Type to search

ब्लॉग

चौकीदाराने सिंहासन राखले!

Share

मोदी यांनी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, अच्छे दिन आलेच नाहीत, हा विरोधी पक्षांचा आरोप मोदींनी पलटवून लावला. महत्त्वाचे मुद्दे प्रचारातून हद्दपार केले. जनतेने भाजपला आणखी पाच वर्षे सत्ता बहाल केली. हा केवळ मोदी यांच्या कर्तृत्वाचा विजय आहे की, विरोधकांच्या अपयशाचाही यात मोठा वाटा होता, हे बघावे लागेल.

चौकीदाराने सिंहासन राखले. स्वत:साठीच! आणि ताबडतोब चौकीदार हे बिरूद काढून टाकले; स्वत:चे, आपल्या साथीदारांचे आणि समर्थकांचे! लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाला दणदणीत विजय मिळवून दिला. एकेकाळी संसदेत केवळ दोन खासदार असलेल्या भाजपने आज तीनशेचा आकडा पार केला आणि देशाचा राजकीय नकाशा पार बदलून टाकला. आजवर कधी मिळाली नाही एवढी मोठी विजयश्री भाजपला या मतसंग्रामात मिळाली. भाजपचा आणि एनडीएचा हा पराक्रम फारच प्रचंड आहे.

अर्थातच, मोदी यांनी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, हा विरोधी पक्षांचा आरोप पलटवून, जनतेने त्याच मोदींना, भाजपला आणखी पाच वर्षे सत्ता बहाल केली. हा केवळ मोदी यांच्या कर्तृत्वाचा विजय आहे की, विरोधकांच्या अपयशाचाही यात मोठा वाटा होता, हे बघावे लागेल.

नरेंद्र मोदी यांनी ही संपूर्ण निवडणूक स्वत:वर आत्मकेंद्रित केली आणि विरोधी पक्षांवर बाजी पलटवली, असेच म्हणावे लागेल. वास्तविक काही झाले तरी नरेंद्र मोदी यांची (सत्तेवरून) हकालपट्टी करायचीच या इर्षेने काँग्रेससकट सगळे विरोधी पक्ष वर्षभरापूर्वी कर्नाटक विधानसभेच्या निकालानंतर बंगलोरमध्ये एकत्र आले होते. हातात हात घालून त्यांनी आपल्या एकजुटीचे दर्शन घडवले होते. या महागठबंधनाची, मोदी यांनी ‘महामिलावट’ या शब्दात संभावना केली तेव्हाच 2019 ची लोकसभा निवडणूक चुरशीची होणार, हे तर ठरले.

मोदी यांच्या विरोधात विरोधी पक्षांकडे अनेक मुद्दे होते. मोदी यांनी मनमानी पद्धतीने नोटबंदी आणली, सीबीआयच्या संचालकांना पदच्युत केले, सर्जिकल स्ट्राईकचे श्रेय स्वत:कडे घेतले, सैनिकांच्या शौर्याचा स्वत:च्या प्रसिद्धीसाठी उपयोग करून घेतला. बिहार, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यांना विशेष राज्याचा दर्जा देऊ हे आश्वासन पूर्ण केले नाही. अशा अनेक आरोपांची यादी विरोधी पक्षांकडे होती. पण मोदी यांनी भाजप, एनडीए नव्हे तर ‘फिर एक बार मोदी सरकार’, असे म्हणून विरोधी पक्षांनी उचललेल्या सर्व मुद्यांना बगल दिली आणि अखेर ब्रँड मोदी जनतेच्या गळी उतरवण्यात त्यांनी यश मिळवले.

