबवण्याचा विभागाने प्रयत्न केला असल्याचे मुख्य अभियंता वाघमारे यांनी सांगितले. प्रास्ताविक अधीक्षक अभियंता मोरे यांनी केले. जलदिनानिमित्त काव्य, वक्तृत्व, गीत, पथनाट्य आदी विविध स्पर्धांतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

LEAVE A REPLY

*