चिमुकल्यांना अनाथालयात नेण्यार्‍या कार्यकर्त्यांवर हल्ला

0

श्रीरामपूर तालुक्यातील घटना

 

गोंडेगाव (वार्ताहर) – तालुक्यातील गोंडेगाव येथील म्हैस कुटुंबातील तीन चिमुकल्यांवर अत्याचार होत असल्याचा दावा करून त्यांना अनाथालयात नेण्यासाठी आलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांवर अपहरणाच्या संशयातून ग्रामस्थांनी हल्ला चढविला. तालुका पोलिसांच्या मदतीने संबंधितांसह बालकांना येथील साखर कामगार रुग्णालयात आणण्यात आले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

 
शिर्डी येथील साई सावली बाल अनाथालयाचे प्रमुख संजय एकनाथ उदमले, मानावाधिकार असोसिएट्सचे प्रसाद राजेंद्र शिवरकर व राहाता तालुका दक्षता समितीच्या शोभा विष्णू वर्पे (पाथरे) अशी या सामाजिक कार्यकर्त्यांची नावे आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार गोंडेगाव येथील म्हैस वस्तीवरील तिघा बालकांवर अत्याचार होत असल्याची माहिती मिळाली. शहानिशा करण्यासाठी आठ दिवसांपूर्वी या बालकांच्या आजी आजोबांशी त्यांनी संपर्क केला. त्यांनी अत्याचाराबाबत दुजोरा देत मुलांना अनाथलयात घेऊन जाण्याची विनंती केली.

 

त्यानुसार काल रविवारी उदमले, शिवरकर व वर्पे हे म्हैस वस्तीवर आले. यावेळी घरी तीन बालके आपल्या आजी आजोबांसमवेत होते. आजी व आजोबांनी मुलांसह आमच्यावर अत्याचार होत असून मुलांना लगेच अनाथालयात घेऊन जा अशी विनंती केली. सामाजिक कार्यकर्त्यांनी या बालकांशीही चर्चा केली असता त्यांनी अत्याचाराबाबत माहिती दिली असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

 
या पार्श्‍वभूमीवर मुलांना पोलिसांत देण्यासाठी घेऊन जात असताना मुलांच्या सावत्र भावाने जमाव जमवून त्यांच्या स्विफ्ट डिझायर (एमएच 12 जीआर 8901) या वाहनावर हल्ला केला. शिवरकर यांना मारहाण करून वर्पे यांना धक्काबुक्की करण्यात आली. वर्पे यांनी पोलिसांशी संपर्क साधून मदतीची मागणी केल्यानंतर तासाभराने तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मुलांसह सामाजिक कार्यकर्त्यांची जमावाच्या तावडीतून सुटका केली. जखमींना कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

 दरम्यान सामाजिक कार्यकर्ते मुलांवर अत्याचार होत असल्याचा दावा करीत असले तरी मुलांच्य भावाने मात्र कुटुंबीयांच्या परवानगीशिवाय मुलांना घेऊन जात असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आता पोलिसांनी सत्यता पडताळून कारवाई करण्याची करण्याची मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

*