जगतापांचा राजकीय तमाशा अपयशी

0

कुकडीच्या पाण्यापासून शेतकरी वंचित; पाण्याचे उद्भव निम्म्याहून रिकामे!

श्रीगोंदा ( प्रतिनिधी)- निसर्गाच्या दुष्टचक्रात सतत पिचणारा श्रीगोंदा तालुक्यातील बळीराजा यंदाही कुकडी च्या धरणात पाणी असताना पाण्यावाचून पिके जळताना पाहून हवालदिल झाला आहे. कुकडी आवर्तनाचे पाणी फळबागांना मिळेल या भाबड्या आशेवर तालुक्याच्या आमदाराच्या मागे फिरणार्‍या शेतकर्‍यांच्या पिकांना पाणी मिळण्याची आशा फोल ठरली आहे.
आवर्तन सुटले त्याच दिवशी 132 चे गेट वेल्डिंग तोडण्याची स्टंटबाजी आणि देखावा करून सुरू केलेल्या आमदार राहुल जगताप यांच्या आंदोलनामुळे फळबागांना पाणी मिळेल ही आशा होती. मात्र फळबागांना पाणी मिळालेच नाही जे ठरले होते ते उद्धभवही अर्धेअधिक रिकामेच राहिले असल्याने आ. जगताप यांची आंदोलने फोल ठरली असल्याची प्रतिक्रिया वंचित शेतकरी देत आहेत.
कुकडीचे आवर्तन सुटले; मात्र ठरलेल्या उद्भवात जेमतेम पाणी गेले. अनेक वितरिका तर कुकडीच्या पाण्याने ओल्या सुद्धा झाल्या नसल्याने पाण्याचा खेळखंडोबा झाला आहे. पाण्यावाचून फळबागा जळण्याच्या मार्गावर असताना तालुक्याच्या आमदारानी योग्य नियोजन केले नसल्याने तालुक्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असताना आमदारांनी आंदोलन केल्यानंतर पुढे पाठपुरावा केला नसल्याने आ. जगताप यांनी ज्या 32 उद्भवांमध्ये पाणी सोडण्याची मागणी अंशतः मंजूर झाली असल्याचे सांगितले होते त्यातही पाणी पुरेसे गेले नाही. तर काही ठिकाणी पाणीच गेले नाही.
उष्णतेत वाढ झाली असल्याने यामुळे अंकुरलेले बियाणे जमिनीतच करपले. विहिरी, बोअरवेल मधील पाणी तीन महिन्यांपूर्वीच आटले असल्याने उभी पिके जळून गेली आहेत. अस्मानी संकटात सापडलेल्या श्रीगोंदा तालुक्यातील शेतकर्‍यांवर कुकडी कालव्याच्या आवर्तनाचे पाणी फळबागांना मिळाले नसल्याने सुलतानी संकट कोसळले आहे.
तालुक्यात डाळिंब, लिंबू, द्राक्ष या फळबागा आहेत. याबरोबर ऊस, भुईमूग, कडवळ, मका ही चारा पिके शेतकर्‍यांनी केली होती. मात्र विहिरी, बाएरवेल आटले होते तेव्हा कुकडीच्या आवर्तनाच्या भरोशावर शेततळ्यातील पाणी पिकांना दिले. मात्र कुकडीचे पाणी कॅनॉलच्याकडेचे शेतकरी वगळता इतरांच्यासाठी मृगजळ ठरले आहे. हे पाणी पिण्यासाठी सोडले पाहिजे.
आठ दिवस पाणी कर्जत, जामखेडला जात असताना आ. जगताप समर्थकांसह दोन दिवस कालव्यात बसले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र दिनी उपोषण केले. यात जिल्हाधिकार्‍यांनी आ.जगताप यांच्या मागण्या अंशत: मान्य केल्या असे सांगितल्याने आ. राहुल जगताप यांच्या आशेवर तालुक्यातील शेतकरी डोळे लावून बसले.
त्यांच्या समर्थकानी आ. जगताप यांना बाहुबलीच्या वेशात दाखवले आणि तालुक्यांचे मसीहा आ. जगताप हेच असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र आता अनेक भागात हे कुकडीचे पाणी मिळालेच नाही. वितरिका 14, 13, 12, 11, 10, 9 ला पाणी सोडले पण ते पाणी कुठे आले कुठे गेले असे म्हणत म्हणतच ते बंद झाले. या चार्‍यांना खाली पाणी येत असताना आणि या वरील उदभव भरले नसताना 132 माइनर चारी खोलली आणि खालील शेतकर्‍यांना पाणी मिळालेच नाही .
ऊस पिके जळून गेली आहेत. त्यातच फळबागांना पाणी तीन महिन्यापासून मिळाले नाही. काही बागा जळाल्या. तर काही शेवटच्या घटका मोजत उभ्या आहेत. त्या वाचवण्यासाठी कुकडीच्या आवर्तनातून नियोजन होणे गरजेचे आहे. तातडीने फळबागांना पाणी मिळाले तर आहे त्या लिंबू , डाळिंबाच्या बागा वाचतील केवळ खाली पाणी जात असताना श्रीगोंदेकरांवर बघत बसण्याची वेळ येऊ नये अशी अपेक्षा श्रीगोंदेकरांची आहे.