ज्या ‘अच्छे दिन…’च्या नार्‍यावर 2014 ची निवडणूक भाजपने, मोदींनी गाजवली. त्याचा यावेळी उच्चारही झाला नाही आणि यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे, रॅफेलच्या मुद्यावर व अनिल अंबानींना दिलेल्या भागिदारीच्या मुद्यावर ‘चौकीदार चोर है’च्या आरोळ्या देशभर गुंजल्या. परंतु मोदी यांनी या मुद्यांना कोणत्याही मंंचावर येऊ दिलेच नाही. ‘नरेंद्र मोदी यांनी माझ्याबरोबर 10 मिनिटे सामना करावा’ असे आव्हान राहुल गांधी सातत्याने करत राहिले. परंतु त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करीत, मोदी यांनी सर्व विरोधी पक्षांना, काँग्रेस+राहुलला देखील कधी अल्पसंख्याक कधी बहुसंख्याक समाज, कधी हिंदुत्व तर कधी पाकिस्तान तर कधी देशभक्ती, कधी बोफोर्समधील भ्रष्टाचार तर कधी राजीव गांधी यांनी नातेवाईकांसोबत युद्धनौकेवरून केलेला प्रवास.. अशा वेगवेगळ्या मुद्यांवरून हुलकावणी दिली. अंतत: बेराजगारी, आर्थिक मंदी, गोरक्षणाच्या नावाखाली झालेल्या हत्त्या असे वास्तवाशी संबंधित अनेक मुद्दे ज्यावर विरोधी पक्षांनी मोदी आणि मोदी सरकारला घेरण्याचे ठरविले होते ते सर्व मुद्दे बाजुलाच राहिले. व्यासपीठावरून मतदारांबरोबर, थेट संवाद साधण्याच्या मोदी यांच्या लकबीमुळे, मोदी यांनी लोकांवर भूल घातली, हे निर्विवाद. ‘देशाची संपत्ती व त्याचे रक्षण करण्यास हा चौकीदार समर्थ आहे की नाही?’ असे मोदी जाहीर सभेत विचारत. नाही कोण म्हणणार? एकसुरात लोकांमधून होकारच येई. मोदी यांना जनमानसाकडून अधिक काय हवे होते?

काँग्रेस म्हणजे, भ्रष्टाचार हे ही समीकरण मोदी यांनी जनतेच्या मनावर ठामपणे बिंबवले. मोदी यांच्या कारकिर्दीत एकही अर्थिक घोटाळा झाला नाही, हे जेवढे खरे तेवढेच काँग्रेसला तिच्या कारकिर्दीत झालेल्या घोटाळ्यांचेे डाग पुसता आले नाहीत. हे देखील खरेच आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्ष बेरोजगारीचा प्रश्न उभा करून पहात असताना मोदी हे पायाभूत क्षेत्रातील विकासाचे आकडे देत आणि मनरेगाच्या संख्येची आकडेमोड करीत. रोजगारी नक्कीच कशी वाढली असेल, हे लोकांना पटवून देत असत. परिणामी, कोणत्याही ठोस मुद्यावर विरोधक मोदींना कोंडीत पकडू शकले नाहीत. देशाला दिलेली आश्वासने, मोदी पूर्ण करू शकलेले नाहीत. या विरोधकांच्या आरोपाला तोंड देताना, माझ्या सरकारने सामान्य माणसाच्या हितासाठी याआधीच 136 योजना राबविल्या आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी मला वेळ द्या. आणखी मुदत द्या असे मोदी लोकांना प्रचारादरम्यान सांगत राहिले. कोणतेही काम तडीस न्यायचे तर वेळ लागणारच. ही स्वाभाविक भावना व नेमक्या याच भावनेवर मोदी यांनी जनतेची सहानुभूती मिळवली. जेथे एक उत्तम सेल्समन म्हणून मोदी यशस्वी झाले. तेथे मोदी यांचे अवगुण लोकांना पटवून देण्यात विरोधक पूर्णपणे अपयशी ठरले. बावीस राजकीय पक्ष नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एकत्र आले. परंतु मोदी यांना टक्कर देऊ शकेल, असा एकही निर्णायक नेता त्यांच्यात नव्हता. किंबहुना, शरद पवार, ममता बॅनर्जी, राहुल गांधी, मायावती, अखिलेशसिंग यादव, चंद्राबाबू नायडू, असे अनुभवी राजकारणी नेते त्यांच्याकडे होते. मात्र मोदी यांच्या तोडीचे खमके नेतृत्व विरोधक पुढे करू शकले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. प्रश्न विश्वासार्हतेचाही होता.

