छेडछाडीच्या नादातून कॉलेजसमोर राडा

0

टगे मुजोर: कुठे गेले निर्भया पथक?

अहमदनगर (प्रतिनिधी)– मुलींच्या छेडछाडीच्या नादातून आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास मध्य वस्तीतील कॉलेजसमोर केडगाव आणि दातरंगे मळ्याती दोन गँगमध्ये तुंबळ हाणामारी झाली. टग्यांच्या मुजोरीसमोर शिक्षक हतबल झाल्याने त्यांना हाताची घडी तोंडावर बोट ठेवले आहे. मुलींच्या सुरक्षिततेसाठी गाजावाजा करून कॉलेज परिसरात गस्त घालणारे पोलिसांचे निर्भया पथकही बेपत्ता असल्याची बाब आज निदर्शनास आली. एकमेकांवर दादागिरी करून दोन्ही गटांनी तेथून काढता पाय घेतला. टग्यांच्या रस्त्यावरील गर्दीने अर्धा तास वाहतूक कोंडीत नगरकर हाकनाक अडकून पडले.

पूर्ववैमनस्य व मुलीच्या छेडछाडीतून केडगाव व दातरंगे मळ्यातील दोन टग्यांच्या गॅग समोरासमोर आल्या. गत आठ दिवसांपासून ‘नादा’तून त्यांच्या धुसफूस सुरू आहे. एकमेकांकडे खुन्नसे बघत दोन्ही गटातील टग्यांच्या रागाचा पारा चढला होता. ‘नादा’चा बोभाटा नको म्हणून दोन्ही गट कारणाच्या शोधात होते. आज पार्किंगचे कारण त्यांना मिळाले. पार्किंगवरून हुज्जत सुरू झाली. काही टग्यांनी एकमेकांची गचांडी पकडून शिवीगाळ सुरू केली. नंतर ‘दादा’ला फोन करून बोलविण्यात आले. दोन्ही गटाचे दादा टंग्यासोबत कॉलेजात पोहचले. दरम्यान कॉलेज वॉचमनने टग्यांना कॉलेज कॅम्पस बाहेर हाकलले होते. तेथून दोन्ही गटातील टगे पोलीस मुख्यालयाच्या दारासमोर आले.

कॉलेज पोहचलेल्या दादांना पाहून टग्यांचा आवाज चढला. त्यांनी एकमेकांच्या अंगावर हात टाकत हाणामारी सुरू केली. धुलाई सुरू असताना रस्ता ब्लॉक झाला. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. दादासमोर नगरकर कोणी काही बोलले नाही. मुकाटपणे ते राडा पाहत होते. धुलाई संपल्यानंतर मग दोन्ही गटातील टगे पांगले.

पोलिसांचा नुसताच गाजावाजा
कॉलेजातील मुलींच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी गाजावाजा करून निर्भय पथक स्थापन केले. दामिनी नावाचे आणखी एक पथक कॉलेजात गस्त घालू लागले. वाढत्या घटनेमुळे नंतर पोलिसांची दुचाकीवरील पेट्रोलिंगही सुरू झाली. इतक्या सगळ्या पोलिसांच्या यंत्रणा असूनही त्या आज कुचकामी असल्याचे निदर्शनास आले. सकाळीच कॉलेजसमोर टग्यांचा घोळका बसलेला असतो. पोलिसांचे कोणतेच पथक तेथे त्यावेळी नसते. त्यामुळे टग्यांची मुजोरी दिवसांगणिक वाढतच आहे. एकूणच प्रशासन फक्त सुरक्षिततेच्या घोषणा करते, प्रत्यक्षात सुरक्षितेच्या दृष्टीने अंमलबजावणी करत नाही.

शिक्षक हतबल
कॉलेजातील दोन गटातील राडा सुरू असल्याची बातमी शिक्षकांपर्यंत जाऊन पोहचली. मात्र टगे कॅम्प्समधून रस्त्यावर गेल्याने शिक्षकांनी त्याकडे कानाडोळा केला. टग्यांच्या मुजोरीपुढं शिक्षक हतबल झाल्याने शिक्षक राड्यात हस्तक्षेप करत नसल्याची चर्चा तेथे सुरू होती. टग्यांची मुजोरी वाल्याने कॉलेजातील ड्रेसकोड मध्ये असणार्‍या विद्यार्थ्यांवर टग्यांनी दादागिरी केली. अर्धा तास वाहतूक कोंडी झाल्यानंतरही एकही पोलीस तेथे पोहचला नाही.

LEAVE A REPLY

*