लोकप्रतिनिधी बदलूनही प्रश्न तसेच!
निसर्गाचे दुष्टचक्र शेतकर्‍यांच्या पाचवीला पूजलेले आहे. दरवर्षी या ना त्या कारणाने नापिकीचा तर कधी दुष्काळाचा सामना तालुक्यातील शेतकर्‍यांना करावा लागला आहे. कुकडी धरणातील पाण्याचे मागील सात वर्षांपासून योग्य नियोजन होत नसल्याने ऊस, फळबागा जळल्या. पाण्यासाठी आंदोलने करणारे पुढारी दमले. त्यातच आंदोलन करणारे पुढारी बदलले. सत्तेत आल्याने आंदोलक बदलले; परंतु तालुक्यातील पाण्याचे प्रश्न तेच राहिले असल्याने मोठ्या प्रमाणावर कर्ज घेऊन शेतीत गुंतवणूक करणार्‍या शेतकर्‍यांना कर्जाचे हप्ते फेडायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतात एकर दीड एकरावर शेततळे केले त्यात होते ते पाणी संपले. परंतु त्यात पाणी सोडायचे कसे आणि फळबागा वाचवायच्या कशा या चिंतेत बळीराजा सध्या आहे.  

कुकडीचे पाणी बंद
कुकडी चे पाणी 132 पासून खाली वितरिका 9, 10, 11, 12, 13, 14 वरील अनेक ठिकाणी किमान फळबागांना पाणी मिळेल अशी आशा होती .परंतु पाण्याच्या नियोजनात बट्टयाबोळ झाल्याने या वितरिकांवर असलेले पिण्याचे पाण्याचे उद्भव सुद्धा पुरेसे भरले नाहीत . आता आहे ते पाणी विसापूर तलावात सोडल्याने 132 पासून खालील पाणी बंद झाले. पाणी फळबागांना तर नाहीच पिण्यासाठी ही पुरेसे मिळाले नाही.

बाहुबली आमदाराचे आंदोलने स्टंटबाजीसाठी
कुकडीचे पाणी पिण्यासाठी सुटले. हे आवर्तन शेतीला आणि फळबागांना सोडावे म्हणून आमदारानी आंदोलनांची स्टंटबाजी केली. या आंदोलनादरम्यान त्यांच्या समर्थकांनी आमदार जगताप यांना बाहुबलीच्या वेशात दाखवले. मात्र पाणीशेतीला तर नाही पिण्यासाठी ही पुरेसे सुटले नाही. त्यामुळे बाहुबली आमदारांची आंदोलनेे स्टंट म्हणूनच ठरली.

LEAVE A REPLY

*