जलजागृती सप्ताहांतर्गत जलबचतीची प्रतिज्ञा

0

नाशिक । दि.16 प्रतिनिधी
राज्यातील विविध भागात पावसाचे असंतुलित प्रमाण आणि मर्यादित कालावधीतील पावसाळा लक्षात घेता वाढत्या लोकसंख्येची पाण्याची गरज भागविण्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर आणि पुनर्वापर करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ‘मेरी’चे महासंचालक सी.एम. बिराजदार यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आयोजित जलजागृती सप्ताह उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, मुख्य अभियंता आर.एम. उपासनी, ईश्वर चौधरी , अधीक्षक अभियंता च.ना.माळी, राजेश मोरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी टी.एन. जगताप आदी उपस्थित होते.

बिराजदार म्हणाले, पाण्याच्या अतिवापरामुळे पाण्याची उपलब्धता असूनही पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. दरवर्षी पडणार्‍या पावसाचे साधारण सरासरी प्रमाण सारखेच असून वाढत्या लोकसंख्येच्या गरजेमुळे पाण्याची कमतरता भासते. अशावेळी भूगर्भातील पाण्याचे स्त्रोत वाढविणे आणि पाण्याच्या वापरावर मर्यादा घालणे गरजेचे आहे. विशेषत: शेती क्षेत्रात सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर केल्यास वाढत्या लोकसंख्येची पिण्याच्या पाण्याची गरज भागू शकेल.

मानवी जीवनाच्या प्रगतीसाठी पाणी महत्त्वाचा घटक असल्याने जलजागृती सप्ताहानिमित्ताने त्याचे महत्व घरोघरी पोहोचवावे, असे आवाहन त्यांनी केले. बगाटे म्हणाले, भूपृष्ठावरील केवळ 2 टक्के पाणी पिण्यायोग्य असून त्यातील बहुतांशी भागाचा पाणी व्यवस्थापनाअभावी उपयोग केला जात नाही.

पाण्याचा काटकसरीने उपयोग करण्याबरोबरच पाण्याचे स्त्रोत प्रदूषित होऊ न देणे आणि पाण्याची सर्व प्रकारची नासाडी टाळणे महत्त्वाचे आहे. शहरीकरणामुळे पाण्याचा उपयोगदेखील वाढला आहे. प्रत्येकाने पाणी बचतीचे महत्त्व लक्षात घेतल्यास भविष्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही.

जलजागृती सप्ताहाच्या माध्यमातून प्रत्येकाने जलदूत बनून जलजागृतीचे प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविकात मोरे यांनी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने कायद्यान्वये ठिबक सिंचनाला प्रोत्साहन देण्याचे आवश्यक असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

*