जनावरांचा आजार माणसात!

0
स्क्रब टायफस या भयावह आजाराचे रुग्ण आढळल्यामुळे विदर्भात भीतीचे सावट पसरले आहे. जनावरांमध्ये आढळणारा हा आजार कीटकाच्या दंशामुळे माणसात येतो आणि योग्यवेळी, योग्य मार्गाने उपचार न झाल्यास माणसाचा जीवही घेऊ शकतो. प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नसल्यामुळे या आजारापासून बचावासाठी दक्षता घेणे हाच चांगला मार्ग आहे.

साथीच्या विविध आजारांनी विदर्भात थैमान घातल्यानंतर स्क्रब टायफसने डोके वर काढल्यामुळे विदर्भात भीतीचे वातावरण आहे. वास्तविक दरवर्षी पावसाळ्यानंतर या आजाराची लक्षणे काही रुग्णांमध्ये दिसून येतात, मात्र यावर्षी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात या रोगाचे 15 पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत दगावलेले पाचजण याच आजाराने ग्रस्त होते, अशी शंका व्यक्त होत आहे.

स्क्रब टायफसवर मात करण्यासाठी प्रतिबंधात्मक लस अस्तित्वात नसल्यामुळे उपचार आणि प्रतिबंधासाठी घ्यावयाची दक्षता याविषयी मार्गदर्शक सूचना विदर्भातील लोकांना दिल्या जात आहेत. शेतात काम करताना किंवा गवतात बसल्यामुळे ट्रॉम्बिक्युलिट माईट म्हणजेच चिगर हा कीटक चावतो. हे कीटक दोन प्रकारचे असतात. आकाराने मोठे असलेले कीटक चावत नाहीत, तर चावणारे लहान चिगर इतके सूक्ष्म असतात की नुसत्या डोळ्यांना दिसत नाहीत. कीटक चावल्यानंतर 10 ते 20 दिवसांच्या कालावधीत स्क्रब टायफसची लक्षणे दिसू लागतात. सुरुवातीला ताप, डोकेदुखी, हातपाय दुखणे, मळमळ, उलट्या अशी ही लक्षणे असतात. ही लक्षणे डेंग्यू किंवा मलेरियासारखीच असल्यामुळे संबंधित रुग्णाला स्क्रब टायफसची लागण झाली आहे अथवा नाही याचे निदान होण्यास विलंब होऊ शकतो. अशा स्थितीत बाह्य लक्षणे तपासणे गरजेचे ठरते. ज्या ठिकाणी चिगर कीटक चावतो त्या ठिकाणी व्रण तयार होतो. हा व्रण दिसला की स्क्रब टायफसची लागण झाली आहे हे समजू शकते. अर्थात, हा व्रण सर्वच रुग्णांच्या शरीरावर दिसतोच असेही नाही. परंतु 60 टक्के रुग्णांमध्ये तो दिसू शकतो.

स्क्रब टायफसचे निदान उशिरा झाले किंवा योग्यवेळी उपचार मिळाले नाहीत तर रुग्णाचा चालताना तोल जातो, चक्कर येते. पावसाळ्याच्या दिवसांत विविध संसर्गजन्य आजार डोके वर काढतात. अशा रुग्णांमध्ये स्क्रब टायफसच्या रुग्णांचे प्रमाण सामान्यतः 15 ते 20 टक्के असल्याचे आढळते. अर्थात ज्या विभागात त्याचा प्रसार झाला आहे त्याच विभागातील ही टक्केवारी आहे. स्क्रब टायफसवर वेळेत उपचार न झाल्यास यकृताच्या तक्रारी जाणवू लागतात. न्यूमोनिया, कावीळ आणि श्वसनाचे विकारही जडू शकतात. काहीजणांच्या मुत्राशयाचे क्रियान्वयनही प्रभावित होते. या रुग्णांना मेंदूचा विकार जडण्याची शक्यता सर्वाधिक असते. या आजाराने ग्रासलेल्या 35 ते 40 टक्के रुग्णांचा मृत्यू होण्याची शक्यता असते.

स्क्रब टायफस हा आजार सर्वप्रथम 1899 मध्ये जपानमध्ये दिसून आल्याची नोंद आहे. पहिल्या महायुद्धाच्या वेळी रशियात या आजाराने तीस लाख लोकांचा मृत्यू झाला होता, तर दुसर्‍या महायुद्धात लढाईत मारल्या गेलेल्यांपेक्षा या आजाराने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या अधिक होती. त्यावेळी म्यानमार आणि श्रीलंकेच्या सैनिकांना हा आजार झाल्याच्या नोंदी आहेत. भारतात त्यावेळी आसाममध्ये असे रुग्ण दिसून आले होते. पाकिस्तान युद्धाच्या वेळी 1965 मध्ये आणि नंतर थेट 1990 मध्येच भारतात या आजाराचे रुग्ण आढळले होते. यापूर्वी तामिळनाडू, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि आसाम या राज्यांमध्ये स्क्रब टायफसचे रुग्ण आढळले होते. आता ते विदर्भात आढळून येत आहेत. चिगर हा कीटक चावण्याचा सर्वाधिक धोका शेतात किंवा बगीचात काम करणार्‍या व्यक्तींना असतो. त्यामुळे त्यांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. हा कीटक शेतांमधील उंदरांनाही चावत असल्यामुळे शेतातील उंदीर या आजाराने ग्रस्त होण्याची शक्यता असते आणि त्यांच्यामार्फतही हा आजार पसरू शकतो, हे शेतकर्‍यांनी लक्षात ठेवले पाहिजे. स्क्रब टायफस हा बॅक्टेरियांमुळे संक्रमित होणारा आजार आहे. गेल्यावर्षी या आजाराचे सुमारे 150 रुग्ण देशात आढळले होते. डोकेदुखी आणि थंडी वाजून ताप आल्याचे दिसताच तातडीने तपासण्या करून घेणे गरजेचे ठरते. कारण हीच प्राथमिक लक्षणे असतात. त्यानंतर ताप वाढत जातो आणि डोकेदुखीही असह्यहोते.

