Type to search

क्रीडा

चेन्नई पुन्हा ‘नंबर वन’

Share
चेन्नई । सलामीवीर शेन वॉटसनचं आक्रमक अर्धशतक आणि त्याला इतर फलंदाजांनी दिलेली मोलाची साथ या जोरावर, चेन्नई सुपरकिंग्ज संघाने बाराव्या हंगामाच्या प्ले-ऑफ फेरीत प्रवेश केला आहे. प्ले-ऑफ फेरी गाठणारा चेन्नई बाराव्या हंगामातला पहिला संघ ठरला आहे. घरच्या मैदानावर खेळणार्‍या चेन्नईने सनराईजर्स हैदराबादवर 6 गडी राखून मात केली. वॉटसनने हैदराबादच्या गोलंदाजांचा समाचार घेताना 96 धावा केल्या. भुवनेश्वर कुमारने वॉटसनला यष्टीरक्षक बेअरस्टोकरवी झेलबाद केलं. अवघ्या 4 धावांनी वॉटसनचं शतक हुकलं.

दरम्यान, हैदराबादने दिलेल्या 176 धावांचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात अतिशय खराब झाली होती. फाफ डु प्लेसिस स्वस्तात धावबाद होऊन माघारी परतला. यानंतर सुरेश रैना आणि शेन वॉटसन जोडीने चेन्नईचा डाव सावरला. राशिद खानने सुरेश रैनाचा अडसर दूर करत चेन्नईला दुसरा धक्का दिला. मात्र वॉटसनवर अंकुश लावणं हैदराबादच्या गोलंदाजांना जमलं नाही. वॉटसनने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत हैदराबादच्या गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडलं. शतकासाठी अवघ्या 4 धावा असताना तो भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर माघारी परतला.

यानंतर विजयासाठी आवश्यक असलेल्या धावा केदार जाधव- अंबाती रायुडू जोडीने पूर्ण करत आणल्या होत्या. मात्र अखेरच्या षटकात विजयासाठी अवघी एक धाव हवी असताना अंबाती रायुडू माघारी परतला. मात्र चेन्नईने अखेरीस आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. हैदराबादकडून राशिद खान, संदीप शर्मा आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी 1-1 बळी घेतला. चेन्नईचा एक फलंदाज धावबाद झाला.

त्याआधी, मनिष पांडे आणि डेव्हिड वॉर्नरने केलेल्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर सनराईजर्स हैदराबाद संघाने 175 धावांपर्यंत मजल मारली. केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत खेळणार्‍या हैदराबादने चेन्नईच्या गोलंदाजांचा व्यवस्थित समाचार घेतला. हैदराबादकडून डेव्हिड वॉर्नरने 57 तर मनिष पांडेने नाबाद 83 धावा केल्या. चेन्नईकडून हरभजन सिंहने 2 तर दिपक चहरने 1 बळी घेतला. याव्यतिरीक्त एकाही चेन्नईच्या गोलंदाजाला यश मिळालं नाही.

हैदराबादचा जॉनी बेअरस्टो आजच्या सामन्यात फारशी चमक दाखवू शकला नाही. हरभजन सिंहच्या गोलंदाजीवर धोनीने बेअरस्टोचा झेल घेतला. यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि मनिष पांडेने दुसर्‍या विकेटसाठी 115 धावांची भागीदारी केली. या दोन्ही फलंदाजांनी चेन्नईच्या गोलंदाजांचा समाचार घेत, संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारुन दिली. डेव्ह़िड वॉर्नर माघारी परतल्यानंतर, विजय शंकरने मनिष पांडेला साथ दिली. अखेरच्या षटकात फटकेबाजी करताना शंकरही माघारी परतला. दिपक चहरने त्याचा बळी घेतला. अखेरीस, मनिष पांडेने युसूफ पठाणच्या मदतीने संघाला 175 धावांचा टप्पा गाठून दिला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!