चिमणी पाखरांच्या मदतीला मनमाड पोलीस

0

मनमाड|प्रतिनिधी- वाढते प्रदूषण, वाहनांचे आवाज आणि एकूणच निसर्गामध्ये मानवाचा अवाजवी हस्तक्षेप यामुळे शहरी रहिवासातून परागंदा होण्याची वेळ चिमणी-पाखरावर आलेली असतांनाच आता उन्हाळा ही सुरु झाल्यामुळे जंगलातील पशु पक्षांवर दाणा-पाण्यासाठी दाही दिशा भटकण्याची वेळ आली आहे.

पक्षांवर आलेल्या या संकटाच्या वेळी त्यांच्या मदतीला मनमाड पोलीस धावून आले असून २०मार्च या जागतिक चिमणी दिवसा निमित्त पक्ष्यांच्या संवर्धनासाठी मनमाड शहर पोलीस स्थानकाच्या वतीने पोलीस स्थानक परिसरासह शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी झाडावर घरटी लावण्या बरोबरच पाण्याचे भांडे देखील ठेवण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांनी दिली.

२० मार्च हा जागतिक चिमणी दिवस म्हणून जगभरात साजरा होत असतो पर्यावरणीय साखळीच्या दृष्टीने चिमणीचे स्थान महत्वाचे आहे. परंतु जगभरात वेगाने वंनसंपदा आणि झाडे यांची कत्तल होत असल्याने या चिमण्यांना हक्काचे निवासस्थान, घरटे बांधायला जागाच शिल्लक राहत नाही मोबाईलच्या लहरीचा देखील दुष्परिणाम त्यांना सोसावा लागत असतो. सर्वच पाखरांची थोड्याफार फरकाने अशीच अवस्था असल्याचे शहरी वातावरणातून चिमणी-पाखरे गायब होऊ लागली आहेत. या चिमण्यांचे आणि पक्षाचे संवर्धन व्हावे यासाठी जागतिक चिमणी दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे पो. नि. सपकाळे यांनी सांगितले.

आपण ज्या पोलीस स्थानकात कार्यरत असतो तेथे दरवर्षी २०मार्चला हा उपक्रम पोलीस दलाच्या वतीने राबवीत असतो. यंदाही शहराच्या ठिकठिकाणच्या झाडावरती सुमारे २०० मातीची घरटे पक्षांसाठी बांधली जाणार आहेत. साधारणत: महिनाभरात या ठिकाणी पक्षी वास्तव्याला येतील आणि त्यांचा उत्कट आनंद अनुभवता येणार आहे.

उन्हाची तीव्रता वाढू लागली असून या चिमणी-पाखरांचे पाण्यावाचून हाल होऊ नयेत यासाठी शेकडो मातीची भांडी पोलीस प्रशासनाने तयार करून घेतली असून नागरिकांना हि भांडी मोफत दिली जाणार आहेत. नागरिकांनी या भांड्यात पाणी भरून ती छतावर, गच्चीवर, अंगणात ठेवायची आहेत.

ज्यायोगे पाखरांना पाणी मिळू शकणार आहे नागरिक या भांड्याचा वापर योग्य पद्धतीने करताहेत का हे देखील वेळोवेळी पहिले जाणार आहे. त्याच जोडीला पक्षी मित्रमंडळाची स्थापना करण्यात येऊन पक्षीसंवर्धनासाठी कार्य करणार्‍या संस्था आणि व्यक्तीचा सत्कार देखील करण्यात येणार असल्याची माहितीही पोलीस निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांनी दिली असून नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*