चुकीच्या परंपरा आणि अंधश्रद्धेला वारकर्‍यांनी विरोध करावा

0

उद्धव महाराजःलोणीत अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

 

लोणी (वार्ताहर)- संत ज्ञानेश्‍वरांनी कर्मकांडाविरुद्ध तर संत तुकारामांनी अंधश्रद्धेविरुद्ध कडाडून हल्ला चढवला, वारकरी संप्रदायाची हीच भूमिका समाजाला पुढे घेऊन जाणारी असून पद्मश्री व पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनीही आयुष्यभर हीच भूमिका स्वीकारली असे सांगताना वारकर्‍यांनी चुकीच्या परंपरा व अंधश्रध्देला विरोध करावा असे आवाहन उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांनी केले.

 
लोणी बुद्रुक येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील पुण्यतिथीनिमीत्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या काल्याचे कीर्तनात ते बोलत होते. यावेळी विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे, डॉ. सुजय विखे पाटील, सौ. धनश्रीताई विखे, भाऊसाहेब विखे, विजय महाराज कुहिले, भारत महाराज धावणे आदी उपस्थित होते. उद्धव महाराज म्हणाले की, पद्मश्री विखे पाटील हे वारकरी होते व त्यांना अध्यात्माची आवड असल्याने तुकाराम महाराजांच्या एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ! या अभंगातून त्यांना सहकारी साखर कारखानदारीची प्रेरणा मिळाली. आणि त्यातून जे घडले त्याचे आपण लाभधारक आहोत.

 

श्रीकृष्णाने गोकुळात आनंद निर्माण व्हावा म्हणून बालगोपाळांचे संघटन केले. संघटन हे चांगले करण्यासाठी असले पाहिजे. पदम्श्रींनी शेतकर्‍यांचे संघटन करून अवघा समाज सुखी करण्यासाठी ऐतिहासिक काम केले. पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील आयुष्याच्या शेवटपर्यंत समाजाच्या प्रश्‍नांसाठी झटत राहिले. अलीकडच्या काळात दिखाऊपणा खूप वाढत चालल्याचे सांगत ते म्हणाले की, खरे समाजसेवक श्रेष्ठत्व दाखवत नाहीत. काही जण दाखण्यासाठीच समाजसेवा करतात. राजकारणात तरुणांनी येऊ नये अशा मताचा मी मुळीच नाही, लोकशाही राष्ट्र चालवताना ही जबाबदारी पार पाडावीच लागेल, पण राजकारण करताना आपली शेती, व्यवसाय हा नीटपणे सांभाळून राजकारण करण्याची गरज आहे. खोट्या प्रतिष्ठेपासून दूर राहायला शिकले पाहिजे असेही ते म्हणाले.

 
यावेळी ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्यावतीने उद्धव महाराज यांच्या सुरेगाव ता. नेवासा येथील नूतन मठात उभारण्यात येत असलेल्या ब्रम्हलीन नारायणगिरी महाराज यांच्या मंदिरासाठी रुपये 51 हजारांची देणगी यावेळी उद्धव महाराज यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. काशिनाथ विखे, किसनराव विखे, संपतराव विखे, सुभाष विखे, लक्ष्मण बनसोडे, नंदकिशोर राठी, अनिल विखे, प्रशांत म्हस्के, अ‍ॅड. सुरेश लगड, भागवत विखे, चांगदेव विखे, किशोर धावणे, सोपान मैड, परशुराम विखे, वेणूनाथ विखे, भाऊसाहेब विखे, गणेश विखे, राहुल धावणे, नितीन विखे, नवनाथ विखे, रावसाहेब साबळे, अशोक धावणे, संजय धावणे, मुरलीधर विखे, लक्ष्मण विखे, नाना म्हस्के, रामचंद्र निंबाळकर, गेणुजी सुर्वे, रमाकांत बोठे, किसनराव विखे, भाऊ विखे आदींसह ग्रामस्थ, वारकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. काल्याच्या कीर्तनानंतर भाविकांना महाप्रसाद देण्यात आला.

LEAVE A REPLY

*