जलयुक्त शिवारातून दीड लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली : ना. शिंदे

0
राहुरी विद्यापीठ (वार्ताहर) – अहमदनगर जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून पथदर्शी काम झाले आहे. जल व मृदसंधारणाच्या कामामुळे भूजल पातळीत एक ते दीड मीटरने वाढ झाली आहे. या अभियानाच्या माध्यमातून 77 हजार 931 टीसीएम एवढा पाणीसाठा निर्माण झाला असून, एक लाख, 55 हजार 883 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले असल्याची माहिती जलसंधारण व राजशिष्टाचारमंत्री तथा पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिली.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे अहमदनगर जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत समावेश असलेल्या गावातील कामांचा आढावा त्याचप्रमाणे जलसंधारण विभागामार्फत करण्यात येणार्‍या कामांचा आढावा पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी घेतला. या आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत प्रा. शिंदे बोलत होते. यावेळी आमदार बाळासाहेब मुरकुटे, आमदार मोनिका राजळे, जिल्हाधिकारी अभय महाजन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री प्रा. शिंदे म्हणाले, अहमदनगर जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून 2015-16 पासून कामे सुरू आहेत. हा जिल्हा अवर्षणप्रवण क्षेत्रात समाविष्ट असून, टंचाईची परिस्थिती नेहमीच अनुभवास मिळते. 2015-16 या वर्षात जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत एकूण 279 गावांची निवड करण्यात आली. या गावांमध्ये विविध यंत्रणांद्वारे एकूण 14 हजार 648 कामे प्रस्तावित करण्यात आली होती. त्यापैकी एकूण 14 हजार 648 कामे पूर्ण झाली असून, त्यासाठी एकूण 206.79 कोटी रुपयांचा निधी या कामांवर खर्च करण्यात आला आहे.
2016-17 या वर्षात जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियांनांतर्गत 268 गावांची निवड करण्यात आली. या गावांमध्ये विविध यंत्रणाद्वारे 10 हजार 992 कामे प्रस्तावित करण्यात आली. यापैकी एकूण 6 हजार 613 कामे सुरू झाली असून, यापैकी 3 हजार 758 कामे पूर्ण झाली आहेत. तर दोन हजार 855 कामे प्रगतिपथावर असल्याचे प्रा. शिंदे यांनी सांगितले.
जलयुक्त शिवार अभियानाच्या यशासंदर्भात बोलताना प्रा. शिंदे म्हणाले, जिल्ह्यात मे 2015 मध्ये 826 टँकरद्वारे तर मे 2016 मध्ये 732 टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत होता. तर मे 2017 मध्ये फक्त 66 टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. हेच जलयुक्त शिवार अभियानाचे ठळक यश आहे. जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या पथदर्शी कामांमुळेच जिल्ह्याचा गौरव करण्यात येणार असल्याचेही प्रा. शिंदे यांनी सांगीतले.
2017-18 या वर्षासाठी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत एकूण 241 गावांची निवड करण्यात आली असून सर्व गावांच्या शिवारफेर्‍या पूर्ण झाल्या आहेत. आराखडे तयार झाले असून आराखड्यांना ग्रामसभेची मान्यता घेण्यात आली आहे. कामे तातडीने सुरू करण्याबाबत आढावा बैठकीत संबंधित अधिकार्‍यांना सूचना देण्यात आल्याची माहिती प्रा. शिंदे यांनी दिली.

राज्य शासनाने ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना’ नुकतीच सुरू केल्याचे सांगून, प्रा. शिंदे म्हणाले, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेचा शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अभियानाला गती दिली असल्याचेही प्रा. शिंदे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*