Type to search

चेन्नईचा केकेआरवर विजय

क्रीडा

चेन्नईचा केकेआरवर विजय

Share
कोलकाता । सुरेश रैनाच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर चेन्नईने आयपीएलच्या बाराव्या हंगामात आपली विजयी परंपरा कायम राखली आहे. इडन गार्डन्स मैदानावर झालेल्या सामन्यात चेन्नईने कोलकाता नाईट रायडर्सवर 5 गडी राखून मात केली. 162 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या चेन्नईची सुरुवात खराब झाली होती. मात्र सुरेश रैनाने मैदानात तळ ठोकून संघाला विजय मिळवून दिला.

कोलकात्याच्या गोलंदाजांनी आजच्या डावाची चांगली सुरुवात केली. सलामीवीर शेन वॉटसन, डु प्लेसिस, अंबाती रायुडू आणि केदार जाधव हे फलंदाज झटपट माघारी परतले. यानंतर रैना आणि धोनी जोडीने भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. धोनीला माघारी धाडत कोलकात्याने चेन्नईची जमलेली जोडी फोडली खरी, मात्र रैनाने रविंद्र जाडेजाच्या साथीने संघाची अधिक पडझड होऊ न देता विजय मिळवला.

कोलकात्याकडून पियुष चावला, सुनील नरीन जोडीने प्रत्येकी 2-2 बळी घेतले. त्याला हॅरी गुर्नीने एक बळी घेत चांगली साथ दिली. मात्र चेन्नईच्या फलंदाजीवर पूर्णपणे अंकुश लावणं त्यांना जमलं नाही. त्याआधी, कोलकात्याने 8 बाद 161 धावा केल्या. ख्रिस लिनच्या 82 धावांच्या तडाखेबाज खेळीच्या जोरावर कोलकाताने चेन्नईला विजयासाठी 162 धावांचे आव्हान दिले.चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि कोलकाताला फलंदाजीस आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना संघात पुनरागमन केलेल्या सुनील नरिनला फलंदाजीत फार मोठी कामगिरी करता आली नाही. तो झेलबाद झाला आणि कोलकाताला पहिला धक्का बसला. त्याने केवळ 2 धावा केल्या. पुनरागमनात नरिन अपयशी ठरला असला, तरी ख्रिस लिनने आपली छाप पाडली. त्याने 36 चेंडूत दमदार अर्धशतक साजरे केले.

शांत आणि संयमी खेळीने सुरुवात करणारा नितीश राणा उंच फटका मारून झेलबाद झाला. त्याने 18 चेंडूत 21 धावा केल्या. अनुभवी रॉबिन उथप्पाने पहिल्याच चेंडूवर मोठा फटका खेळला, पण डु प्लेसिसचा त्याचा अफलातून झेल टिपला. त्यामुळे उथप्पाला शून्यावर माघारी परतावे लागले.दमदार फटकेबाजी करणारा सलामीवीर ख्रिस लिन 82 धावांवर बाद झाला. धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. त्याने 51 चेंडूत 7 चौकार आणि 6 षटकार खेचत 82 धावा केल्या. धोकादायक फटकेबाजी करणारा आंद्रे रसल या सामन्यात स्वस्तात बाद झाला. 1 चौकार आणि 1 षटकार खेचत त्याने फटकेबाजीला सुरुवात केली होती. पण त्याला फार काळ खेळपट्टीवर तग धरता आले नाही. तो 4 चेंडूत 10 धावा करून माघारी परतला.

कर्णधार दिनेश कार्तिककडून जबाबदारीने खेळी करण्याची अपेक्षा चाहत्यांना होती, पण त्याने बेजबाबदार फटका लगावला आणि कोलकाताला सहावा धक्का बसला. त्याने 14 चेंडूत 18 धावा केल्या.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!