जंक फूड घरातही!

0

जंक फूड चर्चेत आहे. खरेतर आपल्या जीवनात हलक्या पावलांनी प्रवेश केलेल्या या अन्न सवयीने आता बर्‍यापैकी कब्जा केला आहे. ग्रामीण भागातील प्रसार मर्यादित असला तरी शहरी भाग या जंक फूडने व्यापला आहे. अधिकच मीठ, साखर, मेदयुक्त आणि कमी पोषणमुल्य असलेले हे पदार्थ. त्यामुळे स्थूलपणा, मधुमेह, दातांचे विकार, हृदयरोग बळावतो, असा निष्कर्ष. म्हणूनच हैदराबाद येथील राष्ट्रीय पोषण संस्थेच्या एका अभ्यासगटाने शाळांच्या उपहारगृहात जंक फूडवर बंदी घालण्याची शिफारस केली होती. सरकारने ती आता अंमलात आणली आहे. तसा आदेशच राज्य शालेय शिक्षण विभागाने जारी केला आहे. त्यामुळे बिस्किट, चॉकलेट, पिझ्झा, बर्गर, बर्फाचे गोळे, रसगुल्ला, गुलाबजामून, पेढा, नूडल्स, पाणीपुरी, बन्स, पेस्ट्री आदी पदार्थ शाळांच्या उपहारगृहात विकता येणार नाहीत. या पदार्थांमुळे मुलांच्या मानसिक व शारीरिक वाढीस बाधा येत असल्याचे निरीक्षण आहे. अनेक आहारतज्ज्ञ हे वारंवार सांगत आले आहेत. मात्र बदलत्या जीवनशैलीत या पदार्थांचा वाढता वापर चिंताजनक आहे. अभ्यासगटाने शाळांच्या उपहारगृहात गव्हाची रोटी किंवा पराठा, भात-भाजी, गव्हाचा हलवा, राजमा, कढी, पालेभाज्यायुक्त पदार्थ, इडली, वडा सांबर, दही, ताक, लस्सी आदी पदार्थांचा समावेश असावा असे सूचविले आहे. मुळात अलिकडे स्वयंपाकघरात अनेक पोष्टीक पदार्थांची जागा जंक फूडवजा पदार्थांनी घेतली आहे. बिस्किट तर सर्रास आढळतात. नूडल्स नसणे अनेकांना मागासपणाचे वाटते. कौतुकाने मुलांना नूडल्स करून देणारे पालक काही कमी नाहीत. कुटुंबासह बाहेर पडले की खाण्यापिण्याचा सारा भर असतो तो जंक फूडवरच! त्यामुळे केवळ शाळेच्या उपहारगृहात जंक फूडला बंदी घालून परिणाम साधला जाणे अशक्यच! महानगरांमधील शाळांत उपहारगृहे असतात म्हणून हा निर्णय तेथे लागू तरी होईल. पण नगरसारख्या शहरांचे काय? नगर जिल्ह्यातील किती शाळांत उपहारगृहे आहेत? शक्यतो शाळांच्या परिसराबाहेर अशी उपहारगृहे खासगी पद्धतीने चालवली जातात. त्यांच्यावर या आदेशाचा काही परिणाम संभवत नाही. मुळात हा मुद्दा यापेक्षा अधिक गंभीरपणे घेण्याची गरज आहे. मुलांच्या बिघडणार्‍या खानपान सवयीत बर्‍यापैकी पालकांचाही वाटा मोठा आहे. कोडकौतुकात मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासाला आपणच खोडा घालत असल्याचे भान यानिमित्ताने पालकांनाही आले, तर अधिक बरे होईल. स्वयंपाकघरातील ‘इंस्टंट’ पाककृती केवळ लहान मुलांसाठीच नव्हे तर मोठ्यांसाठीही घातक आहेत. त्यांचे अतिसेवन अनेक आजारांना आमंत्रण ठरते. तेव्हा या आदेशाकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे. आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्या मुलांसाठी पालक म्हणून काही सवयी आपणही बदलून घेणे इष्ट!

LEAVE A REPLY

*