Type to search

अग्रलेख संपादकीय

जनता जागरूक आहे…

Share

गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराचा फटका पुण्याला बसला. अठरा जण पूरबळी ठरले. पुणेकर पुराशी झुंजत असताना जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील चार दिवसांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यास पोहोचले. युती आणि जागावाटपाच्या वाटाघाटींसाठी पाटील दिल्लीला गेले होते. कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचे याचे तारतम्य नसल्याबद्दल पूरग्रस्त पुणेकरांनी पाटलांना घेरले. ‘प्रचारासाठी आलात का? फोटो काढायला आलात का?’ अशा प्रश्‍नांची सरबत्ती केली. पूरग्रस्तांच्या रागाचा चढलेला पारा पाहून पाटलांना तेथून काढता पाय घ्यावा लागला.

एखाद्या मंत्र्याला जनतेच्या रोषास सामोरे जावे लागण्याचा हा पहिलाच प्रसंग नाही. याआधी मराठवाडा व नंतर अलीकडे कोल्हापुरात मंत्र्यांच्या पोरकटपणाचे दर्शन जनतेला घडले आहे. गेल्या महिन्यात कोल्हापूर, सांगली शहरांसह शेकडो गावांना महापुराचा विळखा पडला होता. सरकारी मदत पोहोचायला विलंब होऊन अनेक नागरिक पुरात अडकून पडले होते. सरकारचे प्रतिनिधी म्हणून जलसंपदामंत्री गिरीश महाजन चार दिवस विलंबाने पूरपाहणीसाठी पोहोचले, पण त्यांनी बोटीतून जाताना ‘सेल्फी’ची हौस भागवून घेतली. दोन-तीन वर्षांपूर्वी मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करताना मंत्री पंकजा मुंडे यांचे ‘सेल्फी’प्रेम उफाळून आले होते.

वेळ कोणती? परिस्थिती काय? याचा विचार न करता मंत्र्यांचे असे वर्तन संतापजनकच आहे. त्यामुळे कोल्हापूर आणि पुण्यातील पूरग्रस्तांची मंत्र्यांना खडेबोल सुनावण्याची भूमिका रास्तच म्हटली पाहिजे. निदान यापुढे तरी मंत्री व नेते जबाबदारीने वागतील अशी आशा करायला हरकत नसावी. राज्यात वा देशात कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी सरकारच्या कारभारावर जनतेची करडी नजर असते. ‘मुकी बिचारी कुणीही हाका…’ हा काळ आता राहिलेला नाही. कारण ‘पब्लिक सब जानती है…’! एकदा निवडून गेल्यावर मतदारसंघाकडे व जनतेकडे दुर्लक्ष करण्याकडे अनेक लोकप्रतिनिधींचा कल असतो.

वर्षानुवर्षे त्याचा अनुभव लोक घेत आहेत. आता परिस्थिती बदलली आहे. साक्षरता वाढली आहे. माहितीची साधने वाढली आहेत. मोबाईल, आंतर्जाल, संगणकांचा जमाना आहे. व्हॉटस्ऍप, ट्विटर व फेसबुकसारख्या समाज माध्यमांचा वापर वाढला आहे. तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच वयोगटातील नागरिक ‘तंत्रस्नेही’ बनले आहेत. प्रसार माध्यमे प्रभावी झाली आहेत. त्यामुळे जगात कुठेही ‘खट्ट’ वाजले तरी त्याची माहिती क्षणार्धात लोकांपर्यंत पोहोचते. म्हणूनच जनतेला गृहीत धरण्याची प्रवृत्ती नेत्यांनी सोडली पाहिजे. आपण जनतेचे प्रतिनिधी आहोत, जनतेला उत्तरदायी आहोत याची जाणीव प्रत्येक लोकप्रतिनिधीने ठेवली पाहिजे. अन्यथा अशा नाठाळ आणि दुर्लक्ष करणार्‍या लोकप्रतिनिधींना जनता इंगा दाखवल्याशिवाय राहणार नाही.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!