चैतन्य मिल्कवरील आंदोलन ‘स्वाभिमानी’ची दिलगिरी

0

चुकीच्या माहितीवरून केलेले आंदोलन फसले
10 हजार लीटर दुधाची नासाडी रखवालदाराला मारहाण
संतप्त शेतकर्‍यांनी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना घेरले

 

 

देवळाली प्रवरा (वार्ताहर)- चुकीची माहिती मिळाल्यामुळे येथील चैतन्य मिल्कवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन करून संतप्त कार्यकर्त्यांनी तेथील तब्बल 10 हजार लीटर दूध ओतून दिले.

 

मात्र, ते दूध यापूर्वीच संकलित केल्याचे लक्षात आल्यानंतर आंदोलन मागे घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र मोरे यांनी चैतन्य मिल्क कंपनीचे अध्यक्ष गणेशराव भांड यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली आहे. तशी दिलगिरी व्यक्त्त करणारे पत्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र मोरे यांनी गणेशराव भांड यांना दिल्याने आंदोलनावर पडदा पडला आहे. चैतन्य मिल्कवर दुधाची नासाडी व रखवालदाराला मारहाण झाल्यानंतर परिसरातील शेतकरी जमा झाले. त्यांचा रूद्रावतार पाहून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हळूच काढता पाय घेतला.

 

 
दरम्यान, गणेशराव भांड यांनी शेतकर्‍यांचा राज्यव्यापी संप सुरू झाल्यानंतर अगदी पहिल्या दिवसांपासूनच शेतकर्‍यांबरोबर राहून आंदोलनात सहभाग नोंदवून चैतन्य मिल्ककडून होणारे दूध संकलन आजतागायत बंद ठेवल्याने आंदोलनकर्त्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

 

 
काल रविवारी (दि. 04) सकाळी येथील चैतन्य मिल्कवर शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष रवींद्र मोरे व संघटनेचे कार्यकर्ते आले व त्यांनी तीन दिवसांपासून उभ्या असलेल्या टँकरमधील दूध सोडून दिले व प्रवेशद्वारावरील कर्मचार्‍यास धक्काबुक्की करून त्याचे कपडे फाडले. हा प्रकार सुरू असताना चैतन्य मिल्कचे अध्यक्ष भांड व परिसरातील शेतकरी मिल्क प्लँटवर जमा झाले.

 

 

हा प्लँट तीन दिवसापासून संप सुरू असल्यापासून बंद असून टँकरमध्ये पहिल्या दिवशी प्रक्रिया केलेले दूध तसेच ठेवण्यात आले असल्याचे परिसरातील शेतकर्‍यांनी सांगितले. शेतकर्‍यांच्या राज्यव्यापी आंदोलनामध्ये सर्वप्रथम सहभागी झालेल्या चैतन्य मिल्कमधील हा प्लँट बंद असल्याचा हा प्रकार समजताच राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ हे आपल्या फौजफाट्यासह प्लँटवर दाखल झाले. प्लँटवर केलेल्या आंदोलनाची दिशा चुकल्याने झालेली चूक मोरे यांच्यासह कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी या प्रकरणाची सारवासारव करून माफीनामा लिहून देऊन आपली कशीबशी सुटका करून घेतली. यावेळी परिसरातील उपस्थित शेतकरी संतप्त झाल्याने मोरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह तेथून काढता पाय घेतला.

 

 
दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दंडेलशाहीला परिसरातील शेतकरी वैतागले असून आंदोलनाचा कालचा चौथा दिवस होता. दूध बंद असल्याने शेतकर्‍यांच्या घरोघरी दुधापासून खवा व बासुंदी बनविण्याचे काम सुरू झाले आहे. तर काही ठिकाणी चक्का करून त्याचे श्रीखंडही तयार करण्यात येत आहे. यातून सुटका होण्यासाठी या आंदोलनातून दुधाला वगळण्याची परिसरातील शेतकर्‍यांनी मागणी केली आहे.

 

 

 याबाबत दिलेल्या लेखीपत्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मोरे यांनी म्हटले, चैतन्य मिल्कचे अध्यक्ष गणेश भांड यांनी सर्वप्रथम शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. परंतु काल रविवारी (दि. 04) सकाळी चैतन्य मिल्क येथे संकलन सुरू असल्याची चुकीची माहिती मिळाली. त्यानुसार शेतकर्‍यांना सोबत घेऊन चैतन्य मिल्कवर आंदोलन केले. मात्र, सदर दूध हे जुने संकलित दूध असल्याचे लक्षात आले. त्यामुळे गणेश भांड व चैतन्य मिल्कबाबत चुकीची माहिती शेतकर्‍यांमध्ये गेली. याबद्दल गणेश भांड व चैतन्य मिल्क यांची दिलगिरी व्यक्त करतो, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*