चेंबर्ससाठी वकिलांची एकजूट; चेंबर्स कमिटीची होणार स्थापना

0

गुरूवारी वकिलांची बैठक 

अहमदनगर (प्रतिनिधी)– नवीन न्यायालया जवळ वकिलांचे चेंबर्स होण्यासाठी वकिल संघाची बैठक गुरुवारी (दि 4) अध्यक्ष अ‍ॅड.लक्ष्मण कचरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन जिल्हा न्यायालयातील बाररुममध्ये होणार असल्याची माहिती अ‍ॅड.कारभारी गवळी यांनी दिली. बैठकित चेंबर्स कमिटी स्थापन केली जाणार असून, वकिलांसाठी चेंबर्स होण्याकरिता कमिटी कार्य करणार आहे.
कोट्यावधी रुपये खर्च करुन न्यायालयाची भव्य इमारत बांधण्यात आली. नवीन न्यायालयाच्या भोवती लष्करी परिसर असल्याने अनेक सोयी-सुविधांपासून वकिल व पक्षकारांना वंचित रहावे लागत आहे. नवीन न्यायालयात सहा टक्के जागा वकिल संघाला बाररुमसाठी देण्यात आली. वकिलांची संख्या जास्त असल्याने व चेंबर्सची व्यवस्था नसल्याने एका टेबलवर आठ वकिलांचे कामकाज चालू आहे. तर अनेक वकिलांना टेबल लावण्यासाठी बाररुममध्ये जागा देखील शिल्लक नाही. अशा परिस्थितीत न्यायालयाच्या इमारती वरील दीड मजला रिकामा पडून आहे. न्यायालयाच्या शेजारी सिव्हिल सर्जन यांचा बंगला व क्वॉटर्ससाठी 6 एकर 11 गुंठे जागा देण्यात आली असून, यापैकी 4 एकर 11 गुंठे जागा पडून आहे. या जागेत दीड एकर जागा वकिलांच्या चेंबर्ससाठी देण्याची मागणी वकिलांच्या वतीने करण्यात आली आहे. जिल्हा न्यायालया भोवती लष्करी परिसर असल्याने या जागेशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
पांगरमल दारुकांड घडनेतील विषारी दारु जिल्हा रुग्णालयातच बनवण्यात आल्याचे उघड झाल्यानंतर तेथील कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी सव्हिल सर्जन यांचे निवासस्थान जिल्हा रुग्णालयातच हलविण्याची मागणी करण्यात आली होती. पत्रकार वसाहतीला लागून व जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात आरोग्य विभागाची जागा पडून आहे. येथे सिव्हिल सर्जन यांचे निवासस्थान झाल्यास वकिलांसाठी चेंबर्सची व्यवस्था होणार असल्याचे अ‍ॅड.गवळी यांचे म्हणणे आहे. चेंबर्स कमिटी स्थापन करुन शासकीय पातळीवर पाठपुरावा केला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: वकिल असल्याने ते वकिलांचा प्रश्‍न सहानुभुतीपुर्वक सोडवणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या बैठकिसाठी वकिल संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. कचरे, अ‍ॅड.नरेश गुगळे, अ‍ॅड.प्रमोद आहेर, अ‍ॅड.सुभाष काकडे, अ‍ॅड.रविंद्र बेद्रे, अ‍ॅड. गवळी आदि प्रयत्नशील आहे.

 

LEAVE A REPLY

*