काही रुग्णांमध्ये प्राथमिक लक्षणे दिसल्यावर उपचार योग्य दिशेने सुरू झाल्यास शरीराचे फारसे नुकसान न होता रुग्ण बरा होऊ शकतो. परंतु योग्यवेळी, योग्य दिशेने उपचार न झाल्यास शरीरातील अनेक अवयवांचे अतिशय गंभीर नुकसान होऊ शकते. काही रुग्णांच्या बाबतीत पोटात खाज सुरू होते आणि ती हळूहळू इतरत्र पसरते. काही रुग्णांमध्ये खाजेबरोबरच चट्टेही दिसतात. अनेकदा हे चट्टे आणि खाज चेहर्‍यापर्यंत पोहोचते. स्क्रब टायफसचे निदान करताना मलेरिया, डेंग्यू आणि लेप्टोस्पायरोसिस या आजारांशीही तुलना केली जाते. कारण या सर्व आजारांची लक्षणे एकसारखी असतात. या सर्व आजारांसाठी तपासण्या पूर्ण झाल्या आणि स्क्रब टायफसच असल्याचे स्पष्ट झाले की मग त्या दिशेने उपचार सुरू होतात. हीच प्रक्रिया लवकरात लवकर होणे गरजेचे असते.

निदानास उशीर होण्याच्या कारणांमधील प्रमुख कारण म्हणजे कीटकाचा दंश झाल्यानंतर 21 दिवस हा आजार निद्रिस्त अवस्थेतच असतो. त्यानंतर ताप, थंडी, डोकेदुखी अशी लक्षणे दिसू लागतात. ज्यांना प्रारंभिक लक्षणे दिसण्याइतकाच संसर्ग झाला आहे ते रुग्ण लगेच बरेही होतात. त्यामुळे अचूक निदान हाच रुग्णाचा जीव वाचवण्याचा एकमेव मार्ग ठरतो. यासंदर्भात झालेल्या अनेक अभ्यासांमधून असे स्पष्ट झाले आहे की, या आजारावरील उपचारांमध्ये टेट्रासायक्लिन आणि त्यासोबत किमोप्रोफिलेक्सिस ही औषधे बरीच प्रभावी ठरतात. परंतु उपचारांपेक्षा प्रतिबंध नेहमी चांगला. कीटकांपासून स्वतःचा बचाव केल्यास असे आजार जडण्याची शक्यता फारच कमी राहते. म्हणूनच ज्या भागात चिगर किंवा पिसवांचे प्रमाण अधिक आहे त्या ठिकाणच्या लोकांनी कपड्यांवर आणि त्वचेवर किटकांना पळवून लावणाच्या क्रिमचा किंवा स्प्रेचा वापर करणे हा सगळ्यात चांगला पर्याय आहे. कपड्यांवर किंवा बिछान्यावर परमेथ्रिन आणि बेंजिल बेंजोलेटचा शिडकावा करावा. मुख्य म्हणजे ज्या ठिकाणी पिसवांचे प्रमाण अधिक आहे तिथे जाणे टाळावे. अशा ठिकाणी जाणे अपरिहार्यच असेल तर संपूर्ण शरीर झाकले जाईल असे कपडे परिधान करावेत. खुली त्वचा पिसवा आणि चिगरपासून सुरक्षित ठेवण्यासाठी त्वचेवर माईट रिपेलन्ट क्रिम लावावे. जिथे या कीटकांचा उपद्रव जास्त आहे त्या भागातील लोकांना डॉक्सिसायक्लिनची मात्र दर आठवड्याला दिल्यास त्यांचा या आजारापासून बचाव होऊ शकतो. कीटकांच्या अन्ननलिकेत प्रामुख्याने स्क्रब टायफसचे विषाणू आढळून येतात. रिकेटिस्या नावाचा सूक्ष्म जीव विषाणू आणि जिवाणू अशा दोन्ही प्रकारात मोडतो. रिकेटस् आणि प्रोव्हाजेक नावाच्या दोन शास्त्रज्ञांनी त्याचा शोध लावल्यामुळे त्याला रिकेटिस्या प्रोव्होजेकी असे नाव देण्यात आले. याच आजाराचे संशोधन करताना या दोन्ही शास्त्रज्ञांचा मृत्यू झाला होता. रिकेटिस्यामुळे येणार्‍या तापाचे सहा प्रकार मानले गेले आहेत.

स्क्रब टायफसचे विषाणू आढळणारे जगात विशिष्ट प्रदेश आहेत. त्यात जपान, रशिया, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान याबरोबरच भारताचाही या प्रदेशात समावेश असल्यामुळे या भयावह आजारापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी आपण खबरदारी घ्यायला हवी.
– डॉ. संतोष काळे

LEAVE A REPLY

*