जनतेच्या सहकार्यामुळेच गुन्हेगारी मोडित काढता आली : पवार

0

श्रीरामपूर (प्रतिनिधी)– मी पोलीस म्हणून खुर्चीवर बसून अथवा बाहेर काम करताना कोणत्याही जातीपातीचा न मानता काम केले. त्यामुळे श्रीरामपूरसारख्या शहरात पोलीस खात्यात काम करणे खूपच अवघड आहे असे माहित असताना वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कायद्याच्या चौकटीत राहून मला येथील कुविख्यात गुन्हेगारांवर वचक बसवता आला. शहरातील जनतेच्या सहकार्यामुळेच मला गुन्हेगारी मोडित काढता आली असल्याची प्रतिक्रिया गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.

 
श्रीरामपूर शहराचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांची गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती झाल्याने त्यांची बदली झाली. त्यानिमित्त सह्याद्री तरुण मंडळाच्यावतीने एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांचा श्रीरामपूर शहरवासियांच्यावतीने गौरव व शुभेच्छा समारंभ ठेवण्यात आला होता त्यावेळी ते सत्काराला उत्तर देताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव होते. यावेळी पोलीस उपअधीक्षक़ प्रतापराव बाविस्कर, प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार सुभाष दळवी, मुख्याधिकारी सुमंत मोरे, साईबाबा संस्थानचे विश्‍वस्त प्रतापराव भोसले, सौ. भोसले, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, बाजार समितीचे सभापती दीपक पटारे, भाजपाचे प्रकाश चित्ते, नवीन पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे, अ‍ॅड. विजयराव बनकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर परदेशी आदी उपस्थित होते.

 
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव म्हणाले, काम करण्याची सचोटी ज्याच्याकडे असतो तो नेहमीच यशस्वी होत असतो आणि तीच सचोटी दिलीप पवार यांच्याकडे होती. त्यांनी नेहमीच आमच्या मार्गदर्शनाखाली काम करून एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ठसा उमटविला. शहरातील गुन्हेगारीचे उच्चाटन करताना त्यांनी कोणाच्याही दबावाखाली काम न करता प्रामाणिकपणे अत्यंत कमी दिवसांत आपली कामगिरी बजावून लौकीक मिळविला असल्याचे त्यांनी सांगितले.

 
यावेळी पोलीस उपअधीक्षक प्रताप बाविस्कर, प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार सुभाष दळवी, मुख्याधिकारी सुमंत मोरे अ‍ॅड. विजयराव बनकर, सुनील मुथ्था, सभापती दीपक पटारे, उपनगराध्यक्ष करण ससाणे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांची भाषणे झाली. प्रास्ताविक पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी आभार पोलीस उपनिरीक्षक श्री. शेख यांनी मानले तर सूत्रसंचालन दादा साठे यांनी केले.

LEAVE A REPLY

*