याशिवाय भाजपकडे कार्यकर्त्यांचे बळ आणि भक्कम संघटना होती. 2014 मध्ये अडीच कोटी सदस्य असलेल्या भाजपची केडरची संख्या आज 11 कोटी आहे! भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे, असे भाजप नेते छातीठोकपणे सांगतात. या सोबतच भाजपने गेल्या पाच वर्षांत केवळ 2019 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हेतूपुरस्सर आखलेली रणनीती महत्त्वाची ठरली. विशेषत: गेल्या दीड वर्षांत पंतप्रधान मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेसविरुद्ध चढत्या स्वरात हल्ले चालविले. प्रसंगी व्यक्तिगत हल्लेही. या बाबतीत तसेच भाजपने उपस्थित केलेल्या मुद्यांवर विरोधी पक्ष भाजपला टक्कर देऊ शकले नाहीत. त्यांच्याकडे संयुक्त रणनीती नव्हती व भावी नेतृत्वही नव्हते.

काँग्रेसला अपयश का आले? काँग्रेसकडे नेतृत्व होते आणि रणनीतीही होती. परंतु काँग्रेस ती परिणामकारकरित्या जनतेच्या गळी उतरवू शकला नाही. राहुल गांधी यांनी प्रचार खूप केला. परंतु पक्ष संघटना म्हणावी तशी सक्रीय नव्हती. काँग्रेसचे निवडणुकीचे धोरण व रणनीती राबवण्यात ती यशस्वी झाली नाही. जनतेपर्यंत पोहोचू शकली नाही. काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार या भाजपच्या हल्ल्याला, काँग्रेस पक्ष दुर्दैवाने काँग्रेसच्या काळात झालेले घोटाळे, भ्रष्टाचार यामुळे ठोस प्रत्युत्तर देऊ शकला नाही. स्वत:ची बदनामी थांबवू शकला नाही. काँग्रेसचा संपूर्ण प्रचार हा मोदी व रॅफेल या एकाच मुद्यावर प्रामुख्याने अडकून राहिला. ‘चौकीदार चोर है’, याचा सतत घोष होत राहिला. दुर्दैवाने राफेलच्या मुद्यावर काँग्रेसला देशासमोर ठोस पुरावा मांडता आला नाही. अगदी सर्वोच्च न्यायालयामध्येही!

सर्जिकल स्ट्राईक झाली. मोदी यांनी आपण स्ट्राईक केल्याचे समीकरण मांडले तर काँग्रेस पक्षाने या सर्जिकल स्ट्राईकच्या यशाबद्दल घेतलेली शंका, जनतेच्या पचनी पडली नाही. पक्षांतर्गत गटबाजी हे देखील काँग्रेसच्या अपयशाचे एक कारण ठरले. 14 राज्यात काँग्रेस जवळपास हद्दपार झाला ही गंभीर बाब आहे.

देशाच्या राजकारणात पुन्हा जम बसवायचा असेल तर काँग्रेसला, काँग्रेसच्या नेतृत्वाला या निवडणुकीपासून बरेच धडे घ्यावे लागतील. महागठबंधन झालेच नाही. काँग्रेस एकटा पडला. पंतप्रधान होण्यास आपण तयार आहोत, असे जाहीर करणार्‍या राहुल गांधी यांनी अखेर कुणीही पंतप्रधान चालेल असे म्हणून काढता पाय घेतला. केंद्रात स्वत:साठी महत्त्वाची भूमिका बेतू पहाणार्‍या चंद्राबाबू नायडू यांना स्वत:च्या राज्यात (आंध्रप्रदेश) वाय. एस. आर. काँग्रेसकडून शिकस्त खावी लागली. भाजपसमोर 18 जागा गमवाव्या लागल्या. महागठबंधनाच्या जोरावर दिल्लीची स्वप्ने बघणार्‍या मायावती यांना अखिलेशसिंग यादव यांच्यासोबत मिळून बसपासाठी केवळ 15 जागा कमावता आल्या. उत्तर प्रदेशात भाजप तोंडावर आपटी खाणार असे भाकित वर्तवणार्‍यांना ठेचकाळून पडावे लागले. भाजपने 73 पैकी 9 जागा गमावल्या.

भाजपने आपल्या नुकसानीची कसर गुजरात, छत्तीसगढ, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तराखंड, हरयाणा, हिमाचल प्रदेश, बिहारमधून भरून काढली आणि 300 चा आकडा पार केला! लागोपाठ दुसर्‍यांदा बहुमताने भाजपने लोकसभा निवडणूक जिंकली आणि या लढाईचे व विजयाचे नायक मोदी आणि नरेंद्र मोदी हेच होते. हे स्पष्टच आहे.
सुरेखा टाकसाळ

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!